विश्लेषण: Classified Documents प्रकरण काय? बायडेन, ट्रम्प, पेंस सारखे मोठे नेते का आले अडचणीत? | What is Classified documents in America which could create problems for joe biden donald trump mike pence | Loksatta

विश्लेषण: Classified Documents प्रकरण काय? बायडेन, ट्रम्प, माइक पेंस सारखे मोठे नेते का आले अडचणीत?

अमेरिकेमध्ये Classified Documents चे प्रकरणामुळे वादळ उठले आहे. अनेक आजी-माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुढच्या निवडणुकीत इच्छूक असलेले उमेदवार यामुळे अडचणीत आले आहेत.

What is Classified documents in America
Classified Documents प्रकरणात जो बायडेन, डोनाल्ड ट्रम्प, माइक पेंस अडचणीत सापडले आहेत.

अमेरिकेमध्ये सध्या Classified Documents म्हणजेच गोपनीय दस्तऐवजचा मुद्दा गाजत आहे. अमेरिकेचे आजी-माजी राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नुकतेच माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते माइक पेंस यांच्या घरी गोपनीय दस्तऐवज सापडले आहेत. माइक पेंस यांच्या वकिलांनी सांगितले की, जवळपास डझनभर गोपनीय दस्तऐवज त्यांच्या घरी प्राप्त झाले आहेत. सर्व कागदपत्रे एफबीआयकडे सोपविण्यात आली आहेत. पेंस यांच्या घरी गोपनीय दस्तऐवज कसे पोहोचले, याचा तपास एफबीआय करणार आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घरी देखील गोपनीय दस्तऐवज सापडले होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी देखील गोपनीय दस्तऐवज मिळाले होते. अमेरिकेत चर्चेचा विषय ठरत असलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे? या प्रकरणात नेमकी किती शिक्षा होते? याबद्दल जाणून घेऊया.

कुणाकडे मिळाले गोपनीय दस्तऐवज?

माइक पेंस यांच्या घरी जवळपास डझनभर कागदपत्रे मिळाली. माझ्याकडे कोणतेही दस्तऐवज नाहीत, असा दावा ते सतत करत होते. माइक पेंस हे २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी करत होते, अशातच त्यांच्या घरी अशाप्रकारे गोपनीय दस्तऐवज सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देखील अडचणीत आले आहेत. वॉशिंग्टन येथील त्यांच्या कार्यालयात सदर गोपनीय दस्तऐवज मिळाले. आपले निवासस्थान आणि कार्यालयात देशाशी संबंधित गोपनीय दस्तऐवज बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. बायडेन २००९ पासून २०१६ पर्यंत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्या काळातील हे दस्तऐवज असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेचा न्याय विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे.

तर ऑगस्ट २०२२ मध्ये एफबीआयने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील निवासस्थानावर छापेमारी केली होती. त्यांच्याघरी एफबीआयला Classified Documents आढळून आले होते. तेव्हाच माईक पेंस यांचे वक्तव्य आले होते की, माझ्याकडे अशी कोणतीही कागदपत्रे नाहीत.

Classified Documents म्हणजे काय?

द वॉशिंग्टन पोस्ट आणि अमेरिकी माध्यमांच्या माहितीनुसार, गोपनीय दस्तऐवज म्हणजे ज्यामध्ये देशाची संवेदनशील माहिती असते. जी बाहेर आली तर राष्ट्रीय सुरक्षा आणि परदेशी संबंधाना बाधा पोहोचू शकते. तसेच गुप्त कारवाया, सैनिकी योजना आणि अण्वस्त्र योजनांशी संबंधित माहितीला गोपनीय दस्तऐवजमध्ये गणले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत गोपनीय दस्तऐवज जतन करण्याची पद्धत सुरु झाली. हे दस्तऐवज ईमेल, छायाचित्र, मानचित्र, डेटाबेस किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट स्वरुपात देखील असू शकतात. माहितीचे माध्यम कोणतेही असले तरी ते गोपनीय दस्तऐवजमध्ये मोडले जाते.

Classified Documents वर्गीकरण कसे होते?

आऊटलूकच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत गोपनीय दस्तऐवजासंबंधी ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी एक शासन निर्णय काढून याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि न्याय विभागाची सुरक्षेला किती हानी पोहचू शकते यावरुन गोपनीय दस्तऐवजचे तीन प्रकार बनविण्यात आले आहेत.

१. टॉप सीक्रेट
या प्रकारात अमेरिकेतील सर्वात गुप्त आणि अतिसंवेदनशील माहिती समाविष्ट असते. जर ही माहिती बाहेर आली तर राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका उद्भवू शकतो. असे दस्तऐवज पाहण्याची परवानगी काही उच्चपदस्थ मर्यादित लोकांकडेच असते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी सापडलेले काही दस्तऐवज हे टॉप सीक्रेट गटात मोडणारे होते.

२. सीक्रेट
हे दस्तऐवज देखील संवेदनशील प्रकारात मोडतात. मात्र याचा धोका टॉप सीक्रेटपेक्षा थोडा कमी असतो. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाशी संबंधित माहिती यामध्ये असते. जसे की, गुप्तचर कारवायांसाठी केलेली आर्थिक तरतूद वैगरे..

३. गोपनीय (confidential)
या प्रकारातील दस्तऐवज हे तेवढे संवेदनशील मानले जात नाहीत. हे बाहेर आल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होत नाही. अनेक विभागातील सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना हे दस्तऐवज हाताळण्याची परवानगी असते.

गोपनीय दस्तऐवज बाहेर आल्यास काय शिक्षा होते?

गोपनीय दस्तऐवजाची सुरक्षा करण्यासाठी अमेरिकेत प्रेसिंडेन्शियल रेकॉर्ड्स अॅक्ट १९७८ बनविण्यात आला आहे. या माध्यमातून दस्तऐवजाचे नियंत्रण व सरंक्षण केले जाते. जर असे दस्तऐवज बाहेर आले तर त्याची चौकशी अमेरिकेच्या न्याय विभागाकडून केली जाते. यामध्ये दस्तऐवजाचा स्तर कोणता होता? याची निश्चिती केली जाते. स्तर ठरल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या विरोधात महाभियोग चालवला जातो. अशाच एका प्रकरणात डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या हिलरी क्लिंटन यांचे राष्ट्राध्यक्ष बनण्याचे स्वप्न भंगले होते. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी दस्तऐवज सापडल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊ असा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 19:11 IST
Next Story
विश्लेषण: पद्म पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? हा पुरस्कार नाकारणारे चार भारतीय कोण होते?