२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने जगभरातील देशांमध्ये आपले सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवले आणि दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती जागतिक समुदायाला दिली आणि त्यांचा पाठिंबा मिळवला. त्याचीच नक्कल करत पाकिस्ताननेही आपली बाजू मांडण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि ब्रुसेल्स येथे एक शिष्टमंडळ पाठवले आहे. याचदरम्यान त्यांच्या माजी मंत्र्यांना एक प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्या भडकल्या.
स्काय न्यूजच्या पत्रकाराने पाकिस्तानच्या माजी राजदूत शेरी रहमान यांना विचारलेल्या एका प्रश्नामुळे अल कायदाच्या छत्राखाली काम करणारी ब्रिगेड ३१३ ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा प्रश्न विचारताच त्या भडकल्या. शेरी रहमान यांनी या गटाच्या भूतकाळातील हिंसक कृत्यांची कबुली दिली. त्या म्हणाल्या, तुम्हाला हे कोणी सांगितले हे मला माहीत नाही. तुम्ही जे बोलत आहात ती भाषा भारत जी कथा तयार करतो, त्याच्याशी जुळणारी आहे.” त्यांनी ब्रिगेड ३१३ च्या अल कायदाशी संबंधांबद्दलच्या दाव्यांना फेटाळले. काय आहे ब्रिगेड ३१३? ही संघटना कोणकोणत्या हल्ल्यात सहभागी आहे? याचा अल कायदाशी काय संबंध? जाणून घेऊयात.
ब्रिगेड ३१३ काय आहे?
- ब्रिगेड ३१३ ही अल कायदाची निमलष्करी शाखा असलेल्या लष्कर अल-झिलची ऑपरेशनल शाखा आहे.
- अरबीमध्ये अल-झिलचा अर्थ ‘शॅडो आर्मी’ असा होतो.
- हा गट एका संघटनेच्या रूपात काम करत नसून पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर सेवांमधून आलेल्या जिहादींच्या युतीच्या रूपात काम करतो.
- ही संघटना अफगाणिस्तान-पाकिस्तानी सीमेवर सर्वाधिक सक्रिय आहे.
- ब्रिगेड ३१३ ने द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) आणि पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) सारख्या प्रॉक्सी संघटनांना मदत केली आहे.
- एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफ संघटनेचा हात होता.
या संघटनेला ब्रिगेड ३१३ का म्हणतात?
ब्रिगेड ३१३ या गटाचे नाव त्यातील ३१३ सैनिकांचा आकडा सूचित करते. इस्लामिक परंपरेनुसार, ३१३ सैनिक बद्रच्या लढाईत पैगंबर मुहम्मद यांच्याबरोबर लढले होते. ब्रिगेड ३१३ मध्ये तालिबान, जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तैयबा (एलईटी), हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी (हुजी), लष्कर-ए-झांगवी आणि जुंदल्लाह यांसारख्या विविध बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा समावेश आहे.
ब्रिगेड ३१३ ची स्थापना कोणी केली?
ब्रिगेड ३१३ ची या गटाची स्थापना इलियास काश्मिरी याने केली होती. इलियास काश्मिरी पाकिस्तानी स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप (एसएसजी) चा माजी कमांडो आणि जिहादी होता. तो हुजीचा एक वरिष्ठ नेता आणि अल कायदाच्या लष्करी पदानुक्रमातील एक प्रमुख कमांडरदेखील होता. इलियास काश्मिरीचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत आणि अगदी अमेरिकेतील अनेक दहशतवादी कटांमध्ये सहभाग होता. २००९ मध्ये नजीबुल्लाह झझीचा समावेश असलेल्या न्यूयॉर्क सबवेवरील हल्ला आणि डॅनिश जिलँड्स-पोस्टेन वृत्तपत्रावर हल्ला करण्याच्या योजनेत त्याचादेखील सहभाग होता.
२०११ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तो मारला गेल्याचे वृत्त समोर आले होते. त्याला अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याच्या मृत्यूनंतर, त्याचे नेतृत्व शाह साहिब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमांडरकडे गेले असे सांगितले जाते.
ब्रिगेड ३१३ चा कोणकोणत्या हल्ल्यात समावेश?
ब्रिगेड ३१३ चा अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांमध्ये समावेश होता किंवा या संघटनेनी त्यांना पाठिंबा दिला होता.
- २००३ : पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येचा प्रयत्न.
- २००८ : तालिबान आणि पाकिस्तानच्या लष्करी उच्चभ्रूंमधील संबंध उघड करण्याची धमकी देणारे मेजर जनरल फैसल अल्वी यांची हत्या.
- २००९ : रावळपिंडी येथील आर्मी जनरल मुख्यालयावर (GHQ) हल्ला. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता.
- २००९ : अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात अमेरिकन मालमत्तेला लक्ष्य करून बॉम्बस्फोट.
- २०११ : ओसामा बिन लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कराची येथील पाकिस्तानी नौदल तळावर हल्ला. या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता.
ब्रिगेड ३१३ चा पाकिस्तानच्या लष्करी आणि गुप्तचर सेवांशी संबंध आहे का?
पाकिस्तानने अधिकृतपणे या गटापासून स्वतःला दूर ठेवले आहे आणि या गटाविषयी बोलणे टाळले आहे. परंतु, काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ब्रिगेड ३१३ अल कायदाशी वैचारिक निष्ठा राखून गुप्तपणे काम करत आहे.
‘टीआरएफ’चा पहलगाम हल्ल्यातील सहभाग
रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी)ची एक शाखा आहे. दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१९ मध्ये ‘कलम ३७०’ रद्द केला आणि भारत सरकारने जम्मू व काश्मीरचा विशेष घटनात्मक दर्जा रद्द करून, दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. त्यानंतर टीआरएफ हा गट अस्तित्वात आला.
तोपर्यंत काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा व जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. रेझिस्टन्स फ्रंटच्या नेतृत्वात साजिद जट्ट, सज्जाद गुल व सलीम रहमानी यांचा समावेश असून, हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या काही तासानंतर हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ने घेतली होती.