Pakistan to buy stealth fighter jets from China : दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला आहे. भारताच्या हवाई हल्ल्यांनी बिथरलेल्या पाकिस्तानने आता आपली हवाई यंत्रणा मजबूत करण्याचे ठरविले आहे. यासाठी त्यांनी संरक्षण खर्चात मोठी वाढ केली असून चीनकडून नवीन अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याची योजना आखली आहे. येत्या काही महिन्यांत चीन हा पाकिस्तानला स्टेल्थ फायटर जेट्सचा पुरवठा करणार आहे. ही लढाऊ विमाने पाचव्या पिढीतील असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्टेल्थ फायटर जेट्स नेमकी कशी असतात? ती रडारमध्ये का दिसत नाहीत? याबाबत जाणून घेऊ…

स्टेल्थ फाइटर जेट्स कशी असतात?

स्टेल्थ फाइटर जेट्स म्हणजे, अशी लढाऊ विमाने जी शत्रूच्या रडार, इन्फ्रारेड सेन्सर्स आणि अन्य नजर ठेवणाऱ्या प्रणालींना चकवून सहजपणे त्यांच्या हद्दीत प्रवेश करू शकतात. या विमानांचा ढाचा एका विशेष प्रकारच्या साहित्याने तयार केलेला असतो. विशेष बाब म्हणजे, ही विमाने रडारच्या लहरी शोषून घेतात. त्यामुळे शत्रू देशाला आपल्या हद्दीत विमान शिरलंय याची कोणतीही कुणकुण लागत नाही. ‘स्टेल्थ’ या शब्दाचा अर्थच लपून राहणं असा होतो. या लढाऊ विमानांमध्ये आंतरिक शस्त्र ठेवण्याची सोय, कमी उष्णता निर्माण करणारी इंजिन यंत्रणा आणि विशेष प्रकारचे बाह्य कोटिंग असल्यामुळे ती शत्रूच्या हद्दीत अगदी सहजपणे प्रवेश करून अचूक हल्ला करू शकतात. याच गुप्ततेमुळे या विमानांना पाचव्या पिढीतील ‘एलिट’ लढाऊ विमाने म्हणून ओळखलं जातं.

सध्या भारताकडे राफेलसारखी सामर्थ्यशाली लढाऊ विमाने असली तरी ती पूर्णतः ‘स्टेल्थ’ मानकांमध्ये बसत नाहीत. दुसरीकडे, चीनकडून पाकिस्तानला स्टेल्थ फायटर जेट्स पुरवण्याच्या हालचालींमुळे सुरक्षेच्या दृष्टीने भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी आपल्या प्रयत्नांना वेग दिला आहे. स्टेल्थ फायटर जेट्सचे महत्व आणि त्याची मागणी वाढत असल्यामुळे आगामी काळात दक्षिण आशियातील समीकरणं बदलण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा : भारताच्या ‘ब्रह्मोस’ला रोखण्यासाठी पाकिस्तानचे डावपेच; नेमकी काय आहे जर्मनीची IRIS-T SLM प्रणाली?

स्टेल्थ फायटर जेट्स इतकी खास का असतात?

  • स्टेल्थ फायटर जेट्स ही सामान्य लढाऊ विमानांपेक्षा प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असतात.
  • ही विमाने विशिष्ट प्रकारची साहित्य वापरून तयार केली जातात, ज्यामुळे ते रडारच्या तरंगांना शोषून घेतात किंवा दूर ढकलतात.
  • या विमानात उष्णता नियंत्रित करणारी उपकरणे बसवलेली असतात, ज्यामुळे थर्मल ट्रॅकिंग उपकरणांपासून बचाव करता येतो.
  • जुन्या लढाऊ विमानांमध्ये बाहेरच्या बाजूने शस्त्रे ठेवण्याची जागा असते, त्यामुळे ती सहजपणे शत्रूंच्या रडावर येतात.
  • मात्र, स्टेल्थ जेट्समध्ये शस्त्र ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची जागा तयार केलेली असते.
  • ही विमाने फक्त हवाई हल्ल्यांसाठीच नाही, तर जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ले करण्यासाठीही अत्यंत प्रभावी मानली जातात.
  • या आधुनिक वैशिष्ट्यांमुळेच स्टेल्थ फायटर जेट्सला जगातील पाचव्या पिढीतील सर्वोत्तम लढाऊ विमानांमध्ये गणलं जातं.
  • यामुळेच स्टेल्थ जेट्सचे सैन्यदलामधील महत्त्व निर्णायक ठरतं, पाकिस्तानकडून सध्या ही विमानं खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्टेल्थ फायटर जेट्स नेमकी कशी असतात? ती रडारमध्ये का दिसत नाहीत? (छायाचित्र पीटीआय)

कोणकोणत्या देशांकडे स्टेल्थ फायटर जेट्स?

सध्या फक्त काही देशांकडे स्टेल्थ फायटर जेट्स आहेत. अमेरिकेकडे ‘F-22 Raptor’ आणि ‘F-35 Lightning II’ ही आघाडीची स्टेल्थ विमाने आहेत. चीनने 2017 मध्ये J-20 हे लढाऊ विमान खरेदी करून स्टेल्थच्या यादीत प्रवेश केला आहे. सध्या चीन J-35 (FC-31) हे विमान विकसित करीत आहे. रशियाने देखील Su-57 हे स्टेल्थ विमानाची निर्मिती केली आहे; पण त्याची वापर क्षमता अद्याप मर्यादित आहे. भारत अजून स्टेल्थ फायटर जेटच्या वापराच्या टप्प्यावर पोहोचलेला नसला तरी हे लढाऊ विमान खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : पाकिस्तानने खास मित्र इराणला अण्वस्र विकासात मदत का केली नाही? इस्रायल इराण संघर्षात पाकची भूमिका काय आहे?

२०२४ मध्ये, केंद्र सरकारने ‘AMCA’ (Advanced Medium Combat Aircraft) या पूर्णतः स्वदेशी पातळीवर विकसित होणाऱ्या पाचव्या पिढीतील ट्विन इंजिन स्टेल्थ फायटर जेट प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे विमान अत्यंत वेगाने उड्डाण करून शकते आणि त्याचा ताशी वेग सुमारे २५०० किमी इतका आहे. या विमानात रडारपासून वाचण्यासाठीची स्टेल्थ रचना, शस्त्र ठेवण्याची जागा आणि अत्याधुनिक डेटा फ्यूजन सिस्टम्स यांचा समावेश असेल. २०३४ नंतरच हे पूर्णपणे भारतीय लष्करात दाखल होईल.

पाकिस्तानने चीनबरोबर केला करार

पाचव्या पिढीतील ’40 J-35’ही स्टेल्थ फायटर जेट्स विकत घेण्यासाठी पाकिस्तानने चीनबरोबर करार केला आहे. या विमानांची पहिली खेप ऑगस्ट २०२५ पाकिस्तानमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही लढाऊ विमाने ‘Shenyang Aircraft Corporation’ या चिनी कंपनीने तयार केलेली आहेत. अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 या लढाऊ विमानापेक्षाही चीनची विमाने अधिक चांगली असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या केवळ अमेरिका, चीन आणि रशिया यांच्याकडे पूर्णपणे कार्यक्षम पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट्स आहेत.

भारत, तुर्कस्तान, जपान, दक्षिण कोरिया आणि स्वीडन हे देश अद्याप स्टेल्थ विमाने विकसित करण्याच्या चाचणी प्रक्रियेत आहेत. अमेरिका या क्षेत्रात आघाडीवर असली तरी, चीनचा झपाट्याने होणारा विकास आणि पाकिस्तानसारख्या सहयोगी देशांना त्यांच्याकडून केला जाणारा स्टेल्थ तंत्रज्ञानाचा पुरवठा हा भारताची चिंता वाढवणारा ठरू शकतो. सध्यातरी भारत आणि इतर आघाडीच्या देशांमध्ये अंतर आहे, पण हे फार काळ टिकणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.