भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबईने पाच वर्षांसाठी मल्टीपल एंट्री व्हिजा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमी ॲण्ड टुरिझम (DET) विभागाने नुकतीच या संदर्भातील घोषणा केली. गेल्या काही वर्षांत दुबईत येणाऱ्या भारतीय प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं दुबई सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या निर्णयामुळे आता भारत आणि यूएईमधील द्वीपक्षीय संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मल्टीपल एंट्री व्हिजा योजना नेमकी काय आहे? दुबई सरकारने ही योजना का सुरू केली? ही योजना कशाप्रकारे अमलात आणली जाईल? आणि त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय? याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?

दुबई सरकारने घोषित केलेली मल्टीपल एंट्री व्हिजा योजना काय?

दुबई सरकारने भारतीयांना पाच वर्षांसाठी मल्टीपल एंट्री व्हिजा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एकदा व्हिजा मिळाला की भारतीय प्रवाशांना एकापेक्षा जास्त वेळा दुबईत प्रवेश करता येणार आहे. यादरम्यान ते एकावेळी ९० दिवसांसाठी दुबईत राहू शकतील. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास ते पुन्हा ९० दिवसांसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे पर्यटकांना एका वर्षात १८० दिवस दुबईत राहता येणार आहे. व्यावसायिक कारणांसाठी दुबईत येणाऱ्या प्रवशांना या योजनेचा सर्वाधिक फायदा होईल, असे दुबई सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

दुबई सरकारने ही योजना का सुरू केली?

मीडिया रिपोर्टनुसार, २०२३ या वर्षात दुबईला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. करोना काळानंतर ही संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबई सरकारने भारतीयांना पाच वर्षांसाठी मल्टीपल एंट्री व्हिजा देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांत दुबईत येणाऱ्या एकूण पर्यटकांमध्ये सरासरी ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय दुबईतील पर्यटनाला चालना देणे हा देखील या निर्णयामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य आणि व्यावसायिक संबंध आणखी मजबूत करणे हा देखील यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे.

हेही वाचा – गगनयान मोहिमेसाठी इस्रोने निवड केलेले चार अंतराळवीर कोण आहेत? ही निवड नेमकी कशी करण्यात आली?

मल्टीपल एंट्री व्हिजासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय?

मल्टीपल एंट्री व्हिजासाठी अर्ज करण्यापूर्वी भारतीयांना काही अटीशर्तींचे पालन करावे लागणार आहे. त्यानुसार, व्हिजासाठी अर्ज करतेवेळी अर्जदाराच्या बॅंक खात्यात चार हजार अमेरिकी डॉलर इतकी रक्कम असणे आवश्यक आहे. याशिवाय यूएईमध्ये वैध असणारा आरोग्य विमा, विमानाचे येण्या-जाण्याचे तिकीट आणि यूएईमधील मुक्कामांचे ठिकाण याची माहिती देणेही बंधनकारक आहे.

वरील अटी-शर्तीची पूर्तता केल्यानंतर अर्जदाराला दुबई सरकारच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. याशिवाय अर्जदार ‘कस्टमर हॅपीनेस सेंटर’ (भारतातील दूतावास ) मध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज सादर करू शकतात. हा अर्ज स्वीकारल्यानंतर दोन ते पाच दिवसांत व्हिजासंबंधित कारवाई सुरू केली जाईल.