Syria vs Druze How did Israel get involved : गेल्या महिन्यात इराण व इस्रायल यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांतील शेकडो निष्पाप लोकांना आपले प्राण गमावावे लागले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. मात्र, इराणबरोबरच्या युद्धविरामानंतर इस्रायलने आता सीरियावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. स्वेदा प्रांतातील ड्रूझ समुदायाला वाचवण्यासाठी इस्रायलने थेट सीरियाच्या लष्करी मुख्यालयासह इतर महत्वांच्या ठिकाणी बॉम्बहल्ले केले आहेत. दरम्यान, ड्रूझ समुदाय काय आहे? इस्रायल व सीरियामध्ये वादाची सुरुवात नेमकी कशामुळे झाली? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

ब्रिटनमधील ‘Syrian Observatory for Human Rights’ या युद्ध निरीक्षण संस्थेच्या माहितीनुसार, इस्रायल व सीरियामधील वादाची सुरुवात ही स्वैदा भागात एका ड्रूझ समुदायातील व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यामुळे झाली. या परिसरात राहणाऱ्या बेदुइन समुदायातील काही लोकांनी रस्त्यावरून जाणाऱ्या ड्रूझ समुदायातील व्यक्तीला अडवलं आणि मारहाण करीत त्याच्याकडील रोख रक्कम लुटून नेली. या घटनेनंतर ड्रूझ समुदाय आक्रमक झाला आणि त्यांनी प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली. या दरम्यान जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटनाही घडल्या.

ड्रूझ समुदाय काय आहे?

  • ड्रूझ हा एक धार्मिक समुदाय असून त्यांची सुरुवात १०व्या शतकात इस्लामच्या शिया पंथातील इस्माईली उपपंथातून झाली होती.
  • जगभरात या समुदायातील लोकसंख्या १० लाखांच्या आसपास आहे आणि त्यातील अर्ध्याहून अधिक लोक सीरियामध्ये राहतात.
  • इस्रायलमध्येही ड्रूझ समुदाय मोठ्या संख्येने असून त्यांच्याशी देशाचे चांगले संबंध आहेत.
  • सीरियामध्ये जेव्हा ड्रूझ समुदायातील लोकांवर हल्ले होण्यास सुरुवात झाली, तेव्हा त्यांचं रक्षण करण्याच्या हेतूने इस्रायलने सीरियावर बॉम्बहल्ले केले.
  • आतापर्यंत या हिंसाचारात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
  • ड्रूझ व बेदुइन समुदायात उफाळलेल्या हिंसाचारात कित्येक लोकांची घरे जाळण्यात आली आहेत.

आणखी वाचा : ‘नॉन-व्हेज दूध’ म्हणजे काय? भारत-अमेरिका व्यापार करारात त्यावरून वाद कशासाठी?

इस्रायल या संघर्षात कसा सहभागी झाला?

१५ जुलै रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने जाहीर केलं की, इस्रायलमध्ये राहणाऱ्या ड्रूझ समुदायातील नागरिकांशी आमचं भाऊबंधकीचं नातं आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. सीरियाने ड्रूझ समुदायातील लोकांवर होणारे हल्ले तातडीने थांबवावे, अन्यथा त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इस्रायलने दिला. मात्र, तरीही हिंसाचाराच्या घटना घडतच असल्याने इस्रायने सीरियातील स्वैदा भागात हवाई हल्ले केले. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ म्हणाले की, सीरियातील ड्रूझ लोकांवर अन्याय झाला तर आम्ही अजिबात गप्प बसणार नाही.

इस्रायलच्या भूमिकेवर अनेकांची टीका

काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे की, इस्रायलकडून सीरियामध्ये तोडा, फोडा आणि राज्य करा ही रणनीती वापरली जात आहे. सीरियातील नवीन सरकारला कमकुवत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. इस्रायल गोलन हाइट्स या वादग्रस्त सीमेवर एक ‘बफर झोन’ तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष बाब म्हणजे- हे क्षेत्र पूर्वी सीरियामध्ये येत होतं; पण इस्रायलने त्याच्यावर कब्जा केला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये सीरियाचे माजी राष्ट्रपती बशर अल-असद यांची सत्ता गेल्यानंतर इस्रायलने सीरियातील लष्करी ठिकाणांवर सातत्याने हल्ले केले आहेत. नवीन सरकारकडून कुठल्याही कुरापती होऊ नये म्हणून आम्ही हवाई हल्ले करतोय, असं इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांनंतर दमास्कस हादरलं

इस्रायलने सोमवारपासून (१४ जुलै) सीरियावर हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यात सीरियाच्या लष्करातील काही जवान ठार झाल्याची माहिती आहे. बुधवारी इस्रायलने हल्ल्यांची तीव्रता वाढवली असून दमास्कसमधील सीरियन लष्कराच्या मुख्यालयावर व संरक्षण मंत्रालय असलेल्या संकुलावर हवाई हल्ले केले. यावेळी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळही स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी ‘AFP’ या वृत्तसंस्थेला सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक टीव्ही रिपोर्टर धावताना दिसून येत आहे. तिच्या मागे असलेल्या इमारतीवर इस्रायलची लढाऊ विमानं काही हल्ले करत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय.

इराणबरोबरच्या युद्धविरामानंतर इस्रायलने आता सीरियावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे

इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी सांगितलं की, स्वैदा शहरातील ड्रूझ समुदायावर हल्ला करणाऱ्या शक्तींना संपवण्यासाठी आमचे सैनिक प्रयत्नशील आहेत. तसेच दमास्कसला दिलेले इशारे संपले, आता फटके देण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर सीरियावरील हवाई हल्ल्याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे.

हेही वाचा : जिओसेल तंत्रज्ञान म्हणजे काय? प्लास्टिकचे रस्ते कसे तयार केले जाणार?

सीरियाने जाहीर केली युद्धबंदी

दरम्यान, इस्रायलकडून सातत्यानं हवाई हल्ले होत असल्यानं सीरियातील सरकारनं बुधवारी (तारीख १६ जुलै) युद्धबंदीची घोषणा केली आहे. स्वैदा शहरातील बेकायदा गटांवर कारवाई झाल्यानंतर लष्कराने तेथून माघार घ्यायला सुरुवात केली आहे, असं सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. सर्व लष्करी कारवाया तत्काळ थांबवण्यात येतील आणि एक संयुक्त समिती तयार केली जाईल, ज्यामध्ये सरकारी प्रतिनिधी आणि ड्रूझ धार्मिक नेते असतील. ही समिती युद्धबंदीची अंमलबजावणी करण्याचे काम करेल, असं सीरियाच्या गृह मंत्रालयाने सांगितलं आहे. दुसरीकडे, इस्रायलने या युद्धबंदीबाबत अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. उलटपक्षी, युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही इस्रायलने हल्ले सुरूच ठेवले आहेत.

सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा ड्रूझ समुदायाला पाठिंबा

सीरियाचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शराआ यांनी दूरचित्रवाणीवरून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ड्रूझ समुदायाला पाठिंबा दर्शवला आहे. ड्रूझ नागरिकांचे संरक्षण आणि त्यांचे अधिकार ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही आयुष्यभर संघर्षांचा सामना करून आमच्या लोकांचं रक्षण केलं आहे, त्यामुळे आम्ही युद्धाला अजिबात घाबरत नाही; पण सीरियन जनतेच्या हितासाठी इस्रायलसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. जर आमच्या स्वाभिमानाला धोका निर्माण झाला, तर सीरियन लष्करही मागे हटणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील वाढता तणाव पाहता अमेरिकेने त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. त्यामुळे इस्रायल व सीरियामधील युद्ध थांबणार की सुरूच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.