Doctor handwriting issues सध्याच्या काळात लिखाण खूप कमी झाले आहे. प्रत्येकजण टेक्नोसेव्ही झाल्याने लिहिण्यासाठी कीबोर्डचा वापर करतात. परंतु, डॉक्टरांच्या लिखाणाला खूप महत्त्व आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. अनेक डॉक्टरांचे हस्ताक्षर खूप वाईट असतात आणि ते केवळ औषध विक्रेत्यालाचा कळतात. जगभरात डॉक्टरांच्या हस्ताक्षरावरून अनेक विनोदही केले जातात. परंतु, न्यायालयाच्या निकालानुसार हा विनोदाचा विषय नाही. याबाबतचे महत्त्व न्यायालयाने अधोरेखित केले आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नुकताच यावर निकाल दिला आहे. वाचता येईल असे वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मूलभूत हक्क असल्याचे न्यायालयाचे म्हणने आहे. यामुळे जीवन आणि मृत्यूचा फरक पडू शकतो, असेही न्यायालयाचे म्हणणे आहे. न्यायालयाने नक्की काय निकाल दिला? अक्षरात सुधारणा करण्याचे निर्देश का देण्यात आले? नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात…
न्यायालयाच्या आदेशात काय?
न्यायालयाने हा आदेश महिलेच्या एका फसवणूक प्रकरणावर सुनावणी करताना दिला आहे. यात एका महिलेने बलात्कार, फसवणूक आणि बनावटगिरीचे आरोप केले होते. न्यायमूर्ती जसगुरप्रीत सिंग पुरी यांनी संबंधित पुरुषाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना हा आदेश दिला. संबंधित पुरुषाने सरकारी नोकरीचे आश्वासन देऊन आपल्याकडून पैसे घेतले, तिच्या बनावट मुलाखती घेतल्या आणि तिचे लैंगिक शोषण केले, असा महिलेचा आरोप होता. आरोपीने मात्र हे आरोप फेटाळून लावले. त्यांचे संबंध परस्पर संमतीने होते आणि पैशांच्या वादातून हा खटला दाखल करण्यात आला, असे त्याने सांगितले.
न्यायमूर्ती पुरी यांनी जेव्हा महिलेची तपासणी करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनी लिहिलेला वैद्यकीय कायदेशीर अहवाल पाहिला, तेव्हा तो त्यांना समजला नाही. “त्यातला एक शब्द किंवा एक अक्षरही स्पष्टपणे वाचण्यायोग्य नव्हते,” असे त्यांनी आदेशात लिहिले आहे. “ज्या काळात तंत्रज्ञान आणि संगणक सहज उपलब्ध आहेत, अशा वेळी सरकारी डॉक्टर अजूनही हाताने प्रिस्क्रिप्शन लिहीत आहेत, हे प्रिस्क्रिप्शन काही औषध विक्रेत्यांना सोडल्यास कोणालाही वाचता येत नाही, हे धक्कादायक आहे,” असे न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाने सरकारला वैद्यकीय अभ्यासक्रमात हस्तलेखन धड्यांचा समावेश करण्यास सांगितले आणि डिजिटल प्रिस्क्रिप्शन्स सुरू करण्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा निश्चित केली. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत सर्व डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन मोठ्या किंवा कॅपिटल अक्षरांत स्पष्टपणे लिहावे, असे न्यायमूर्ती पुरी म्हणाले.
“प्रत्येक डॉक्टरला सुवाच्य अक्षरात लिहिणे शक्य नाही”
इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांच्या संस्थेत ३,३०,००० हून अधिक डॉक्टर आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितले की, ते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मदत करण्यास तयार आहेत. शहरे आणि मोठ्या नगरांमध्ये डॉक्टरांनी डिजिटल प्रिस्क्रिप्शन्सचा वापर सुरू केला आहे, परंतु ग्रामीण भागांमध्ये आणि लहान शहरांमध्ये वाचता येईल असे प्रिस्क्रिप्शन मिळणे खूप कठीण आहे, असे ते म्हणतात.
“अनेक डॉक्टरांचे हस्ताक्षर खराब असते, हे सत्य आहे, पण याचे कारण म्हणजे बहुतेक डॉक्टर्स खूप व्यस्त असतात, विशेषत: सरकारी रुग्णालयांमध्ये,” असे ते सांगतात. “आम्ही आमच्या सदस्यांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास आणि ठळक अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहिण्यास सांगितले आहे.. ते रुग्ण आणि औषध विक्रेते असे दोघांनाही वाचता येईल. जो डॉक्टर दिवसाला सात रुग्णांना तपासतो, तो हे करू शकतो, पण दिवसाला ७० रुग्ण तपासणाऱ्या डॉक्टराला हे शक्य होत नाही,” असे ते पुढे सांगतात.
न्यायालयाने डॉक्टरांच्या हस्ताक्षराची यापूर्वीही घेतली होती दखल
डॉक्टरांच्या हस्ताक्षरासंदर्भात न्यायालयाने आदेश देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, ओडिशा उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या वळणदार लेखनशैलीवर ताशेरे ओढले होते आणि अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनीही या हस्ताक्षराबद्दल खेद व्यक्त केला होता. परंतु, डॉक्टरांचे हस्ताक्षर इतरांपेक्षा वाईट आहेत या समजुतीला अभ्यासकांनी नकार दिलाय. असे असले तरी तज्ज्ञ सांगतात की, त्यांच्या हस्ताक्षरावर बोलणे हा सोयीचा मुद्दा नाही. कारण- वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनमध्ये अक्षर न कळल्यास चुकीचा अर्थ लागू शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षरामुळे उद्भवू शकतो गंभीर धोका
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन (IoM) च्या १९९९ च्या अहवालानुसार, वैद्यकीय चुकांमुळे अमेरिकेत दरवर्षी अंदाजे किमान ४४,००० मृत्यू झाले, त्यापैकी ७,००० मृत्यूंना डॉक्टरांचे खराब हस्ताक्षर कारणीभूत होते. अलीकडे, स्कॉटलंडमध्ये एका महिलेला डोळ्यांची समस्या होती आणि तिला चुकून दुसरे क्रीम दिल्याने तिला जखमा झाल्या. ब्रिटनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे की, “औषधांच्या चुकांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि मृत्यू झाले आहेत. रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रिस्क्रिप्शन प्रणाली सुरू केल्यास चुका ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात”.
भारतात खराब हस्ताक्षरामुळे झालेल्या नुकसानीचा डेटा नाही, मात्र यापूर्वी प्रिस्क्रिप्शन वाचण्याच्या चुकीमुळे देशात अनेक मृत्यू झाले आहेत. अशी एक खूप गाजलेली केस आहे. या प्रकरणात एका महिलेने मधुमेहाचे औषध घेतले, या औषधाचे नाव तिला सांगितलेल्या वेदना कमी करणाऱ्या औषधाशी साम्य दर्शवणारे होते आणि त्यामुळे त्या औषधाचा तिच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम झाला. तेलंगणा राज्यातील नलगोंडा शहरात फार्मसी चालवणारे चिलुकुरी परमाथमा यांनी बीबीसीला सांगितले की, २०१४ मध्ये, नोएडा शहरात तीन वर्षांच्या मुलीचा चुकीचे इंजेक्शन दिल्याने मृत्यू झाला. त्यांनी याविषयी हैदराबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
२०१६ मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने आदेश दिला की, “प्रत्येक डॉक्टराने औषधे जेनेरिक नावांसह स्पष्टपणे आणि शक्यतो कॅपिटल अक्षरात लिहून द्यावीत”. २०२० मध्ये, भारताचे आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी संसदेत सांगितले होते की, “या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.” परंतु, जवळजवळ एक दशकानंतरही, खराब अक्षरात लिहिलेली प्रिस्क्रिप्शन्स अजूनही पाहायला मिळत आहेत.
कोलकाता शहरातील सुप्रसिद्ध फार्मसीपैकी एक असलेल्या धनवंतरीचे सीईओ रवींद्र खंडेलवाल यांचे म्हणणे आहे की कधीकधी त्यांच्याकडे आलेली प्रिस्क्रिप्शन्स वाचण्यायोग्य नसतात. “गेल्या काही वर्षांत, शहरांमध्ये आम्ही हस्तलिखित प्रिस्क्रिप्शनऐवजी मुद्रित (printed) प्रिस्क्रिप्शन्सचा वापर होताना पाहिला आहे, परंतु उपनगरीय आणि ग्रामीण भागांमध्ये बहुतेक प्रिस्क्रिप्शन्स आजही हाताने लिहिलेली असतात.”