अमेरिका, कॅनडा आणि क्युबा हे देश रविवारी, ५ नोव्हेंबरपासून घड्याळातील वेळ एक तासभर मागे नेत आहेत. येथे उन्हाळ्यात घड्याळे तासभर पुढे केली जातात. त्याला ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ म्हणतात. हिवाळ्यात हा काळ संपल्यानंतर घड्याळे एक तास पुन्हा मागे केली जातात. अमेरिकेसह या दोन देशांत येत्या रविवारी निरनिराळ्या स्थानिक वेळेनुसार पहाटे दोनपासून घड्याळे तासभर मागे घेण्यात येणार आहेत. यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या असताना ही प्रथा कशी थांबवायची की नाही, यावर मात्र अमेरिकेत पुन्हा एकदा वादविवाद सुरू झाले आहेत. त्याविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ म्हणजे काय?

उन्हाळ्यातील महिन्यांत घड्याळे एक तास पुढे नेण्याच्या प्रथेस ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ म्हटले जाते. या काळात सूर्यप्रकाश संध्याकाळी उशिरापर्यंत असतो. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील बहुतांश भाग आणि युरोपीय देश ही प्रथा पाळतात. परंतु इतर देश विशेषत: विषुववृत्ताजवळील प्रदेश तसे करत नाहीत. ही प्रथा सुरुवातीपासूनच वादग्रस्तच ठरली आहे. अनेक देशांनी आतापर्यंत ती अनेकदा स्वीकारली आणि नाकारलीही आहे. ऊर्जेच्या सुसंगत वापरासाठी सात वर्षांच्या खंडानंतर ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ पुन्हा सुरू करण्याची घोषणा इजिप्तने मार्चमध्ये केली होती. २०२० च्या ऑलिम्पिकसाठी जपानने ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’चा अवलंब करण्याचा विचार केला. मात्र त्याला जनसमर्थन न लाभल्याने आणि अनेक तांत्रिक अडचणींमुळे जपानने हा विचार बाजूलाच ठेवला.

२०२३ चा ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ कधी संपणार?

अमेरिका आणि काही शेजारील देशांत ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ ५ नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे दोन वाजता संपेल. त्यानंतर या भागातील घड्याळे एक तास मागे नेण्यात येतील. ब्रिटन आणि अन्य युरोपीय देशांमध्ये ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ला ‘उन्हाळ्याचा काळ’ (समर टाइम) असेही संबोधले जाते. हा काळ २९ ऑक्टोबर रोजी संपला. अमेरिकेत ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ मार्चमधील दुसऱ्या रविवारी सुरू होतो आणि नोव्हेंबरमधील पहिल्या रविवारी संपतो. यंदा ५ नोव्हेंबर रोजी पहिला रविवार येत आहे. ब्रिटन आणि युरोपीय महासंघात मात्र हा काळ मार्चमधील अखेरच्या रविवारी सुरू होतो आणि ऑक्टोबरमधील अखेरच्या रविवारी संपतो.

‘डेलाइट सेव्हिंग’ का तयार केला गेला?

ऋतूंनुसार घड्याळे बदलण्याची ही कल्पना १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मास आली. न्यूझीलंडचे कीटकशास्त्रज्ञ जॉर्ज हडसन यांनी ऊर्जाबचतीसाठी आणि उन्हाळ्याचे उजेडाचे दिवस वाढवण्यासाठी हे सुचवले होते. हडसन हे कीटकशास्त्रज्ञ असल्याने आपल्या कामानंतर कीटक संकलनाचा छंद जोपासण्यासाठीही त्यांनी ही सूचना केली असावी. पहिल्या महायुद्धापर्यंत ही कल्पना फारशी रूढ नव्हती. परंतु इंधनबचतीसाठीच्या उपायांचा शोध घेताना युरोपीय देशांनी ही पद्धत स्वीकारण्यास सुरुवात केली. १९१६ मध्ये ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ स्वीकारणारा जर्मनी हा पहिला युरोपीय देश होता आणि त्यानंतर १९१८ मध्ये अमेरिकेने ही पद्धत स्वीकारली.

हेही वाचा… विश्लेषण: कौटुंबिक कलह, नैराश्य, तंदुरुस्ती… मोहम्मद शमीने विविध आव्हानांवर कशी केली मात? विश्वचषकातील कामगिरी किती खास?

अमेरिकेनेनंतर १९६६ मध्ये एकसमान प्रमाणवेळेच्या कायद्यात ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’चा अंतर्भाव करण्यापूर्वी या प्रथेत अनेक बदलही झाले. या कायद्यातून बाहेर पडण्याची अमेरिकेतील राज्यांना मुभा असली तरी ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ कायम ठेवण्याची त्यांना मुभा नाही. अमेरिकेत शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’चा अवलंब केला गेला, अशी सर्वसामान्य समजूत आहे. वास्तवात मात्र अमेरिकेतील बरेच शेतकरी या प्रथेमुळे त्यांच्या वेळापत्रकात व्यत्यय येत असल्याने या प्रथेला विरोध करत असतात.

‘डेलाइट सेव्हिंग टाइम’चे दुष्परिणाम आहेत का?

‘काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस’च्या अभ्यासानुसार इंधन वाचवण्याचा मूळ हेतूही यातून साध्य होतो की नाही याबाबत शंकाच आहे. कारण, त्यांनी केलेल्या अभ्यासात दिवसपाळी वाढवल्याने होणारी ऊर्जा बचत अत्यल्पच आढळली. ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’चे विरोधक याच्या इतर दुष्परिणामांकडेही लक्ष वेधतात. त्यांच्या मते दिवसाच्या प्रकाश बचत वेळेचा थेट आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होताना आढळतो. कारण मार्चमध्ये घड्याळे तासभर पुढे केल्यानंतर प्राणघातक वाहतूक अपघातांचा धोका वाढतो. तासभर दिवस पुढे गेल्याने झोपेचे तास विस्कळीत होतात. परिणामी अपुऱ्या झोपेमुळे पक्षाघात, हृदयविकाराचा झटका आदी जोखमीत दर वर्षी मार्चनंतर चिंताजनक वाढ होते.

अमेरिकेत सर्व राज्ये ‘डेलाइट सेव्हिंग’ पाळतात का?

अमेरिकेत हवाई आणि ॲरिझोना (‘नवाहो नेशन’ वगळता) ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ पाळत नाहीत. अमेरिकन सामोआ, गुआम, नॉर्दर्न मारियाना द्वीपसमूह, प्युएर्तो रिको आणि व्हर्जिन द्वीपसमूह ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ न पाळता कायमस्वरूपी प्रमाण वेळ पाळतात. मात्र अमेरिकेतील इतर बहुतांश राज्यांत व्यापक प्रमाणात ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’पाळले जाते. ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स’नुसार ‘अमेरिकन काँग्रेस’ने परवानगी दिल्याने १९ राज्यांनी ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ वापरण्यासाठीचे कायदे मंजूर केले आहेत.

अमेरिका ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ थांबवणार का?

अमेरिका ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ची प्रथा लवकर थांबवेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेतील सरकारच्या काही घटकांचा तथाकथित ‘सनशाईन प्रोटेक्शन ॲक्ट’ मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. या कायद्यामुळे ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ची पद्धत कायम राखली जाईल. २०२२ मध्ये दोन्ही पक्षांच्या अमेरिकन सिनेट सदस्यांच्या गटाने सादर केलेल्या या कायद्याचे विधेयक आवाजी मतदानाने ‘सिनेट’मध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. परंतु अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) हा कायदा मंजूर होऊ शकला नाही. कारण प्रमाण वेळ ठेवायची की कायमस्वरूपी ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ ठेवायचा यावर या सभागृहातील प्रतिनिधींत सहमती होऊ शकली नाही. सिनेट सदस्यांच्या गटाने यंदा पुन्हा हे विधेयक सादर केले असून, ते पुनर्विलोकनासाठी वाणिज्य, विज्ञान आणि परिवहन समितीकडे पाठवले गेले आहे. अध्यक्ष जो बायडेन यांनी या विधेयकाच्या मसुद्यावर अंतिम मंजुरीची स्वाक्षरी करण्यापूर्वी हे विधेयक सिनेट आणि प्रतिनिधिगृहाने मंजूर करणे आवश्यक आहे.

abhay.joshi@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is daylight saving time the united states canada and cuba will move their clocks back an hour print exp dvr