Premium

परदेशी पर्यटकांच्या उच्छादामुळे ‘बाली’ने जाहीर केली नवी नियमावली; देवांच्या बेटाचे पावित्र्य भंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

बाली हे जगप्रसिद्ध असे पर्यटनस्थळ आहे. जगभरातून अनेक लोक या बेटाला भेट देत असतात. मात्र परदेशी पर्यटकांच्या उच्छादामुळे आता बालीने १२ नियमांची नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. ‘देवांचे बेट’ अशी वदंता असलेल्या या बेटावर पवित्र स्थळाचा भंग करणे पर्यटकांना महागात पडू शकते.

bali nude tourist
बालमध्ये गेल्या काही काळापासून परदेशी पर्यटकांच्या बेशिस्त वागणुकीमुळे इंडोनेशियन सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. (Photo – Viral on Instagram)

देवांचे बेट मानल्या गेलेल्या इंडोनेशियाच्या बाली बेटावर काही उपद्रवी पर्यटकांनी उच्छाद मांडला आहे. इंडोनेशियामधील बाली हे आशियाई देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे. परदेशी पर्यटकांच्या कृतींना लगाम घालण्यासाठी बालीमधील यंत्रणेने नियमावली जाहीर करून सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे आणि कसे वागू नये, याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. बालीचे राज्यपाल वयान कोस्टर यांनी ३१ मे रोजी एक परिपत्रक काढून १२ नियमांची माहिती दिली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला (SCMP) प्रतिक्रिया देत असताना कोस्टर म्हणाले की, बालीला भेट देणारे सर्व पर्यटक, प्रतिनिधी यांना मी विनंती करू इच्छितो की, त्यांनी या परिपत्रकाला समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे सामाजिक वर्तणूक ठेवावी. काही परदेशी पर्यटक या बेटावर चुकीची वर्तणूक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही नियमावली तयार करण्यात आली आहे. परदेशी पर्यटकांच्या कोणत्या गैरवर्तनामुळे हे नवे नियम आखावे लागले? याबाबत ‘फर्स्टपोस्ट’ या संकेतस्थळाने सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय करावे

परदेशी पर्यटकांनी बालीच्या धार्मिकतेचा, पवित्र वास्तू आणि मंदिराचा आदर ठेवावा, अशी अपेक्षा या नियमावलीतून करण्यात आलेली आहे. ‘द बाली सन’ या माध्यम संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बालीची संस्कृती, चालीरीती, परंपरा आणि कलांचा तसेच स्थानिकांचा सन्मान राखावा, असा या नियमांचा अर्थ असल्याचे सांगितले.

पवित्र ठिकाणी भेट देत असताना पर्यटकांनी कपड्यांचे भान राखावे. मर्यादाशील पोशाख या वेळी अपेक्षित आहे. तसेच पवित्र ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि रेस्टॉरंट येथे वावरताना नम्रपणे वागावे. पर्यटकांनी पर्यटनस्थळावर केवळ परवानाधारक गाइड यांचीच मागणी करावी.

हे वाचा >> भटकंती : निसर्गरम्य बाली

जर परदेशी पर्यटक बालीमध्ये फिरायला येत असतील तर त्यांनी इंडोनेशियाचे परिवहन नियम पाळले पाहिजेत. हेल्मेट वापरणे, आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय वाहनचालक परवाना बाळगणे अनिवार्य असणार आहे. विशेषतः चारचाकी वाहने वापरावीत, जी रस्त्यांसाठी योग्य आणि अधिकृतपणे नोंदणीकृत आहेत. भाड्याने मिळणारी दुचाकी वाहने अधिकृत व्यावसायिकांकडूनच घ्यावीत, अशा नियमांची माहिती ऑस्ट्रेलियाच्या ‘९ न्यूज’ने दिली.

परदेशी चलन अधिकृत संस्थांकडूनच बदलून घ्यावे, अशीही सूचना नियमावलीत देण्यात आली आहे. परदेशी पर्यटकांनी पेमेंट करण्यासाठी इंडोनेशियाचा स्टॅण्डर्ड क्यूआर कोड (QRIS) पद्धत वापरावी किंवा इंडोनेशियन रुपया व्यवहारांसाठी वापरावा.
सर्व परवानग्या मिळालेल्या आणि नियमांचे पालन करणार्‍या ठिकाणीच पर्यटकांनी वास्तव्य करावे.

काय करू नये

पर्यटकांनी पवित्र झाडांना स्पर्श करू नये, पवित्र किंवा धार्मिक स्थळे अपवित्र होतील, अशी कोणतीही कृत्ये करू नयेत. जसे की, पवित्र इमारतींवर चढणे किंवा त्या ठिकाणी अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

पर्यटकांनी पवित्र प्रदेशात बेकायदेशीर प्रवेश करू नये. तसेच सरकार, स्थानिक यंत्रणा आणि इतर पर्यटकांबाबत आक्षेपार्ह भाषा किंवा आक्रमकता आणि अनादर दाखवू नये. ही कृती खपवून घेतली जाणार नाही, असाही नियम करण्यात आला आहे. परदेशी पर्यटकांनी अधिकृत कागदपत्रांशिवाय कोणताही व्यवसाय करू नये किंवा अनधिकृत कामांमध्ये सहभागी होऊ नये. जसे की, अनधिकृत वस्तूंची विक्री किंवा ड्रग्जचा व्यापार.

तसेच तलाव, समुद्र आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करू नये. एकदाच वापरता येणारे प्लास्टिक जसे की, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक स्ट्रॉ या वस्तू वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

हे वाचा >> बालीमध्ये बाईक चालविण्यास किंवा भाड्याने घेण्यास पर्यटकांवर का घातली जातेय बंदी; जाणून घ्या

ही नियमावली का करण्यात आली?

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (ABC) न्यूजने दिलेल्या बातमीनुसार चालू वर्षात गैरवर्तणूक आणि नियम तोडल्यामुळे इंडोनेशियाने १२० हून अधिक पर्यटकांना देशातून बाहेर काढले आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी नग्नतेचे प्रदर्शन, पोलिसांशी बाचाबाची अशा घटनांचा समावेश आहे. परदेशी पर्यटकांची बेशिस्त वागणूक बालीमधील यंत्रणांसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे.

नुकतेच एका डॅनिश महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मोटारसायकलवरून फिरत असताना तिने अश्लाघ्य कृत्य करीत अंगप्रदर्शन केले होते. या व्हायरल व्हिडीओनंतर सदर महिलेला अटक करून १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, अशी माहिती ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिली आहे.

हे वाचा >> Video: महिलेने चक्क नग्न अवस्थेत केला मंदिरात प्रवेश, कारण ऐकून व्हाल थक्क…

मागच्या आठवड्यात उबूड येथील एका मंदिरात एका जर्मन महिलेने नग्नावस्थेत नृत्य केले होते. ‘एबीसी न्यूज’ने दिलेल्या बातमीनुसार, स्थानिक प्रशासनाने या महिलेला ताब्यात घेऊन मानसिक उपचारासाठी पाठविले आहे.

एप्रिल महिन्यात, एका रशियन महिलेची रवानगी मॉस्को येथे करण्यात आली. ७०० वर्षे जुन्या एका पवित्र वडाच्या झाडासमोर नग्नावस्थेत फोटो काढल्यामुळे या महिलेचा स्थानिक हिंदू नागरिकांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. आणखी एका रशियन पर्यटकाला त्याच्या देशात धाडण्यात आले आहे. युरी नावाच्या या पर्यटकाने बालीमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या अटॉप माउंट अगुंग येथे अर्धनग्नावस्थेत फोटो काढले होते. यानंतर स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या पर्यटकाने कपडे उतरवून पवित्र पर्वतावर जाण्याचा गुन्हा केला होताच. त्याशिवाय इतर सात जणांबरोबर मिळून नोंदणी न करताच पर्वताच्या टोकावर जाण्याचा प्रयत्न केला होता. या पर्वतावर नोंदणी केल्याशिवाय जाता येत नाही.

मार्च महिन्यात, हेल्मेट न वापरण्यावरून एका परेदशी पर्यटकाची पोलिसांशी बाचाबाची झाली. या घटनेचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. आणखी एका ऑस्ट्रेलियन महिलेला हेल्मेट घातले नाही, म्हणून वाहतूक पोलिसांनी बाजूला केले होते. त्यावरूनही या महिलेनेदेखील पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता.

कॅनडाचे अभिनेते जेफ्री क्रेगन यांनी मागच्या वर्षी बालीच्या माऊंट बटुर येथे नग्नावस्थेत नृत्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर जेफ्री यांना इंडोनेशियाने कॅनडात परत पाठवले होते. त्याच वर्षी रशियाने योगा इन्लुएन्सर अलिना फजलिव्हा आणि तिच्या नवऱ्याने ७०० वर्षे जुन्या वडाच्या झाडासमोर नग्नावस्थेत योगा केल्यामुळे दोघांनाही इंडोनेशियातून परत धाडण्यात आले होते.

आणखी वाचा >> बालीतले सरस्वती मंदिर

या नियमावलीतून इंडोनेशिया काय साध्य करू इच्छिते!

बालीच्या राज्यपालांनी सांगितले की, या नियमावलीच्या माध्यमातून आम्ही आमच्या बेटाचा पर्यटनाचा दर्जा आणि प्रतिष्ठा राखू पाहत आहोत. बाली विमानतळावर पर्यटक येताच त्यांच्या हाती ही नियमांची पत्रिका देण्यात येते. जर पर्यटकांनी या नियमांप्रमाणे वागण्यास नकार दिला किंवा तसे कृत्य केले, तर त्यांचा व्हिजा रद्द करण्यात येतो. वॉशिंग्टनमधील इंडोनेशियाच्या परराष्ट्र विभागाचे कौन्सिलर फेब्रिया रेत्नोनिंगसिह (Febria Retnoningsih) ‘वॉशिंग्टन पोस्ट’शी बोलताना म्हणाले की, सर्वच पर्यटक बेशिस्तीने वागतात, असा काही भाग नाही. अशा गैरवर्तणूक करणाऱ्या पर्यटकांची संख्या समुद्रातील एका थेंबाएवढीच असते. फेब्रिया यांनी इंडोनेशियात जाणाऱ्या पर्यटकांना आवाहन केले की, “त्यांनी इंडोनेशियातील संस्कृती, चालीरीती आणि पवित्र स्थळांचा आदर राखला पाहिजे. बालीची संस्कृती अतिशय समृद्ध आहे. त्याचा आनंद घ्यावा.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why bali has issued a new list of rules to foreign tourists bali travel guidelines kvg