Tungabhadra Dam कर्नाटकात सध्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील तुंगभद्रा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. याच सततच्या मुसळधार पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा या धरणाच्या एका दरवाजाची साखळी तुटली आणि तुंगभद्रा नदीवरील दगडी बांधाच्या या धरणातील ३३ पैकी एक दरवाजा वाहून गेला. त्यामुळे धरणातून वाहणार्‍या पाण्याचा वेग वाढणार असल्याचे सांगण्यात आले. दरवाजा वाहून गेल्यानंतर कोप्पल जिल्ह्याला पुराचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचा दोन-तृतीयांश भाग रिकामा झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम केले जाऊ शकते, असे प्रकल्पाचे व्यवस्थापन करणाऱ्या तुंगभद्रा बोर्डाने सांगितले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी धरणाला भेट दिली. नेमके काय घडले? दरवाजा वाहून गेल्याने पूर परिस्थिती निर्माण होणार का? शेतकरी का घाबरले आहेत? याबाबत जाणून घेऊ.

दरवाजा कसा तुटला?

तुंगभद्रा धरणाला एकूण ३३ दरवाजे आहेत. या पुलाचे संपूर्ण बांधकाम दगडाचे आहे. हे दरवाजे रोलर्सद्वारे वर होतात. ते एखाद्या लिफ्टप्रमाणे काम करतात. ओव्हरहेड ब्रिजवरून या दरवाजांवर नियंत्रण ठेवण्यात येते. “शनिवारी (१० ऑगस्ट) १० स्पिलवे गेट्स कार्यरत होते. म्हणजे १२ ते २१ या क्रमांकांचे दरवाजे १.५ फूट उंचीपर्यंत उघडण्यात आले होते. या दरवाजांतून होणारा विसर्ग २२,८९० क्युसेक इतका होता,” असे तुंगभद्रा बोर्डाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे. ‘स्पिलवे’ किंवा ‘ओव्हरफ्लो चॅनेल’ ही जलाशयातून नियंत्रित पाणी सोडण्यासाठी वापरली जाणारी एक रचना आहे. “या घटनेदरम्यान म्हणजे रात्री १०.५० वाजता स्पिलवे गेट क्रमांक १९ ची साखळी तुटली आणि दरवाजा वाहून गेला”, असे या या निवेदनातून सांगण्यात आले.

तुंगभद्रा नदीवरील दगडी बांधाच्या या धरणातील ३३ पैकी एक दरवाजा वाहून गेला. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : भारतातील कोचीन ज्यू समुदाय नामशेष होण्याच्या मार्गावर; कारण काय? जाणून घ्या या समुदायाचा इतिहास

तुंगभद्रा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जे. पुरुषोत्तम यांनी सांगितले की, धरणातील पाण्याच्या जोराने सुमारे २० टन वजनाचा ६० फूट बाय २० फूट आकाराचा दरवाजा वाहून गेला. स्थानिक सूत्रांनी सांगितले की, तीन ते चार वर्षांपूर्वी स्पिलवे गेट्सच्या साखळी लिंकवर वेल्डिंगचे काम करण्यात आले होते. पुरुषोत्तम म्हणाले की, साखळी लिंक जुन्या झाल्याने क्रेस्ट गेट्स चालविण्यासाठी त्या जागी स्टीलच्या केबल्स बसवण्यात येणार होते. बागलकोट जिल्ह्यातील अलमट्टी धरणात अशी व्यवस्था आहे.

जलाशयातील पाणीसाठा

१० ऑगस्ट रोजी जलाशयाची पातळी १,६३३ फूट होती आणि तुंगभद्रा बोर्डाच्या आकडेवारीनुसार धरण त्याच्या क्षमतेनुसार सुमारे १०५.८ हजार दशलक्ष घन (टीएमसी) फूट भरले होते. धरणातील पाण्याची आवक ४०,९२५ क्युसेक (घनफूट प्रतिसेकंद) इतकी होती आणि २८,१३३ क्युसेक पाणी धरणातून सोडण्यात येत होते. तुंगभद्रा बोर्डाचे सचिव ओ.आर.के. रेड्डी यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, धरणातील आवक वाढल्यामुळे २२ जुलै रोजी तीन दरवाजांमधून पाणी सोडण्यात आले आणि त्यानंतर आणखी आवक वाढल्याने १ ऑगस्ट रोजी सुमारे १.६५ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले.

रणातील आवक वाढल्यामुळे २२ जुलै रोजी तीन दरवाजांमधून पाणी सोडण्यात आले. (छायाचित्र-पीटीआय)

सोमवारी पाण्याची पातळी जवळपास १,६३१ फूट होती आणि जलाशयाची क्षमता ९७.७५ टीएमसी फूट होती, असे बोर्डाने सांगितले. वर्षानुवर्षे आता धरणाच्या मूळ क्षमतेच्या ३० टक्के जास्त भरत आहे. या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारने समतोल राखणारा जलाशय तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

नद्यांचा जलस्रोत

पश्चिम घाटात उगवणाऱ्या तुंगा आणि भद्रा या दोन प्रवाहांच्या संगमानंतर तयार होणारी तुंगभद्रा आंध्र प्रदेशातील संगमलेश्वरम येथे वाहते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेचा भाग असलेल्या या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र जवळजवळ ७० हजार चौरस किलोमीटर इतके आहे. तुंगभद्रा जलाशय प्रामुख्याने कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यात ३७८ चौरस किमी क्षेत्रफळावर पसरलेला आहे. हे धरण दक्षिण भारतातील प्रमुख जलाशयांपैकी एक आहे. हे धरण सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी, तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करते.

रायलसीमामध्ये वारंवार पडणाऱ्या दुष्काळाचा प्रभाव कमी करण्यासाठी या धरणाची संकल्पना १८६० मध्ये सुचवण्यात आली होती. हैदराबाद आणि मद्रासच्या पूर्वीच्या सरकारांनी १९४५ मध्ये याचे बांधकाम सुरू केले आणि हा प्रकल्प १९५३ मध्ये पूर्ण झाला. तुंगभद्रा बोर्डाची स्थापना १९५३ मध्ये अध्यक्षीय आदेशाने करण्यात आली होती. सध्या केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेले अध्यक्ष आणि चार सदस्य केंद्र सरकार आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, तसेच तेलंगणा या राज्यांचे प्रतिनिधित्व करतात.

भीतीचे कारण काय?

वाहून गेलेला दरवाजा धरणाच्या मध्यभागी होता आणि जलाशयातील ६० ते ६५ टक्के पाणी सोडल्यानंतरच दुरुस्ती सुरू करता येऊ शकते. तज्ज्ञांशी सल्लामसलत करून ही दुरुस्ती लवकरात लवकर केली जाईल, असे तुंगभद्रा बोर्डाने म्हटले आहे. “नवीन स्टॉप लॉक गेट तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे काम आठवडाभरात पूर्ण होईल,” असे बोर्डाने सांगितले.

हेही वाचा : ऑलिम्पिक पदकांची खरी किंमत किती? २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक पदकांमध्ये काय वेगळेपण होते?

दुरुस्ती करण्यासाठी जलाशयातून जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने सिंचनावर परिणाम होईल, अशी भीती वरील भागात राहणार्‍या शेतकऱ्यांना आहे; तर धरणातून पाण्याचा ओघ वाढल्याने खालील भागात राहणार्‍या स्थानिकांना पुराची भीती आहे. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने खालच्या भागात पूर येण्याचा इशारा जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. मात्र, येत्या काही दिवसांत या भागात अतिवृष्टीचा अंदाज नाही. गेल्या वर्षी राज्यात भीषण दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही किंवा पेरणी झाली नव्हती. मात्र, यंदा पावसाचा जोर वाढला आहे.