गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेश आणि सीमेजवळील भारताच्या उंच भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बांगलादेशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी तेथील काही घटक भारताला जबाबदार ठरवत आहेत. भारताने जाणीवपूर्वक त्रिपुरामधील धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे बांगलादेशातील पुराची तीव्रता अधिक वाढली असा दावा तेथील काही भारतविरोधी घटकांनी केला आहे.

बांगलादेशात काय घडले?

बांगलादेशात मोठ्या प्रमाणात पूर येऊन तिथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. १८ लाख लोकांना प्रत्यक्ष फटका बसला तर आठ जिल्ह्यांमधील ३० लाख लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले. भारताने त्रिपुरातील गोमती नदीवरील डंबूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पूर आल्याचा दावा काही जणांनी समाजमाध्यमांवर केला. मात्र हे तथ्यहीन असल्याचे सांगत भारताच्या परराष्ट्र खात्याने आरोप फेटाळले. सध्या बांगलादेशच्या अनेक भागांमध्ये शुक्रवारपासून पाऊस कमी झाला आहे किंवा थांबला आहे. काही ठिकाणी पाणी ओसरायला लागले असल्याची माहिती तेथील हवामान विभागाच्या अथिकाऱ्यांनी दिली आहे. पण पूरस्थिती अजून काही दिवस कायम राहील असा अंदाज आहे. दुसरीकडे, भारतातील त्रिपुरामध्ये पूरस्थिती गंभीर आहे. तिथे सोमवार ते शनिवार या कालावधीत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा-कार्यालयीन वेळेनंतर काम न करण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार… कसा असेल ऑस्ट्रेलियातील ‘राइट टू डिस्कनेक्ट’ कायदा?

समाजमाध्यमांवर भारताविरोधी प्रचार

भारताने डंबूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळेच जास्त पूर आला असा दावा काही जणांनी समाजमाध्यमांवर केला. ‘एक्स’वर एकाने लिहिले की, “भारताने जाणीवपूर्वक आपल्या धरणातून पाणी सोडून बांगलादेशात कृत्रिम पूर निर्माण केला आहे आणि लोक भारताचा इतका तिरस्कार का करतात याचे तुम्हाला अजूनही आश्चर्य वाटते?” “भारताने डंबूर धरणाचे दरवाजे उघडले नसते तर पूर आला असता का? कदाचित हो, पण बऱ्याच कमी प्रमाणात. धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे जो पूर आला आहे तो गेल्या कित्येक पिढ्यांनी अनुभवलेला नाही,” असे आणखी एका ‘एक्स’ वापरकर्त्याने लिहिले आहे. इतकेच नाही तर, शेख हसीना यांना खूश करण्यासाठीच भारताने धरणाचे दरवाजे उघडले असा दावाही अन्य एका वापरकर्त्याने केला. समाजमाध्यमांवर भारतविरोधी भावनांचा पूर आलेला असताना काही जणांनी वेगळी भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी काम करणाऱ्या लोकांनीही खोटी माहिती सामायिक केली आहे असे त्यांनी दाखवून दिले. त्यांचा रोख नाटोचे अधिकृत मुखपत्र असलेल्या ‘रँड कॉर्पोरेशन’साठी काम करणाऱ्या डेरेक ग्रॉसमन यांच्याकडे होता.

परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

बांगलादेशच्या नागरिकांकडून केले जाणारे आरोप भारताने फेटाळले. २१ ऑगस्टपासून त्रिपुरा आणि बांगलादेशला लागून असलेल्या भागात मुसळधार पाऊस पडत होता. डंबूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली नसून थोड्या कालावधीत जास्त पाऊस झाल्यामुळे पूर आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. गोमती नदी ही त्रिपुरामधून वाहते आणि ती पुढे बांगलादेशात जाते. बांगलादेश सीमेपासून १२० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर, उंच भागात, या नदीवर डंबूर धरण बांधलेले आहे. या धरणाच्या खाली, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने बांगलादेशात पूर आल्याचे परराष्ट्र विभागाने नमूद केले आहे. डंबूर धरण फारसे उंच नाही. तिथे निर्माण होणाऱ्या विजेपैकी बांगलादेशला ४० मेगावॉट वीज दिली जाते असेही परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले.

आणखी वाचा-India-China mango history:आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?

भारताची भूमिका

भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये वाहणाऱ्या तब्बल ५४ नद्या आहेत. डंबूर धरण ते बांगलादेशची सीमा या १२० किलोमीटरच्या अंतरात अमरपूर, सोनामुरा आणि सोनामुरा २ या तीन ठिकाणी पाण्याची पातळी मोजली जाते आणि त्यावर देखरेख ठेवली जाते. पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची आवश्यकता आहे असे परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले. दोन्ही देशांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांना येणारा पूर ही दोन्ही देशांची सामायिक समस्या आहे. त्याचा दोन्ही देशांतील जनतेला त्रास होतो, त्यामुळेच ही समस्या सोडवण्यासाठी परस्परसहकार्याची गरज आहे असे भारताकडून सांगण्यात आले.

बांगलादेशात भारतविरोधी भावना वाढीस?

माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी लोकभावनेमुळे राजीनामा देऊन देश सोडला आणि सध्या त्या भारतात आहेत. बांगलादेशातील सर्वसामान्यांचा शेख हसीना यांच्याविरोधातील राग अद्याप निवळला नसल्यामुळे, त्यांना आश्रय देणाऱ्या भारताबद्दलही तिथे रागाची भावना वाढू लागली आहे. त्यांना सत्तेवर राहण्यासाठी भारताने मदत केली यावर एका गटाचा ठाम विश्वास आहे. यामुळेच अशा खोट्या बातम्या पसरवणे तेथील भारतविरोधी गटांना सोपे गेले.

nima.patil@expressindia.com