भारत – अमेरिकेमध्ये सध्या व्यापार विषयक वाटाघाटी सुरू आहेत. भारताने प्रामुख्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची आयात करावी, यासाठी अमेरिकेने दबाव वाढविला आहे. पण यास भारतातून तीव्र विरोध होत आहे त्या विषयी…
अमेरिकेची नेमकी मागणी काय?
भारत-अमेरिकेमध्ये सध्या व्यापार संघर्ष सुरू आहे. अमेरिकेकडून सोयाबीन, मका, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची आयात भारताने करावी, यासाठी मोठा दबाव आणला जात आहे. अनेक भारतीय उत्पादनांवर अमेरिकेने शंभर टक्के आयात शुल्क लागू केले आहे. अमेरिकेच्या नव्या आणि अव्यवहार्य शुल्कामुळे भारतीय निर्यातीला मोठा फटका बसत आहे. अमेरिका भारतीय वस्तू, उत्पादने, कृषीमालाचा कोणताही कर न लावता आयात करते. मात्र, भारत अमेरिकेच्या वस्तू आणि उत्पादनावर भला मोठा कर लावतो. त्यामुळे अमेरिकेचा व्यापार तुटीचा होत आहे. व्यापार समतोलासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची आयात करावी, असा अमेरिकेचा आग्रह आहे.
अमेरिकी दूध, दुग्धजन्य पदार्थ शाकाहारी नाहीत?
अमेरिकेत उत्पादित होणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ शाकाहारी नाहीत, असा भारताचा मोठा आरोप आहे. भारतात गायीला पवित्र मानले जाते. तिची पूजा केली जाते. गायीचे दूध आरोग्यदायी मानले जाते. भारतातील गायींना फक्त शाकाहारी चारा आणि पशुखाद्य दिले जाते. पण, अमेरिकेत कत्तलखान्यांमधील टाकाऊ घटकांचा पशुखाद्यांमध्ये समावेश केला जातो. जनावरांची हाडे, टाकाऊ मांस किंवा कत्तलखान्यांमधील अन्य टाकाऊ घटकांचा पशुखाद्यांमध्ये समावेश केला जातो. प्रामुख्याने कॅलशियमचा स्रोत म्हणून जनावरांच्या हाडाची पूड करून पशुखाद्यात वापरली जाते. त्यामुळे अमेरिकेतील दूध शुद्ध शाकाहारी नाही, असा भारतीयांचा आरोप आहे. असे दूध आयात केल्यास जनक्षोभ वाढेल. जनता रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध करेल. जनमत विरोधात जाईल, अशी भीती असल्याने केंद्र सरकार अमेरिकेचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना भारतीय बाजारपेठ खुली करण्यास तयार नाही.
देशातील दुग्ध व्यवसाय अडचणीत?
भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनांसाठी खुली केल्यास देशातील सुमारे आठ कोटी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. सध्या अमेरिकेसह अन्य देशातील दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर आयात शुल्क आणि इतर काही बंधने घातली आहेत. २०२४ मध्ये अमेरिकेने ८२२ कोटी डॉलर्स किमतीची दुग्धजन्य उत्पादने निर्यात केली होती. त्यामुळे ही उत्पादने भारतीय बाजारात आली तर देशातील दुग्ध व्यवसाय अडचणीत येईल. देशाची १४० कोटी लोकसंख्या ही दुग्धजन्य पदार्थांसाठीची मोठी बाजारपेठ आहे. दुग्ध व्यवसायावर आठ कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपजीविका आहे. त्यामुळे व्यापार करार करताना देशातील ग्रामीण भागातील गरीब दूध उत्पादकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकारने घेणे आवश्यक आहे.
अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनाचा खर्च अधिक?
अमेरिका आणि भारताच्या दूध उत्पादन क्षमतेत आणि प्रति लिटर दूध उत्पादन खर्चातही मोठा फरक आहे. भारतातील दूध उत्पादकांकडे सरासरी दोन किंवा तीन जनावरे आहेत. तर अमेरिकेच्या एका दूध उत्पादकाकडे शेकडो दुभती जनावरे आहेत. त्यामुळे भारतातील दूध उत्पादक त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. अमेरिकेत पशुधन व्यवस्थापन यांत्रिकी पद्धतीने केले जाते. चारा कापणी, चारा टाकणे, दूध काढणे, जनावरांची विविध कामे यंत्राद्वारे केली जातात. त्यामुळे अमेरिकेत प्रति लिटर दूध उत्पादन खर्च फक्त दहा रुपये आहे. भारतातील प्रति लिटर दूध उत्पादन खर्च २० ते ३० रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे भारत गायींच्या संख्येत आणि दूध उत्पादनात जगातील अग्रेसर देश असला तरीही अमेरिकेतून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीचा ताण सहन करू शकणार नाही. देशातील दुग्ध व्यवसाय अडचणीत येईल.
जागतिक दूध व्यवसायात भारत कुठे?
जागतिक दूध उत्पादनात भारत आघाडीवर आहे. भारतात जवळपास २३९ दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. भारताचे दूध उत्पादन अमेरिकेपेक्षा दुप्पटीहून अधिक आहे. अमेरिकेत १३० दशलक्ष टन उत्पादन होते. भारताचा डेअरी उद्योग सुमारे १ हजार ६८० कोटी डॉलर्सचा आहे. देशातून दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची फारशी निर्यात होत नाही. अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलियात दुष्काळ पडला, उत्पादनात घट झाली तरच आफ्रिकी, अरबी राष्ट्रांना बटर, दूध पावडरची निर्यात होते. देशातून शेजारील देश आणि अरबी देश वगळता अन्य देशांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची निर्यात होत नाही. जागतिक दूध उत्पादनात भारत आघाडीवर असला तरीही जागतिक दुग्ध बाजारपेठेत भारताचा वाटा दोन टक्केही नाही. त्यामुळे स्वस्तातील दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची आयात देशातील दुग्ध व्यवसायाला परवडणार नाही.
(दुग्ध उद्योगातील जाणकार प्रीतम शहा आणि डॉ. चेतन नरके यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित)
dattatray.jadhav@expressindia.com