Delhi Red Fort turning Black दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचा दुष्परिणाम केवळ नागरिकांच्या आरोग्यावरच नव्हे, तर शहरातील ऐतिहासिक वास्तूंवरदेखील होताना दिसत आहे. एका नव्या अभ्यासानुसार दिल्लीचा प्रतिष्ठित लाल किल्ला ‘काळा’ पडत असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील विषारी हवेमुळे या स्मारकाच्या भिंतींवर काळा थर जमा झाला आहे. भारताची राजधानी दिल्ली जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक आहे. या अभ्यासाने दिल्लीला दरवर्षी विशेषतः हिवाळ्याच्या महिन्यांत भेडसावणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर संकटावर प्रकाश टाकला आहे. लाल किल्ला काळा पडण्याची कारणे काय? नव्या अभ्यासात नक्की काय समोर आले? जाणून घेऊयात…
लाल किल्ला काळा पडण्याची कारणं काय?
- संशोधकांना लाल किल्ल्याच्या वालुकामय दगडाच्या भिंतींच्या काही भागांवर जाड काळा थर जमा झाल्याचे आढळून आले आहे.
- ‘Characterization of Red Sandstone and Black Crust to Analyze Air Pollution Impacts on a Cultural Heritage Buildin : Red Fort, Delhi, India’ या शीर्षकाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, किल्ल्याच्या भिंतींवर जमा झालेला हा काळा थर ०.०५ मिमी इतका जाड आहे.
- त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास मुघलकालीन असलेल्या स्मारकावरील नक्षीकाम खराब होईल, असा इशाराही या अभ्यासात देण्यात आला आहे.
१७ व्या शतकातील या स्मारकावर वायुप्रदूषणाचा होणारा परिणाम तपासणारा हा पहिलाच अभ्यास आहे. हे संशोधन जूनमध्ये ‘Heritage’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले. हे संशोधन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इटलीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं. हे संशोधन २०२१ ते २०२३ या काळात आयआयटी रुरकी, आयआयटी कानपूर, इटलीच्या व्हेनिसमधील ‘Ca’ Foscari’ विद्यापीठ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) येथील संशोधकांनी केले. या काळात संशोधकांनी दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेच्या (Air Quality) आकडेवारीचे विश्लेषण केले.
दिल्लीचे प्रदूषण आणि त्याचा लाल किल्ल्यावरील दुष्परिणाम
संशोधकांनी लाल किल्ल्याची तटबंदी आणि जफर महाल येथून नमुने गोळा केले. तसेच, त्यातील घटक तपासण्यासाठी त्यांनी स्मारकाच्या अनेक भिंतींवर आढळलेल्या काळ्या थराचे नमुनेही खरवडून गोळा केले. त्यानंतर संशोधकांनी २०२१ ते २०२३ या कालावधीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (CPCB) हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी घेतली. या काळात, हवेतील सूक्ष्म कणांची घनता राष्ट्रीय मर्यादेपेक्षा अडीच पटींनी जास्त होती. या अभ्यासानुसार, हवेतील सूक्ष्म कण आणि इतर प्रदूषकांमुळे लाल किल्ल्याच्या भिंतींवर काळे थर जमा झाले आहेत. या प्रदूषणामुळे व्हॉल्ट्स, कमानी व नाजूक दगडी कोरीव काम यांसारख्या इतर वास्तूंच्या घटकांचेही नुकसान झाले आहे. संशोधकांना किल्ल्याच्या भिंतींवर पापुद्रे निघत असल्याचेदेखील आढळले आहे.
PM 10 ला पार्टिक्युलेट मॅटर म्हणतात. या कणांचा आकार १० मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचा असतो. त्यात धूळ, घाण व धातूचे सूक्ष्म कण असतात आणि बांधकाम, धूळ, कचरा जाळण्यामुळे PM 10 आणि 2.5 ची पातळी अधिक वाढते. “PM2.5 आणि PM10 मुळे हवेच्या संपर्कात येणाऱ्या वस्तूच्या भागांना नुकसान पोहोचत आहे. ही प्रक्रिया तेव्हा घडते जेव्हा सूक्ष्म कण कालांतराने एका भागावर बसतात आणि जमा होतात, त्यामुळे या पृष्ठभागांचा रंग बदलतो आणि काळे डाग पडू लागतात,” असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
अभ्यासानुसार, लाल वालुकामय दगडात मुख्यतः क्वार्टज आणि मायक्रोक्लाइन यांचा समावेश होता, तर काळ्या थरांमध्ये जिप्सम, बासनाईट, वेडेलाईट, क्वार्टज आणि मायक्रोक्लाइन यांचा समावेश होता. “अभ्यासातील लेखकांनी काळ्या थरांमध्ये जिप्समच्या मोठ्या प्रमाणातील उपस्थितीचा संबंध बांधकाम, रस्त्यावरील धूळ आणि सिमेंट कारखान्यांमधून होणाऱ्या उत्सर्जनाशी जोडला आहे,” असे या अभ्यासात म्हटले आहे. या ठिकाणाला भेट दिल्यावर संशोधकांनी लाल किल्ल्याजवळ वाहनांची गर्दी, उद्योग व कारखाने, तसेच उच्च प्रमाणात सूक्ष्म कण, बायोमास जाळणे व जमिनीवरील धूळ पाहिली. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, हे काळे थर प्रदूषित वातावरणाचा परिणाम आहे.”
यावरील उपाय काय?
हा अभ्यास लाल किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी संवर्धन प्रयत्न वाढवण्याची शिफारस करतो. दाट लोकवस्तीच्या भागांमधील वायुप्रदूषक कमी करणे हे आव्हानात्मक आहे. परंतु, दगडाच्या पृष्ठभागावर जमणाऱ्या काळे थरांचे प्रमाण कमी करता येऊ शकते, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. संशोधकांनी सांगितले की, प्रतिबंधात्मक संवर्धन उपाययोजनांमुळे काळ्या थरांची निर्मिती कमी करण्यास मदत मिळू शकते. “काळ्या थरांची निर्मिती ही वाढत जाणारी प्रक्रिया आहे. सुरुवातीला अगदी पातळ असणारे काळे डाग गडद होत जातात. त्यामुळे सुरुवातीलाच म्हणजे दगडाला नुकसान पोहोचण्यापूर्वीच हे डाग काढले जाऊ शकतात,” असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
या अभ्यासात सर्वाधिक प्रभावित भागांसाठी नियमित साफसफाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काळ्या थरांची वाढ रोखण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी दगडावर संरक्षणात्मक लेप लावता येऊ शकतो, असेही यात म्हटले आहे. संशोधकांनी सांगितले की, हा अभ्यास जगभरातील सांस्कृतिक वारसा इमारतींच्या जीर्णोद्धार आणि संरक्षणासाठी एक योजना तयार करण्यास मदत होऊ शकते.