भारतीय वंशाच्या निक्की हॅली यांच्यानंतर आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने २०२४ मध्ये अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. विवेक रामास्वामी असं त्यांचं नाव आहे. रिपब्लिकन पार्टीतर्फे निवडणूक लढवणार असल्याचा दावा विवेक रामास्वामी यांनी केला आहे. विवेक रामास्वामी यांनी मंगळवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणारे विवेक रामास्वामी?

विवेक रामास्वामी यांचा जन्म १९८५ ला दक्षिण पश्चिम ओहियाच्या सिनसिनाटीमध्ये झाला. त्यांचे वडील वी. जी. रामास्वामी हे मूळचे केरळमधल्या पलक्कडचे आहेत. केरळमधल्या एका स्थानिक महाविद्यालयातून डिग्री घेतल्यानंतर वी. जी. रामास्वामी यांना ओहियोच्या इवेंडल जनरल इलेक्ट्रिक प्लांटमध्ये नोकरी मिळाली. विवेक यांची आई मनोविकार तज्ज्ञ होती. तर विवेक रामास्वामी यांची पत्नी अपूर्वा तिवारी या ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टर आहेत.

सिनसिनाटीच्या सेंट झेव्हीयर्स हायस्कूलमधून विवेक रामास्वामी यांनी शिक्षण घेतलं आहे. उच्च शिक्षणासाठी हार्वर्ड आणि येल लॉ स्कूलमध्ये गेले होते. रामास्वामी यांनी हार्वर्डमधून कायद्याची पदवी घेतली. विवेक रामास्वामी हे बायोटेक व्यवसायातलं प्रसिद्ध नाव आहे. रामास्वामी यांनी औषधं विकसीत करणारी कंपनी रोइवेंट सायन्सेस चालवतात. २०१६ मध्ये त्यांनी सर्वात मोठी जैव वैज्ञानिक फर्म असलेल्या मायोव्हेंट सायन्सेसची स्थापना केली. एप्रिलमध्ये कंपनी स्थापन केल्यानंतर त्यांनी प्रोस्टेट कॅन्सरचं औषध आणि महिलांच्या वांझपणावरच्या औषधासाठी टाकेडा फार्मास्युटिकल्ससोबत करार केला होता.

विवेक रामास्वामी हे बायोफार्मा स्पेसमध्ये इतर काही कंपन्यांचे संस्थापकही आहेत. या कंपन्या म्हणजे मायोव्हेंट सायन्सेस, युरोव्हेंट सायन्सेस, एंजिवेंट थेराप्यूटिक्स, अल्टाव्हेट सायन्सेस होय. ३७ वर्षीय विवेक रामास्वामी यांनी बायोटेक क्षेत्रात त्यांचं नाव कमावलं आहे. २०१५ मध्ये फोर्ब्स च्या मुखपृष्ठावरही ते झळकले होते. फोर्ब्सच्या यादीनुसार २०१४ मध्ये विवेक रामास्वामी ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या श्रीमंतांच्या यादीत ३० व्या स्थानी होते. २०१६ मध्ये ४० पेक्षा कमी वय असलेल्या श्रीमंतांच्या यादीत ते २४ व्या स्थानी होते.

२०२४ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उभे राहणारे ते दुसरे भारतीय वंशाचे उमेदवार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची ही निवडणूक लढवण्यासाठी जो निधी लागणार आहे तो गोळा करण्यासाठी आणि त्यांच्या राजकीय कँपेनसाठी त्यांनी एक समिती स्थापन केली आहे. अमेरिकेतल्या आयोवा या राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. आमचा लढा हा विचारांवर आधारीत असेल असं रामास्वामी यांचं म्हणणं आहे.

विवेक रामास्वामी यांच्या आधी निक्की हॅली उमेदवार

विवेक रामास्वामी यांच्याआधी भारतीय वंशाच्या निक्की हॅली या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांनी आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लढणार असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is vivek ramaswamy indian american businessman rapper running for us president scj