हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल ही सरकारी कंपनी हलक्या वजनाची ‘तेजस – एमके-१ ए’ लढाऊ विमाने वेळेत वितरित करू शकेल, याबद्दल शाश्वती नसल्याचे वक्तव्य हवाईदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी केले. उत्पादनातील विलंब भारतीय हवाईदलासमोर लढाऊ विमानांचा समतोल राखण्याचे संकट गडद करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्पादन क्षमतेवर प्रश्नचिन्ह

प्रशिक्षणार्थी विमानाच्या (एचजेटी -३६) कॉकपिटमध्ये हवाईदल प्रमुख अमरप्रीत सिंग आणि एचएएलचे अधिकारी यांच्यात अलीकडील एका संभाषणाची चित्रफित समोर आली. या चित्रफितीत हलक्या तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनातील विलंबावर बोट ठेवत हवाईदल प्रमुखांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. ‘एचएएलला हवाईदलाची चिंता कमी करावी लागेल. आम्हाला आत्मविश्वास द्यावा लागेल. मात्र, सध्या एचएएलबद्दल विश्वास नाही. एचएएलने फेब्रुवारीपर्यंत ११ तेजस- एमके- १ ए विमानांचे उत्पादन करण्याचे आश्वासित केले होते. मात्र प्रत्यक्षात एकही तयार नाही. एचएएल ही आपली कंपनी आहे. मात्र तेजसच्या उत्पादनात ती युद्धपातळीवर काम करीत नाही’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘एअरो इंडिया’ प्रदर्शनात हवेत झेपावलेल्या विमानास ‘तेजस एमके- १ ए’ म्हणून सांगितले गेले. त्यावरही सिंग यांनी आक्षेप घेतला. ते विमान ‘एमके – १ ए’ नाही. संगणकीय आज्ञावली बदलणे अथवा वेगळ्या धाटणीने ते प्रगत होत नाही. जेव्हा शस्त्र समाविष्ट होतील, क्षमता सिद्ध होईल तेव्हा ते एमके – १ ए असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. एचएएलचे अधिकारी उत्पादनात कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे सांगत असल्याचे चित्रफितीत दिसते.

एचएएलचे म्हणणे काय?

हवाईदलाकडून वारंवार व्यक्त होणाऱ्या चिंतेविषयी एचएएलचे प्रमुख डी. के. सुनील यांनी हवाईदलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम होत असल्याने त्यांची चिंता समजण्याजोगी असल्याचे म्हटले आहे. एचएएलने आता सर्व म्हणजे एमके – १ए विमानाच्या संरचना तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. १९९८ मधील अणु चाचण्यानंतर देशावर विशेषतः अमेरिकेने लादलेले निर्बंध विलंबास कारक ठरले. त्यामुळे अनेक गोष्टी सुरुवातीपासून कराव्या लागल्या. तरीदेखील एकूण प्रकल्प वेळेत पूर्ण केला जाईल. इंजिन पुरवठ्याशी संबंधित समस्या सोडवली जात आहे. इंजिन उपलब्ध झाल्यानंतर तेजस एमके – १ एचे वितरण सुरू होईल, असा दावा केला जातो.

उत्पादनास विलंब का?

तेजसमध्ये ७५ टक्के सामग्री स्वदेशी असली तरी इंजिनसाठीचे परावलंबित्व उत्पादन रखडण्याचे मुख्य कारण आहे. इंजिनसाठी एचएएलने अमेरिकेतील जीई एरोस्पेसशी करार केला आहे. या कंपनीमार्फत २०२३-२४ वर्षात १६ इंजिने दिली जाणार होती. मात्र आजवर एकही इंजिन न मिळाल्याने एचएएलला हवाईदलाच्या रोषाला तोंड द्यावे लागते. मार्च २०२५ पर्यंत उपरोक्त कंपनीकडून एक-दोन इंजिन मिळू शकतील. यातून उत्पादनास गती कशी मिळणार, हा प्रश्न आहे. तेजसच्या नव्या प्रणालींचे प्रमाणीकरण झालेले नाही. स्वदेशी क्षेपणास्त्र चाचणी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, इस्रायली रडार प्रणाली आदींच्या चाचण्या बाकी आहेत.

करार आणि वेळापत्रक कसे?

हवाईदलाशी प्रारंभी झालेल्या करारान्वये एचएएल ८३ तेजस एमके-१ ए लढाऊ विमानांची पूर्तता पुढील साडेतीन वर्षात करणार आहे. भारतीय हवाईदलासाठी ९७ एमके-१ ए आणि लष्करासाठी १५६ हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी दोन स्वतंत्र करार पुढील काळात होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या करारातील ९७ लढाऊ विमाने २०३१ पर्यंत वितरित केली जातील, असे एचएएलकडून सांगितले जाते.

परिणाम काय?

हवाईदलास लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची गरज आहे. मंजूर क्षमतेच्या तुलनेत सध्या ३१ तुकड्या अस्तित्वात असून पुढील काळात मिग – २९, जॅग्वार आणि मिराज – २००० ही विमाने निवृत्त होतील. निरोप घेणाऱ्या बहुसंख्य विमानांची जागा तेजसला देण्याचे नियोजन आहे. या परिस्थितीत तेजसच्या उत्पादनास विलंब हवाईदलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम करेल. लढाऊ विमानांच्या तुकड्यांचे संख्याबळ कायम राखणे जिकिरीचे ठरेल. हवाईदलाने एचएएलच्या कामगिरीविषयी व्यक्त केलेली साशंकता त्यांच्या उत्पादनात स्वारस्य दाखविणाऱ्या अन्य राष्ट्रांच्या मनोधैर्यावर परिणाम करू शकते. लढाऊ विमानांची बांधणी व देखभाल-दुरुस्तीतून कमावलेल्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why air chief marshal amar preet singh angry on hal for tejas planes manufacturing print exp css