Vishleshan Artificial Intelligence machine Learning of technology chat of GPT discussion print exp 0223 ysh 95 | Loksatta

विश्लेषण : चॅट जीपीटी : बुद्धिमान की बोलका पोपट?

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) आणि यंत्र शिक्षण (मशीन लर्निग) या तंत्रज्ञानांनी व्यवहारात घडवलेल्या सुधारणांचे कोडकौतुक पुरते होते न होते तोच तंत्रज्ञानाच्या वाटेवर येऊ घातलेल्या ‘चॅट जीपीटी’ची चर्चा जोरात सुरू आहे.

विश्लेषण : चॅट जीपीटी : बुद्धिमान की बोलका पोपट?
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

असिफ बागवान

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) आणि यंत्र शिक्षण (मशीन लर्निग) या तंत्रज्ञानांनी व्यवहारात घडवलेल्या सुधारणांचे कोडकौतुक पुरते होते न होते तोच तंत्रज्ञानाच्या वाटेवर येऊ घातलेल्या ‘चॅट जीपीटी’ची चर्चा जोरात सुरू आहे. केवळ विषयानुरूप प्रश्नांची उत्तरे न देता प्रश्नांमागच्या ‘भावना’ ओळखून त्यानुसार संवाद साधण्याची क्षमता असलेले ‘चॅट जीपीटी’ गाणे लिहू शकते, ते संगीतबद्ध करू शकते, लहानग्यांसाठी गोष्टी रचू शकते किंवा अगदी पटकथा-संवादलेखनही करू शकते, असा दावा करण्यात येत आहे. तो किती खरा आहे, हे मांडण्याचा प्रयत्न.

‘चॅट जीपीटी’ म्हणजे काय?

‘चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्म’ अर्थात ‘चॅट-जीपीटी’ ही अमेरिकेतील ‘ओपन एआय’ या संशोधन प्रयोगशाळेची निर्मिती आहे. याची कार्यपद्धती ‘चॅटबॉट’सारखीच आहे. चॅट बॉट ही संगणकीय प्रतिसाद प्रणाली आहे. अपेक्षित प्रश्नांची ठोकळेबाज उत्तरे देण्याचे काम चॅटबॉट करते. गेल्या काही वर्षांत ग्राहकांच्या शंकानिरसन किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी चॅटबॉट प्रणालीचा वापर वाढला आहे. ‘चॅट जीपीटी’ याच प्रणालीचे विकसित रूप आहे. साचेबद्ध उत्तरे न देता ‘कल्पकतेचा’ वापर करून संभाषण करण्याची कला या तंत्रज्ञानाला अवगत आहे.  हे तंत्रज्ञान समोरच्या व्यक्तीच्या संभाषणातील त्रुटी ओळखून, त्या दुरुस्त करून अपेक्षित उत्तर सादर करू शकते. तसेच ते स्वत:च्या चुकांची कबुलीही देऊ शकते. ते कोणत्याही प्रश्नाचे अचूकतम उत्तर देऊ शकते आणि एखादा प्रबंधही लिहू शकते.

हे तंत्रज्ञान काम कसे करते?

‘ओपन एआय’ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘चॅट जीपीटी’चे प्राथमिक सादरीकरण केले. ‘ओपन एआय’च्या ‘जीपीटी ३’ तंत्रज्ञानाचा हा एक भाग आहे. ‘चॅट जीपीटी’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे केवळ संगणकीय माहितीचा वापर करण्यात येत नाही तर, त्याला मानवी प्रतिसादांचीही जोड देण्यात आली आहे. त्यासाठी विविध विषयांतील प्रशिक्षकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर तंत्रज्ञानाने निश्चित केलेल्या आधीच्या संवादांची पुन्हा मानवी प्रशिक्षकांमार्फत चाचणी करून त्याचे गुणात्मक मूल्यांकन करण्यात आले. त्यातून ‘चॅट जीपीटी’ विकसित करण्यात आले.

‘चॅट जीपीटी’ काय काय करू शकते?

संवादक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर ही नवीन बाब उरलेली नाही. गेल्या सात-आठ वर्षांपासून चॅटबॉट आणि अन्य माध्यमांतून हे तंत्रज्ञान व्यवहारात वापरले जात असून त्याची उपयुक्तताही दिसून आली आहे. एका अहवालानुसार, १९० देशांमधील ८० कोटींहून अधिक नागरिक विविध कामांसाठी ‘चॅटबॉट’चा वापर करत आहेत. ‘चॅटबॉट’पेक्षाही अधिक विकसित ‘चॅट जीपीटी’ विविध क्षेत्रांसाठी क्रांतिकारी ठरू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चॅट जीपीटीचा वापर लेखन, संगीत, गीतरचना अशा कलात्मक कामांमध्ये करता येईल, असा दावा करण्यात येत आहे. शिवाय संगणकीय प्रोग्रॅम विकसित करणे, त्यातील दोष शोधून दूर करणे अशी कार्येही हे तंत्रज्ञान करू शकते. या तंत्रज्ञानाचा वापर आरोग्य उपचार पद्धतींमध्ये करता येऊ शकेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

खरेच हे सर्जनशील आहे?

‘चॅट जीपीटी’च्या साह्याने लेखनासारखी कामे पार पडतील, असा दावा करण्यात आल्यापासून या तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक चर्चा याच मुद्दय़ावर सुरू आहे. हे तंत्रज्ञान सर्जनशील असल्याचे कौतुकही सुरू झाले. मात्र, यात फारसे तथ्य नाही. ‘चॅट जीपीटी’ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि त्यात आधी नोंदवलेल्या प्रतिसादांचा आधार घेऊन कविता किंवा कथा किंवा निबंध तयार करू शकते. त्यामुळे त्यात अस्सलपणा असण्याची शक्यता फारच कमी आहे.

प्रतिसादावरच तंत्रज्ञानाचा डोलारा?

‘चॅट जीपीटी’चे सादरीकरण नोव्हेंबर २०२२मध्ये करण्यात आले असले तरी, त्यावर काम खूप आधीपासून सुरू होते. त्यामुळे ‘चॅट जीपीटी’कडे २०२१ नंतरच्या घटनांबाबतचे ज्ञान मर्यादित असल्याचे सांगण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान एका महाकाय विदासंग्रहावरच अवलंबून आहे. त्यामुळे या विदाकक्षेबाहेरील माहितीबाबत ते अचूक नसेल, हे ‘ओपन एआय’देखील मान्य करते. त्यामुळे ‘ओपन एआय’ची भिस्त हा विदासंग्रह अधिकाधिक विस्तारण्यावर आहे. या तंत्रज्ञानाचा वापर जसजसा वाढत जाईल, तसतसे त्याच्या वापरकर्त्यांकडील माहिती ‘शोषून’ हे तंत्रज्ञान अचूकतम होईल, असा कयास बांधण्यात येत आहे. आजघडीला या तंत्रज्ञानाच्या वापरकर्त्यांची संख्या दहा कोटींच्या घरात आहे. मात्र, यातील बहुसंख्य वर्ग केवळ उत्सुकतेपोटी त्याच्याशी जोडला गेला आहे. वापरकर्त्यांकडून मिळणारी माहितीच या तंत्रज्ञानाचे भविष्य ठरवणार आहे. त्या माहितीचा पुरवठा कसा होतो, यावर हे तंत्रज्ञान बुद्धिमान आहे की निव्वळ बोलका पोपट हे ठरेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 00:02 IST
Next Story
विश्लेषण : उत्तर तारा म्हणजे नेमकं काय? दोन दिग्गजांनी काय उल्लेख केला?