Gold Silver Price Today in Marathi : गेल्या वर्षभरापासून सोने-चांदी दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. अत्यंत कमी कालावधीतच या मौल्यवान धातूंनी गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षाही जास्त परतावा दिला आहे. दिवाळीआधी सोन्याच्या दराने तब्बल सव्वा लाखांचा टप्पा ओलांडला होता; पण लक्ष्मीपूजनानंतर त्यात घसरण होऊन काहीशी स्थिरता आली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच पिवळ्या धातूच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी आली आहे. एकाच दिवसात मोठी दरवाढ नोंदवली गेल्याने ग्राहकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. येत्या काळात सोने-चांदीत गुंतवणूक करायची की नाही असा प्रश्न काहींना पडला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

सराफा व्यावसायिकांच्या मते, भारतात लग्नसराईच्या हंगामाला सुरुवात झाल्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील जळगाव शहरात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा एक लाख २३ हजार ९०९ रुपये इतका होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यात किंचित वाढ दिसून आली. मंगळवारी सकाळी सराफा बाजार उघडताच त्यात आणखी १७५१ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याच्या दराने एक लाख २८ हजार ०२९ रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

चांदीचे दरही झपाट्याने वाढले

सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून जळगाव शहरातील सराफा बाजारात चांदीचे दर प्रतिकिलो एक लाख ५४ हजार ५०० रुपयांवर स्थिरावले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच त्यात तब्बल ५१५० रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे चांदीच्या दरानेही एक लाख ६१ हजार ७१० रुपयांपर्यंचा टप्पा ओलांडला आहे. मौल्यवान धातूंच्या किमतीने पुन्हा एकदा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांना त्याची खरेदी करणे आणखीच कठीण झाले आहे. येत्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी चढ-उतार होऊ शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : Donald Trump Tariff : भारतावरील टॅरिफ होणार रद्द? डोनाल्ड ट्रम्प कशामुळे नरमले? अमेरिकेत काय घडतंय?

सोने-चांदी दरात वाढ कशामुळे होतेय?

अमेरिकन डॉलरमध्ये झालेली घसरण आणि फेडरल रिझर्व्ह बँकेकडून पुढील महिन्यात व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची मागणी वाढली आहे. या वर्षी सोन्याच्या किमती वाढण्यामागे व्याजदरात कपात हे एक प्रमुख कारण आहे. जेव्हा व्याजदर कमी होण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार सोने-चांदी खरेदीकडे वळतात. त्यातच अमेरिकन डॉलर कमजोर झाल्याने अमेरिकेबाहेरील खरेदीदारांसाठी मौल्यवान धातू तुलनेने स्वस्त ठरत आहेत, त्यामुळे मौल्यवान धातूंची मागणी आणखी वाढली आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याबाबत वाढलेल्या चिंतेमुळेही सुरक्षित गुंतवणुकीकडे ओघ वाढल्याचे सांगितले जात आहे.

लग्नसराईमुळे दरात आणखी वाढ होणार?

मेहता इक्विटीज लिमिटेडचे कमोडिटीज विभागाचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांच्या मते, जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार होऊनही सोने-चांदी दराने आपली मजबूत स्थिती कायम ठेवली आहे. अमेरिकन डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे पिवळ्या धातूच्या दराला अतिरिक्त आधार मिळाला आहे. त्याशिवाय भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. लग्नासारख्या शुभ कार्यक्रमाप्रसंगी अनेकजण सोने-चांदीची खरेदी करतात. भारतीय संस्कृतीत दोन्ही धातू खरेदी करणे शुभ मानले जाते. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सोने-चांदी दरात आणखीच वाढ होऊ शकते, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

सोने-चांदी खरेदीची योग्य वेळ कोणती?

सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळे आणि किरकोळ मागणीत वाढ झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात आणखीच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काळात सोन्याची किंमत पुन्हा एकदा १.३० लाखांपर्यंत तसेच चांदीची किंमत १.७० लाखांपर्यंत पोहोचू शकते, असे सराफा व्यावसायिकांनी म्हटले आहे. किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग शाह यांनी ग्राहकांना घाई न करता खरेदीचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. सराफा बाजारातील चढ-उतार लक्षात घेता २२ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा प्रतिग्रॅम ११,००० ते १३,००० रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता शाह यांनी वर्तवली आहे. “सराफा बाजारातील एकूणच वातावरण सकारात्मक असले तरीही दररोजच्या किमतींमध्ये काही प्रमाणात फरक राहू शकतो, त्यामुळे आधीच नियोजन करून टप्प्याटप्प्याने खरेदी केल्यास खर्चाचे नियोजन करण्यात मदत होईल,” असा सल्लाही पराग शाह यांनी दिला आहे.

हेही वाचा : नोटबंदीनंतरही अनेकांकडील रोख रक्कम दुपटीने वाढली; कारण काय? आरबीआयची आकडेवारी काय सांगते?

आता खरेदी करावी का थांबावे?

दिवाळीआधी मौल्यवान धातूच्या किमतींत विक्रमी वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्याच्या उद्देशाने त्याची विक्री सुरू केली आहे. परिणामी, लक्ष्मीपूजनानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घट दिसून आली. त्यातच सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांनी कमी खरेदी केल्याने किंवा त्याकडे पाठ फिरवल्यानेही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला होता. यादरम्यान पिवळ्या धातूचे दर पुन्हा वधारल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदार आणि लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा असे आव्हान सराफा तज्ज्ञांनी केले आहे. जागतिक संकेतांमुळे दररोज सोने-चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू राहू शकतात. गुंतवणूकदारांसाठी खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी अभ्यास करूनच व्यवहार करावा, असा सल्लाही दिला जात आहे.