Dubai Flood संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) ७५ वर्षांतील सर्वांत जास्त पाऊस पडला. हवामान निरीक्षकांनुसार २४ तासांत २५९.५ मिमी म्हणजेच १०.२ इंच पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. यूएईच्या अरबी वाळवंटात वसलेल्या दुबईला याचा चांगलाच फटका बसला. घरांचे आणि व्यवसायांचे नुकसान झाले, हवाई प्रवास विस्कळित झाला आणि आर्थिक शहर ठप्प पडले. यूएईतील वाम या वृत्तसंस्थेनुसार, यूएईच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मुसळधार पाऊस पडला. १९४९ मध्ये जेव्हापासून डेटा संकलन सुरू झाले, तेव्हापासून यांसारख्या परिस्थितीची कुठेच नोंद नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी देशाच्या पायाभूत सुविधांचा तातडीने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘वाम’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना संपूर्ण यूएईतील पायाभूत सुविधांच्या स्थितीचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी यूएईला एकूण किती खर्च येईल? यूएई ही परिस्थिती कशी हाताळत आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

यूएईच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मुसळधार पाऊस पडला. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : दुबईतील पूरस्थितीला कृत्रिम पाऊसच ठरला का कारणीभूत?

पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी किती खर्च येणार?

संयुक्त अरब अमिरातीने बुधवारी (२४ एप्रिल) अमिराती कुटुंबांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी ५४४ दशलक्ष डॉलरची घोषणा केली. गेल्या आठवड्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे दुबईसह आजूबाजूंच्या काही शहरांत मोठ्या प्रमाणावर पूर आला; ज्यामुळे संपूर्ण राज्यकारभार ठप्प झाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान मोहम्मद रशीद अल-मकतूम म्हणाले, “आम्ही या पूरस्थितीला तोंड देताना चांगलाच धडा शिकलो आहे. आम्ही नागरिकांच्या घरांचे नुकसान भरून काढण्यासाठी दोन अब्ज दिऱ्हॅम (४६ अब्ज रुपये) निधी मंजूर केला आहे.”

वाळवंटात आलेल्या महापुराने रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर केले आहे. पर्यटकांसाठी दुबई सर्वांत आवडते ठिकाण आहे. परंतु, या महापुराने दुबईच्या विमानतळाचेही नुकसान केले आहे. त्यामुळे अनेक उड्डाणे अजूनही सुरू झालेली नाहीत. या संपूर्ण परिस्थितीचा पाठपुरावा करण्यासाठी एका मंत्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे आणि फेडरल व स्थानिक प्राधिकरण या मदतीने नुकसानभरपाईचे वितरण करण्यात आले आहे,” असे दुबईचे शासक शेख मोहम्मद म्हणाले आहेत.

वाळवंटातील महापुराने रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर केले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

७५ वर्षांतील सर्वांत जास्त पावसाने आलेल्या पुरामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन फिलिपिनो कामगार आणि एका अमिराती नागरिकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप यूएई अधिकाऱ्यांनी अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. कॅबिनेट मंत्र्यांनी पायाभूत सुविधांचे नुकसान नोंदविण्यासाठी आणि उपाय सुचविण्यासाठी आणखी एक समिती स्थापन केली आहे, असे शेख मोहम्मद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. “ही परिस्थिती अतिशय गंभीर होती; परंतु प्रत्येक अनुभवातून शिकणारा आमचा देश आहे,” असे ते म्हणाले.

परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रयत्न

हवामानाच्या घटनांवरील ग्लोबल वॉर्मिंगच्या भूमिकेचे मूल्यांकन करणारे हवामानशास्त्रज्ञ फ्रेडरिक ओट्टो यांनी, ‘एएफपी’ला सांगितले की, ही परिस्थिती मानवनिर्मित आहे. हवामान बदलामुळे पाऊस जास्त झाला असण्याची उच्च शक्यता आहे. ओमानच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ १४ एप्रिल रोजी ओमानमध्ये आले, जिथे किमान २१ लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर १७ एप्रिलला हे वादळ यूएईकडे वळले, जिथे जगातील स्मार्ट शहरांपैकी एक असलेल्या दुबईला याचा सर्वाधिक फटका बसला. अनेक दिवस पाणी तुंबलेले रस्ते आणि पूरग्रस्त घरे यांमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत दुबई विमानतळाने २,१५५ उड्डाणे रद्द केली आणि ११५ उड्डाणे वळवली. अनेक पर्यटक येथे अडकून होते.

हळूहळू दुबई पूर्वपदावर येत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

“हे आपण मान्य करायला हवे की, सेवा आणि संकट व्यवस्थापनात आपली व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आम्ही आशा करतो की, भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही,” असे प्रख्यात अमिराती विश्लेषक अब्दुल खलिक अब्दुल्ला ‘एक्स’वर म्हणाले.

हेही वाचा : गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?

दुबई पूर्वपदावर येण्याच्या प्रयत्नात

दुबईला या पुराचा सर्वाधिक फटका बसला. दुबईमध्ये अनेक दिवस संपूर्ण कामकाज ठप्प होते. लोकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले होते. सार्वजनिक वाहतूक ठप्प होती. सर्व बाजारपेठा बंद होत्या. संपूर्ण दुबईमध्ये पाणीच पाणी झाले होते. आता हळूहळू दुबई पूर्वपदावर येत आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे कार्यरत आहे आणि सर्व प्रमुख रस्ते खुले करण्यात आले आहेत. परंतु, यूएईच्या बिझनेस हबमध्ये राहणारे ५६ वर्षीय ब्रिट मॅथ्यू फॅडी म्हणतात, “पूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही दिवस लागतील.” ते सांगतात, “त्यांच्या तळमजल्यावरील अपार्टमेंटदेखील पाणी भरले होते. पाण्याने अपार्टमेंटची अर्धा मीटर भिंत फोडली होती. आता हळूहळू पाणी उतरत आहे”, असे त्यांनी सांगितले. “पूर आला त्या दिवशी अपार्टमेंटमध्ये जवळजवळ चार ते पाच फुटांपर्यंत पाणी भरले होते. आता ते गुडघ्याच्या खाली आले आहे. मला वाटतं, पाणी पूर्णपणे उतरायला अजून एक आठवडा लागेल,” असे फॅडी म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uae dubai flood money need to rebuild infrastructure rac
Show comments