मोबाइल स्क्रीनच्या विळख्यात अडकलेले लोक विशेषतः तरुण ही एक नवी सामाजिक समस्या बनू लागली आहे. लोकांनाही सतत मोबाइलवर रील्स किंवा अन्य कंटेंट पाहण्याच्या व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव होऊ लागली आहे. मात्र त्यातून बाहेर कसे पडायचे हा कळीचा मुद्दा आहे. यासाठी ‘डिजिटल फास्टिंग’ हा नामी उपाय ठरत आहे.
डिजिटल फास्टिंग म्हणजे काय?
वजन कमी करण्यासाठी ‘इंटरमिटंट फास्टिंग’ ही संकल्पना अनेकांच्या पसंतीस उतरत असते. म्हणजे ठराविक काळापर्यंत तोंडावर ताबा ठेवणे, काहीही न खाणे. डाएटच्या या प्रकारासारखेच असते डिजिटल फास्टिंग. याला ‘डिजिटल डिटॉक्स’ असेही म्हटले जाते. डिजिटल फास्टिंग म्हणजे ठराविक काळासाठी कोणतेही डिजिटल डिव्हाइस किंवा तंत्रज्ञान न वापरणे.
डिजिटल फास्टिंग अमलात कसे आणावे?
डिजिटल उपवासात असताना लोक समाजमाध्यमांचा वापर करणे टाळतात. यामुळे लक्ष विचलित होणे, तुलना होणे आदि नकारात्मक भावनांपासून ते दूर राहतात. मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर्स आदि डिजिटल उपकरणांवरील वापराला मर्यादा आणतात. लोक बहुतेक त्यांच्या मोबाइल फोनवरील नोटिफिकेशन बंद ठेवतात, जेणेकरून नोटिफिकेशन पाहून ती लिंक उघडून पाहण्याचा मोह त्यांना होणार नाही.
डिजिटल फास्टिंगचे फायदे काय आहेत?
बहुतेक लोकांच्या हातात आजकाल मोबाइल फोन असतोच. त्यात बऱ्यापैकी इंटरनेट कनेक्शन आणि डेटाही असतो. त्यामुळे लोकांचे दिवसातले अनेक तास इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवरील रील्स पाहण्यात वाया जातात. तासच्या तास वाया गेले आणि हाती काहीच लागलं नाही, असे कळल्यावर लोक चिडचिडे होतात. मात्र या स्क्रोलिंगवर नियंत्रण आणल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात. तीन मुख्य फायदे म्हणजे – मानसिक स्वास्थ्य, चांगली झोप आणि वाढणारी उत्पादकता. समाजमाध्यमांचा गरजेपुरताच वापर केला तर ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाण कमी होते. रात्री योग्य वेळीच हातातून फोन दूर सारला गेला तर झोप चांगली येते. झोपेची गुणवत्ता सुधारते. त्याचाही थेट संबंधी ताणतणावांशी आहे. आणि या दोन्हींचा संबंध उत्पादकतेशी आहे. ताजेतवाने जागे व्हाल तर दिवसभर फ्रेश राहाल. स्क्रीनचा वेळ कमी झाला तर कामाकडे लक्ष केंद्रित करता येईल आणि पर्यायाने उत्पादकता वाढेल.
डिजिटल उपवास कधी करावा?
काही जण डिजिटल उपवासाचे हे व्रत रोजच्या रोज नित्यनेमाने करतात. दररोज काही तास ते मोबाइल पासून दूर राहतात. तर काहीजण काही दिवसांच्या खंडाने एक संपूर्ण दिवस किंवा अधिक दिवस किंवा विकेंडला मोबाइल किंवा अन्य डिजिटल उपकरणांपासून दूर राहतात.
सुरुवातीला अडथळ्यांची शर्यत
लोकांचा दिवसातील अर्ध्याहून अधिक वेळ स्क्रीनसमोर जातो. त्यामुळे स्क्रीनवरून पूर्णपणे लक्ष काढून घेणे लोकांना अशक्यप्राय आणि अव्यवहार्यही वाटते.काहींना गॅजेट्स पासून दूर राहिल्यास एकाकीपणाची भावना निर्माण होते. पण इलेक्ट्रॉनिक उपकरणे केवळ आभासी सुख देतात हे लक्षात येऊ लागलेले देखील अनेकजण आहेत. मोबाइलला दिला जाणारा वेळ प्रत्यक्ष माणसांना देणे, छंदांना देणे अधिक सुखाचे आहे.