अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक जेफ बेझोस आणि अमेरिकन लेखक आणि पत्रकार लॉरेन सांचेझ हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. लोकप्रिय इटालियन शहर व्हेनिसमध्ये त्यांच्या लग्नाचे भव्यदिव्य असे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेले नाही, मात्र जूनच्या अखेरीस हा सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. या सोहळ्यात हॉलिवूड, दिग्गज व्यावसायिक आणि राजकारणातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

जेफ बेझोस हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२०.९ बिलियन डॉलर्स आहे. या लग्न सोहळ्यासाठी ते संपूर्ण सॅन जॉर्जिओ बेट बुक करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यामुळे या भव्य सोहळ्यासाठी व्हेनिसमधील काही भाग बंद राहणार असल्याचीदेखील चर्चा आहे. मात्र, तेथील स्थानिकांना हे पटलेले नाही. नक्की हे प्रकरण काय? लोकांचा त्यांच्या लग्नाला विरोध का आहे? आणि या भव्यदिव्य लग्नाची इतकी चर्चा का आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

लग्न सोहळ्यासाठी ते संपूर्ण सॅन जॉर्जिओ बेट बुक करण्याच्या तयारीत आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

जेफ बेझोस यांच्या लग्नाची इतकी चर्चा का?

जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या बहुप्रतिक्षित लग्न सोहळ्यासाठी २३ ते २८ जून दरम्यान व्हेनिसमध्ये शेकडो हाय-प्रोफाइल पाहुणे येण्याची शक्यता आहे. हा सोहळा संपूर्ण सॅन जॉर्जियो बेटावर आयोजित केला जाणार असल्याची माहिती आहे. हे बेट प्रतिष्ठित सेंट मार्क्स स्क्वेअरच्या अगदी समोर आहे. या लग्नात हजारो कोटींचा खर्च करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा समारंभ भव्यदिव्य असण्याची शक्यता आहे. या सोहळ्यास २५० पेक्षा कमी पाहुणे असतील, त्यात त्यांचे सेलिब्रिटी मित्र ओप्रा विन्फ्रे, मिक जॅगर आणि केटी पेरी यांचा समावेश असेल. या सोहळ्यात इवांका ट्रम्पदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ६१ वर्षीय अब्जाधीश जेफ बेझोस यांनी मे २०२३ मध्ये सांचेझ यांना किमान २.५ मिलियन डॉलर्स किमतीची एक गुलाबी हिऱ्याची अंगठी देत प्रपोज केले होते.

या जोडप्याची ५०० दशलक्ष डॉलर्सची सुपरयॉट ‘कोरू’ या सोहळ्यातील आकर्षण असणार आहे. व्हेनिसच्या कालव्यांमधून पाहुण्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी पारंपारिक वॉटर टॅक्सीची व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘रिपब्लिका’च्या वृत्तानुसार पाहुण्यांच्या थांब्यासाठी त्यांनी व्हेनिसमधील सर्वात आलिशान हॉटेल्स बुक केली आहेत. त्यात द ग्रिटी पॅलेस, हॉटेल डॅनिएली, अमन व्हेनिस, बेलमंड हॉटेल सिप्रियानी आणि ग्लॅमरस सेंट रेजिस व्हेनिस यांचा समावेश आहे. या हॉटेल्समधील खोल्यांची एका रात्रीची किंमत ३,२०० डॉलर्स पासून सुरू होते. उच्च लक्झरी हॉटेल्सच्या खोल्यांची किंमत यापेक्षा दहापट जास्त असू शकते. लग्नाच्या भव्य अश्या थाटामुळे आणि किमतीमुळे या लग्नाची सध्या चर्चा आहे.

लोक त्यांच्या लग्नाला विरोध का करत आहेत?

जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांचे लग्न एक भव्य उत्सव असणार आहे, असे सांगण्यात आले आहे. यामुळे व्हेनेशियन लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. स्थानिक कार्यकर्ते ‘नो स्पेस फॉर बेझोस’ अशा घोषणा करत जेफ बेझोस यांच्या लग्नाला तीव्र विरोध करत आहेत. या शहरात सुमारे ५०,००० नागरिक राहतात. पर्यटकांसाठी हे अगदी पसंतीचे ठिकाण आहे, दरवर्षी या शहराला जवळजवळ २० दशलक्ष पर्यटक भेट देतात. निषेध करणाऱ्या स्थानिकांचे असे सांगणे आहे की, अशा भव्य कार्यक्रमांमुळे परिस्थिती आणखी बिकट होते, भाडे वाढते, संसाधनांवर ताण येतो आणि स्थानिकांसाठी दैनंदिन जीवन अधिक कठीण होते. याचाच विरोध म्हणून त्यांनी सर्वत्र ‘नो स्पेस फॉर बेझोस’ असे पोस्टर लावले आहेत.

व्हेनेशियन कार्यकर्त्या फेडेरिका टोनिनेलो यांनी दावा केला की, लग्न सोहळ्यासाठी एक ऐतिहासिक मिसेरिकॉर्डिया हॉलची निवड केली जाऊ शकते. परंतु, बेझोस कधीही मिसेरिकॉर्डियामध्ये पोहोचणार नाहीत,” असे त्या म्हणाल्या. ‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, शहराने या आठवड्याच्या शेवटी आणि पर्यटकांची संख्या वाढत असताना दिवसाचा प्रवास शुल्क १० युरो केला आहे. परंतु प्रचारकांचे म्हणणे आहे की, हे पुरेसे नाही. शाळा, रुग्णालये आणि परवडणारी घरे यासारख्या मूलभूत सेवांमध्ये सतत घट होत आहे. व्हेनिसला शोकेस असल्यासारखे वागवले जात आहे,” असे फेडेरिका टोनिने यांनी ‘बीबीसी’ला सांगितले. त्या म्हणाल्या, हे लग्न बाहेरील लोकांकडून करण्यात येणारे शहराचे शोषण आहे. आंदोलकांपैकी एक असणाऱ्या ना हबी स्टेला फेय म्हणाल्या की, भव्य लग्नात व्यत्यय आणण्यासाठी कालवे आणि रस्ते अडवण्याची आमची योजना आहे.

व्हेनिसमधील अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

महापौर लुइगी ब्रुग्नारो म्हणाले की, निदर्शकांमुळे ते नाराज आहेत. त्यांनी म्हटले की या शहरातील प्रत्येकजण त्यांच्यासारखा नाही. आम्हाला आमच्या नागरिकांचा खूप अभिमान आहे, असे ब्रुग्नारो यांनी ‘एपी’ला सांगितले. ते म्हणाले, “मला माहित नाही की मला बेझोस आणि सांचेझ यांना भेटण्यासाठी वेळ मिळेल की नाही, परंतु त्यांनी व्हेनिसची निवड केली ही सन्मानाची बाब आहे. व्हेनिस पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठ म्हणून समोर येत आहे.” सेंट मार्क दुकानदारांच्या संघटनेचे प्रमुख असलेले ज्वेलर्स सेत्रक तोकाट्झियान यांनी इटालियन माध्यमांना सांगितले की, निषेध करणारे लोक शहराला हानी पोहोचवता.

अशा भव्य सोहळ्यामुळे लोकांना काम मिळते, अन्यथा आपण केवळ पर्यटनावर अवलंबून आहोत. बर्लिनहून भेट देणारे गॉर्ग मेयर यांनी ‘सीएनएन’ला सांगितले, “हे हास्यास्पद आहे की व्हेनिससारखे पर्यटनावर अवलंबून असलेले शहर अशा कार्यक्रमाला नकार देतात. यामध्ये वेटरपासून ते वॉटर टॅक्सी चालकांपर्यंत शेकडो लोकांना काम मिळेले. सर्व पाहुणे आणि पत्रकार हॉटेलमध्ये राहतील, रेस्टॉरंटमध्ये जेवतील आणि पैसे खर्च करतील.”