AI impact on jobs कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येत असल्याचे अनेक रिपोर्टसमधून समोर आले आहे. ‘एआय’मुळे अनेक कामे स्वयंचलित होत आहेत. त्यामुळे तरुणांना भविष्याचा प्रश्न सतावत आहे. ‘एआय’च्या मदतीने अत्यंत क्लिष्ट कामही आता शक्य झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नोकरदारांचे काय होणार, याची चिंता प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. अप्रत्यक्षपणे ‘एआय’मुळे लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.
आता स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासामधून असे दिसून आले आहे की, एआय आधीच अमेरिकेतील श्रम बाजारामध्ये मोठे बदल घडवत आहे. मात्र, याचा परिणाम सगळ्यांवर सारखा होत नाहीये. विशिष्ट वयोगटाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एरिक ब्रिनजॉल्फसन यांच्या नेतृत्वाखालील या संशोधनात, एडीपी (ADP) या देशातील सर्वांत मोठ्या पगारदार कंपनीच्या डेटाचा वापर करण्यात आला. त्यामुळे संशोधकांना जनरेटिव्ह एआय (Generative AI) नोकऱ्या आणि रोजगाराच्या पद्धतींवर कसा परिणाम करीत आहे, याचे स्पष्ट चित्र मिळाले. कोणत्या नोकर्यांना सर्वाधिक धोका? कोणत्या वयोगटातील तरुणांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता? नवीन अभ्यास काय सांगतो? जाणून घेऊयात…
नवीन अभ्यासात काय?
- स्टॅनफोर्डच्या संशोधनानुसार, २०२१ च्या उत्तरार्धात जेव्हा चॅटजीपीटी (ChatGPT) आणि कोपायलट (Copilot) सारख्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला, तेव्हापासून एआयचा प्रभाव असलेल्या नोकऱ्यांमध्ये २२ ते २५ वयोगटातील म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांच्या रोजगारात १३ टक्के घट झाली आहे.
- एरिक ब्रिनजॉल्फसन ‘सीबीएस मनीवॉच’ (CBS MoneyWatch)ला सांगितले, “या मोठ्या ‘Language Models’ना पुस्तके, लेख आणि इंटरनेटवरील लिखित माहितीवर प्रशिक्षण दिले जाते.
- ही अशी माहिती असते, जी अनेक लोक नोकरीच्या बाजारात येण्यापूर्वी विद्यापीठांमध्ये शिकतात. त्यामुळे या मॉडेलच्या आणि तरुणांच्या ज्ञानात खूप समानता आहे.”
मात्र, याउलट प्रत्यक्ष कामांमध्ये गुंतलेल्या वयोवृद्ध कामगारांच्या रोजगारात सहा ते नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असेच काहीसे अकाउंटिंग, ऑडिटिंग, प्रशासकीय काम, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग व विक्री यांसारख्या क्षेत्रांमध्येही दिसून आले. ब्रिनजॉल्फसन यांनी स्पष्ट केले, “अनुभवी कामगारांकडे अधिक ज्ञान असते. कारण- ते अनुभवामधून अनेक गोष्टी आणि नवनवीन युक्त्या शिकतात. त्यांच्याकडे असे ज्ञान असते, जे एलएलएममध्ये (LLM) नसते, त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका कमी असतो.”
असेच काहीसे गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) आणि बँक ऑफ अमेरिका (Bank of America)सारख्या गुंतवणूक बँकांच्या अहवालांमध्येही नमूद करण्यात आले आहे. या बँका असे सांगतात की, एआय (AI) असलेल्या उद्योगांमध्ये कॉलेजची पदवी असण्याचा आर्थिक फायदा कमी होत आहे. त्यामुळे अनेक नवीन पदवीधरांना नोकरीच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
एआय कौशल्यावर भर देण्याची गरज
स्टॅनफोर्डचा हा अहवाल निराशाजनक नाही. संशोधकांना असे आढळले की, ज्या व्यवसायांमध्ये कामगारांना मदत करण्यासाठी एआयचा (AI) उपयोग केला जातो, त्यांच्या रोजगारात वाढ होत आहे. उदाहरणादाखल, जे कर्मचारी एखादा विषय शोधण्यासाठी किंवा आपले काम पूर्ण झाल्यावर तपासण्यासाठी एआयचा वापर करतात, त्यांना इतरांपेक्षा कमी धोका आहे. ब्रिनजॉल्फसन यांच्यासाठी हा फरक खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणाले, “हे सांगणे योग्य ठरेल की तंत्रज्ञानाने नेहमीच काही नोकऱ्यांवर गदा आणली आहे आणि काही नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.”
अनेक तज्ज्ञ असे मानतात की, जे कामगार एआय कौशल्य शिकतील, ते झपाट्याने बदलणाऱ्या उद्योगांमध्ये टिकून राहतील. अनेकांना एआयमुळे वेतनात मोठी घट होईल, अशी भीती वाटत आहे.; मात्र या अभ्यासानुसार, सर्व वयोगटांतील व्यक्तींच्या पगारावर अद्याप तरी परिणाम झालेला नाही. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी, वेतनात घट होण्याऐवजी नोकरीच्या संधी कमी होणे हे मोठे आव्हान आहे.
कोणत्या नोकऱ्यांवर संकट?
जुलै महिन्यातील मायक्रोसॉफ्ट रिसर्चच्या ‘वर्किंग विथ एआय : मेजरिंग द ऑक्युपेशनल इम्प्लिकेशन्स ऑफ जनरेटिव्ह एआय’ या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ४० क्षेत्रे अशी आहेत, जिथे एआय पूर्णपणे माणसांची जागा घेऊ शकते. अभ्यासानुसार, एआयचा संगणक, गणित, कार्यालय आणि प्रशासकीय साह्य, विक्री, वित्त, सामाजिक सेवा व शिक्षण या क्षेत्रांत काम करणाऱ्यांवर सर्वांत जास्त परिणाम होत आहे.
मायक्रोसॉफ्ट रिसर्चच्या अभ्यासानुसार, माहिती संकलन, लेखन, संवाद, रिपोर्टिंग व सर्जनशील लेखन यांचा समावेश असलेल्या व्यवसायांवर एआयचा सर्वाधिक परिणाम होईल. त्याशिवाय इतिहासकार, लेखक, पत्रकार, प्रूफ रीडर, संपादक, पीआर व्यावसायिक, ग्राहक सेवा, तिकीट एजंट, टेलिफोन ऑपरेटर, विक्री प्रतिनिधी, तांत्रिक लेखक, गणितज्ञ, डेटा सायंटिस्ट यांसारख्या नोकऱ्यांवर सर्वांत जास्त परिणाम होईल.
अहवालात म्हटले आहे की, एआयच्या वापराचा अर्थ असा नाही की, सर्व काम स्वयंचलित होईल. खरं तर, अशा अनेक नोकऱ्या आहेत जिथे मानवाची कार्यक्षमता वाढेल. पण, काही नोकऱ्या अशा असतील जिथे मानवाची जागा पूर्णपणे एआय घेऊ शकेल. मात्र, संशोधकांचा असा विश्वास आहे की, एआयमुळे नोकऱ्यांमध्ये नुकसान होण्याऐवजी त्यामध्ये अधिक बदल होतील. त्याशिवाय नोकरीच्या काही नवीन संधीदेखील निर्माण होऊ शकतात.