पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या निर्णयांनंतर पाकिस्तानातील अनेक नेते भारताविरोधात गरळ ओकताना दिसत आहेत. अलीकडेच बिलावल भुट्टोसारख्या नेत्यांनी “भारतात रक्ताच्या नद्या वाहतील” यांसारखी विधाने केली आहेत. आता आणखी एका पाकिस्तानी नेत्याने भारताविरोधात चिथावणीखोर भाषण केले आहे. या भाषणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील काही नेते भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारताविरोधात असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या नेत्याचे नाव आहे पलवाशा मोहम्मद झई खान. त्या पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहात प्रक्षोभक भाषण करताना दिसत आहेत. अयोध्येतील नवीन बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानचे सैन्य रचतील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांचे असे सांगणे आहे की, या स्वरूपांच्या व्यक्तव्यांमुळे परिस्थिती आणखी बिघडेल. पलवाशा मोहम्मद झई खान नेमके कोण आहेत? त्यांनी आपल्या भाषणात नक्की काय म्हटले? जाणून घेऊयात.

पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहात चिथावणीखोर भाषण

२९ एप्रिलला दिलेल्या भाषणात पलवाशा मोहम्मद झई खान म्हणाल्या, “अयोध्येतील नवीन बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी लष्कराचे सैनिक रचतील आणि पहिली अजान स्वतः लष्करप्रमुख असीम मुनीर देतील,” असे त्या म्हणाल्या. “आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत,” असे म्हणत त्यांनी तणाव आणखी वाढवला. इतकेच नव्हे तर पलवाशा मोहम्मद झई खान यांनी भारताच्या राजकीय स्थितीचा पाकिस्तानशी संबंध जोडला. त्या म्हणाल्या, “पाकिस्तान भारतात मुस्लिमांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या उदयाकडे वाटचाल करत आहे, ज्याचे नेतृत्व पाकिस्तान करेल. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास असे दिसते आहे की अल्लाह भारतीय उपखंडात मुस्लीम सरकार, विशेषतः पाकिस्तानी मुस्लीम सरकार स्थापन करण्यासाठी एक मार्ग निर्माण करत आहे,” असे त्या उर्दूमध्ये म्हणाल्या.

या भाषणात त्यांनी भारताला गंभीर परिणामांचा इशारा दिला. “आमच्यापर्यंत कोणाचाही हात पोहोचल्यास ते आमच्या शक्तीचे प्रदर्शन पाहतील. त्यांच्या शक्तीचे प्रतीक असलेल्या दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या भिंती कधीही न पाहिलेला रक्तपात पाहतील,” असे ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात म्हटले आहे. व्हेनेझुएलाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष ह्यूगो चावेझ यांच्याच एका वक्तव्याचा संदर्भ घेत त्या पुढे म्हणाल्या, “आपल्याकडे बंदुका आहेत, आपल्याकडे शस्त्रे आहेत, आपल्याकडे झाडे आहेत आणि जर शत्रूने काहीही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचे मृतदेह आपल्या झाडांना लटकवू.”

या भाषणानंतर पलवाशा मोहम्मद झई खान यांनी स्पष्ट केले की, त्यांचे भारतीय नागरिकांशी कोणतेही भांडण नाही. त्यानंतर त्यांनी असाही दावा केला की, शीख सैनिक पाकिस्तानविरुद्ध लढण्यास नकार देतील, कारण त्यांना या देशातील त्यांच्यासाठीचे धार्मिक महत्त्व माहीत आहे. शीख सैन्य पाकिस्तानवर हल्ला करणार नाही, कारण ही त्यांच्यासाठी गुरु नानकांची भूमी आहे,” असे त्या म्हणाल्या.

मुख्य म्हणजे आपल्या भाषणात त्यांनी खलिस्तानी फुटीरतावादी नेते गुरपतवंत सिंग पन्नू यांचे कौतुक केले. भारताने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. “मी शीख नेते गुरपतवंत सिंग पन्नू यांना सलाम करू इच्छिते. त्यांनी धाडस करून सांगितले आहे की, कोणत्याही भारतीय सैनिकाला भारतातील पंजाबमधून पाकिस्तानात प्रवेश करू दिला जाणार नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “आपले सैन्य फक्त सहा किंवा सात लाख नाहीत, आपल्याकडे २५ कोटी लोक आहेत, जे वेळ आल्यावर आपल्या सशस्त्र दलांबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहतील आणि स्वतः सैनिक होतील.”

पलवाशा मोहम्मद झई खान कोण आहेत?

पलवाशा मोहम्मद झई खान ही एक पाकिस्तानी राजकारणी आहे. त्या सध्या बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)मध्ये आहेत. त्या पक्षात उप-माहिती सचिव पदावर कार्यरत आहेत. त्या मार्च २०२१ पासून पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहात सिनेटर म्हणून काम करत आहेत आणि महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर सिंधचे प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी २००८ ते २०१३ पर्यंत त्या राष्ट्रीय असेंब्लीच्या सदस्य होत्या. पलवाशा या एक अनुभवी राजकारणी आहेत. त्या व्यावसायिक फोजिया बेहराम यांच्या भाची आहेत. फोजिया बेहराम यांनी १९८८ ते ९० च्या कार्यकाळात पंजाब विधानसभेत निवडून आलेल्या एकमेव महिला सदस्य म्हणून इतिहास रचला होता.

भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करण्याची पाकिस्तानी नेत्यांनी ही पहिलीच वेळ नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले. एका सार्वजनिक सभेत बोलताना भारतावर टीका करत ते म्हणाले, “सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर आमचे पाणी त्यातून वाहेल, नाहीतर भारतीयांचे रक्त वाहेल.” माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच एका ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले की, पाकिस्तान शांतता पसंत करत असला तरी त्याची शांतता कमकुवतपणा समजू नये. ते म्हणाले, “२०१९ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पूर्ण पाठिंब्याने पीटीआय सरकारने जे केले होते, त्याचप्रमाणे भारताच्या कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणाला योग्य उत्तर देण्याची पाकिस्तानकडे पूर्ण क्षमता आहे.”