Gwalior Top Police Officer Hina Khan chant Jai Shri Ram : ‘जय श्रीराम’ असा नारा देत एका मुस्लीम महिला पोलीस अधिकाऱ्याने संतप्त आंदोलकांना शांत केलं. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. हिना खान असे या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. हे प्रकरण नेमके आहे तरी काय? कोण आहेत हिना खान? त्यांनी आंदोलकांना वेळीच शांत करून परिस्थिती कशी नियंत्रणात आणली? त्या संदर्भातील हा आढावा…
नेमकं काय आहे प्रकरण?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर शहरातील एका वकिलावर दोन दिवसांपूर्वी एफआयआर दाखल करण्यात आला. या कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांच्या एका गटाने सोमवारी सायंकाळी फूलबाग परिसरातील मंदिरात एका मंदिरात सुंदरकांड पठण करण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ग्वाल्हेर शहराच्या पोलीस अधिकारी हिना खान आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरात जमावबंदीचे आदेश असल्याने तुम्हाला एकत्र जमण्यास परवानगी नाही असे त्यांनी वकिलांना समजावून सांगितले. हिना खान याचे शब्द ऐकून काही वकील आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
हिना खान यांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा
वकील अनिल मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील गटाने हिना खान यांना ‘तुम्ही सनातन धर्माच्या विरोधात आहात’ असे म्हणत जय श्रीराम अशी घोषबाजी सुरू केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, हिना खान यांनी अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली. त्यांनी माघार न घेता स्वतः चार वेळा ‘जय श्री राम’ असा नारा दिला आणि वकिलांच्या जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. तरीही काहीजण पोलिसांबरोबर वाद घालत असल्याने हिना खान यांनी त्यांना संयमाने उत्तर दिले. “जर तुम्ही जय श्रीरामचा नारा देत असाल तर मीदेखीन देईन; पण, हा नारा फक्त माझ्यावर दबाव टाकण्यासाठी असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे”, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
जय श्रीरामच्या घोषणेबाबत हिना काय म्हणाल्या?
हिना खान यांच्या अनपेक्षित आणि धाडसी भूमिकेमुळे संतप्त वकिलांचा गट शांत झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. बुधवारी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हिना खान म्हणाल्या, “जय श्रीरामचा नारा देणे ही माझ्या मनातून आलेली भावना होती. त्यावेळी संतप्त झालेल्या वकिलांना शांत करणे अत्यंत गरजेचे होते. आंदोलनकर्ते आक्रमक झाले असते तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच मी जय श्रीरामचा नारा दिला.” या घटनेबाबत ग्वाल्हेरचे पोलीस अधीक्षक धर्मवीर यादव यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्हाला खूपच प्रयत्न करावे लागले. स्थानिक पोलिस आणि नागरी समाजाच्या सहकार्याने आम्ही तणाव कमी केला. ग्वाल्हेरचे नागरिक अशा प्रकारच्या घटनांना पाठिंबा देत नाहीत. नागरी समाजाने एकत्र येऊन हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
जय श्रीरामचा घोषणा देणाऱ्या हिना खान कोण आहेत?
हिना खान यांचा जन्म मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील निवृत्त शिक्षक असून आई गृहिणी आहेत. हिना यांनी आपले शालेय शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केले. दहावीनंतर त्यांना ‘बायोलॉजी’ या विषयात रस निर्माण झाला. बारावी उतीर्ण झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षणाची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यात अपयश आल्याने त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. २०१२ मध्ये त्यांची विक्रीकर निरीक्षक म्हणून निवडही झाली; पण पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याने त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. २०१६ मध्ये हिना यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची (MPPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. २०१८ मध्ये त्यांनी पोलीस उपअधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. सध्या त्या ग्वाल्हेर शहरात कर्तव्य बजावत आहेत.
हेही वाचा : भारतातील ७० टक्के महिलांना जडलेला ऑटोइम्युन आजार नेमका आहे तरी काय? वेळीच उपचाराची गरज, अन्यथा…
ग्वाल्हेरमध्ये वकिलांनी निषेध आंदोलन का केले?
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यावरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या पुतळ्याच्या स्थापनेला विरोध करताना काही वकिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोप झाला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत संबंधित वकिलांवर एफआयआर दाखल केला. त्याचा निषेध म्हणून सोमवारी वकिलांच्या एका गटाने आंदोलन पुकारत मंदिरात सुंदरकांड पठण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या वकिलांना वेळीच रोखून त्यांचे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला. “जर वकिलांनी जिल्हा प्रशासनाकडून योग्य परवानगी घेतली असती, तर आम्ही त्यांना निषेध करण्याची परवानगी दिली असती,” असे हिना खान यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.