भारतीय लष्कराच्या इतिहासात फिल्ड मार्शल सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशा (१९१४-२००८) यांचे वेगळे आणि महत्त्वाचे स्थान आहे. सॅम माणेकशा यांना सॅम बहादूर या नावानेही ओळखले जात होते. याच नावाने त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन आज होत आहे. अतुलनीय शौर्य आणि तल्लख विनोदबुद्धी असलेल्या माणेकशा चार दशकांच्या लष्करी सेवेत पाच युद्धांना सामोरे गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात दुसऱ्या महायुद्धापासून ते १९७१ च्या पाक युद्धात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. १९७१ च्या पाक युद्धात फिल्ड मार्शल असलेल्या माणेकशा यांच्या नेतृत्वात भारताचा निर्णायक विजय झाला होता. माणेकशा यांचा इतिहास आज त्यांच्यावरील चरित्रपटाच्या माध्यमातून समोर येत आहे. पण, जर १९४७ साली त्यांनी मुहम्मद अली जिना यांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर भारताचा पुढील इतिहास बदलला असता का? असा प्रश्न निर्माण होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> ‘सॅम बहादुर’ कोण होते?

लष्कराचे विभाजन

भारत-पाकिस्तानच्या फाळणीने भारतीय उपखंडातील भूभागाचे दोन तुकडे तर झालेच, त्याशिवायही आणखी विभागणी झाली. रेल्वेपासून ते सरकारी तिजोरी, नागरी सेवांपासून ते खुर्च्या-टेबलांपासूनची सरकारी मालमत्ता… हे सर्व काही दोन देशांमध्ये विभागले गेले. याशिवाय स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश इंडियन आर्मीचेही विभाजन झाले, जी १९४७ साली जवळपास चार लाख सैनिकसंख्येच्या आसपास होते. लष्कराची मालमत्ता आणि कर्मचारी दोन देशांमध्ये विभागले गेले. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे २,६०,००० सैनिक आणि उर्वरित सैन्यबळ पाकिस्तानच्या ताब्यात गेले. १९४७ मधील इतर फाळणीप्रमाणे हे विभाजनही अतिशय गुंतागुंतीचे, रक्तरंजित होते. धर्माच्या आधारावर लष्काराचीही विभागणी झाली.

ब्रिटिश अधिकारी एडवर्ड मॅकमुर्डो हे फाळणीचे साक्षीदार राहिले होते, त्यांनी १९९१ साली आपल्या आठवणी सांगताना म्हटले की, हिंदू स्क्वॉड्रन्सना (लष्करी विमानांची तुकडी) वायव्य सरहद्दीतून बाहेर काढताना पठाणांकडून त्यांची हत्या न होऊ देण्याची गंभीर समस्या आमच्यासमोर होती. आम्ही एका रात्रीत त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

अधिकाऱ्यांची निवड

इतिहासकार ब्रायन लॅपिंग यांनी “एंड ऑफ एम्पायर” (१९८५) या पुस्तकात लिहिले, “लष्करी अधिकाऱ्यांना एक अर्ज मिळाला होता, ज्यावर त्यांना त्यांची निवड नोंदवायची होती.” बहुतेक हिंदू आणि शीख धर्मीय लोकांना पर्याय नव्हता. पाकिस्तान त्यांच्यासाठी नव्हते, पण ज्या मुस्लीम अधिकाऱ्यांची घरे भारतामध्येच होती, त्यामधील अनेकांनी भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला.” लॅपिंग यांनी पुढे लिहिले की, ख्रिश्चन आणि पारशी सैनिकांनाही अशाच प्रकारे निवड करण्याचा पर्याय दिला गेला.

सॅम माणेकशा हे त्यावेळी लष्करामध्ये मेजर होते. माणेकशा यांचा जन्म अमृतसर येथील पारशी कुटुंबात झाला होता. त्यांचे कुटुंब मुळचे मुंबईचे होते. नैनिताल येथील शेरवूड महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाण्याआधी त्यांचे शालेय शिक्षण पंजाबमध्ये पूर्ण झाले. माणेकशा सैन्यात असताना त्यांची १२ वी फ्रंटियर फोर्स रेजिमेंट पाकिस्तान सैन्याचा भाग झाल्यामुळे माणेकशा यांना निवडीचा सामना करावा लागला.

जिनांची विनंती माणेकशा यांनी नाकारली

पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे मुहम्मद अली जिना यांनी व्यक्तिशः माणेकशा यांना पाकिस्तान लष्करात येण्याची विनंती केली होती. पाकिस्तानने माणेकशा यांच्यासारख्या प्रतिभावान अधिकाऱ्यासाठी चांगल्या पदाची शक्यता उपलब्धता करून दिली, मात्र भारताप्रती कृतज्ञता व्यक्त करत माणेकशा यांनी जिना यांना नकार दिला.

हे वाचा >> स्वतंत्र भारताला ‘इंडिया’ म्हणण्यास जिनांनी केला होता विरोध! जाणून घ्या भारत आणि इंडियामधील फरक…

जिना यांच्याशी जुळवून घेतले असते तर पाकिस्तानी सैन्यात माणेकशा यांना जलद बढती मिळू शकली असती. परंतु, सॅम माणेकशा यांनी भारतातच राहणे पसंत केले, अशी प्रतिक्रिया ‘फिल्ड मार्शल माणेकशा’ या पुस्तकात कर्नल तेजा सिंग औलख (तेव्हा मेजर होते) यांनी दिली. या पुस्तकाचे लेखन हनादी फाल्की यांनी केले होते.

ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये उच्चपदावर अधिकाधिक ब्रिटिश अधिकाऱ्यांचाच समावेश होता. त्यामुळे १९४७ साली पाकिस्तान आणि भारत अशा दोन्ही देशांच्या लष्कारातील नेतृत्व फळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. पाकिस्तानसाठी तर हे सत्य अधिक आव्हानात्मक होते. कारण सैन्यातील हिंदू किंवा शीख अधिकाऱ्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी, तरुण पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या रँकमध्ये झपाट्याने वाढ झाली.

माणेकशा यांची प्रथम १६ व्या पंजाब रेजिमेंटमध्ये थोड्या काळासाठी बदली झाली. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल म्हणून पाचव्या गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. मात्र १९४७-४८ काश्मीर युद्धात त्यांना लष्कर मुख्यालयात मिलिट्री ऑपरेशन्स डिरोक्टोरेटमध्ये बदली केल्यामुळे ते गोरखा तुकडीसह सेवा देऊ शकले नाहीत.

फिल्ड मार्शल माणेकशा निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्षांनी त्यांना १९४७ च्या निर्णयाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळे विनोदी शैलीत उत्तर देताना ते म्हणाले, “हो, जिना यांनी मला १९४७ साली पाकिस्तानी लष्करात सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता. पण मी तो स्वीकारला असता, तर तुम्ही भारताचा पराभव (१९७१ चे युद्ध) केला असता.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When jinnah asked sam manekshaw to join the pakistan army kvg