अमोल परांजपे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या चंद्रयान-३ मोहिमेतील ‘विक्रम’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला आणि त्यातील ‘प्रज्ञान’ या रोव्हरने त्या भागातील माती, हवामान, खनिजे याचा अभ्यासही सुरू केला आहे. या मोहिमेच्या यशामुळे भारत हा चंद्रावर ‘अलगद अवतरणा’चे तंत्रज्ञान अवगत केलेला चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. आजवर अमेरिका, रशियासह अनेकांनी तेथे उतरण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. चंद्राच्या इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा त्याचा दक्षिण ध्रुव हा अधिक महत्त्वाचा असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. याचे कारण काय, त्या भागाचे वेगळेपण काय, तो भाग अभ्यासण्याची एवढी तीव्र स्पर्धा का, याचा हा आढावा.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे वैशिष्ट्य काय?

चंद्रावर प्रचंड मोठी विवरे आणि गर्ता आहेत, हे आता आपल्याला माहिती आहे. यातील काही विवरे इतकी मोठी आहेत, की त्यांचे अस्तित्व आपल्याला पृथ्वीवरूनही समजते. त्यालाच आपण ‘चंद्रावर असलेला डाग’ म्हणतो. मात्र आपल्याला कधीही न दिसणाऱ्या चंद्राच्या मागच्या बाजूला, विशेषत: दक्षिण ध्रुवीय प्रदेशात त्यापेक्षा कितीतरी अजस्र विवरे आहेत. चंद्राची एकच बाजू कायम पृथ्वीसमोर असल्यामुळे तेथे प्रत्यक्ष गेल्याशिवाय त्यांचा अभ्यास करता येणे अशक्य आहे. त्यामुळेच विविध देशांनी आजवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे प्रयत्न चालविले होते. आतापर्यंत इस्रोसह विविध देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी काढलेल्या मोहिमांमध्ये दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्यात आला आहे. तेथे असलेल्या विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाण्याचे अस्तित्व असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आगामी काळातील मोहिमांसाठी हा बर्फ अतिशय महत्त्वाचा मानला जात असल्याने त्याचा अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

चंद्रावरील बर्फाचे महत्त्व काय?

दक्षिण ध्रुवावर असलेल्या विवरांमध्ये सूर्यप्रकाश कधीही पोहोचत नाही. त्यामुळे कोट्यवधी वर्षांपासून या विवरांमध्ये असलेला बर्फ जसाच्या तसा आहे. त्याच्या अभ्यासातून वैज्ञानिकांना सूर्यमालेची उत्पत्ती, चंद्राची निर्मिती इत्यादीचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. दुसरे महत्त्वाचे कारण असे, की बर्फ आहे, याचा अर्थ चंद्रावर पाणी आहे. या पाण्यामुळे भविष्यात चंद्रावर वस्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न सुटणार आहेत. एकतर हे पाणी पिण्यासाठी आणि उपकरणे थंड करण्यासाठी वापरता येईल. दुसरे म्हणजे पाण्याच्या अणूचे विघटन करून मिळणारा ऑक्सिजन श्वसनासाठी आणि हायड्रोजन इंधन म्हणून वापरता येणे शक्य होईल. आगामी काळात मंगळ आणि त्या पलिकडच्या ग्रहांवर मोहिमा आखण्यासाठी चंद्रावर प्रक्षेपणतळ उभारले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीही या पाण्याचा उपयोग होऊ शकेल.

दक्षिण ध्रुवावर उतरणे अवघड का?

दक्षिण ध्रुवावर मोठी विवरे आहेत, शिवाय तेथील पृष्ठभाग अधिक खडबडीत आहे. यान उतरविताना ते एखाद्या विवरामध्ये अदृश्य होणे सहज शक्य आहे. शिवाय चंद्राचा एक दिवस हा आपल्या १४ दिवसांइतका असतो. तेथे हवा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण काळोख असतो. अशा वेळी कोणतेही यान उतरविणे शक्य नसते. चंद्रयान-३ उतरले, त्याच्या तीन दिवस आधीच रशियाची अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ने सोडलेले ‘लुना-२५’ यान अनियंत्रित होऊन चंद्रावर आदळले. चंद्रयान-१ मोहिमेतून भारताने दक्षिण ध्रुवावर ‘इम्पॅक्ट प्रोब’ पाठवला होता. ती मोहीम यशस्वी झाली आणि दक्षिण ध्रुवावर ‘हार्ड लँडिंग’ करणारा भारत हा पहिला देश ठरला. चंद्रयान-२ मोहिमेतील ‘विक्रम’ लँडर अखेरच्या क्षणी चंद्रपृष्ठावर आदळल्यामुळे ती मोहीम अंशत: अपयशी ठरली असली तरी त्यातील चुकांमधून धडे घेत चंद्रयान-३ मोहीम यशस्वी पार पाडली गेली.

मोहिमेच्या यशानंतर पुढे काय?

आता ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’मार्फत दक्षिण ध्रुवाची अधिकाधिक माहिती गोळा केली जाईल. ही माहिती युरोपीय अंतराळ संशोधन संस्था, ‘नासा’ यासह अन्य संस्थांनाही देणे ‘इस्रो’ला बंधनकारक आहे. या संस्थांच्या मोहिमांमधून हाती आलेली माहितीही सातत्याने ‘इस्रो’ला पुरविली जात असते. आगामी काळात चीन आणि ‘नासा’कडून दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. चंद्रयान-३च्या अनुभवाचा फायदा या संस्थांना होईल. चंद्रावर वस्ती करायची झाल्यास ती मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी, पर्यायाने दक्षिण ध्रुवाजवळ केली जाईल, असे सांगितले जाते. त्यासाठीही ‘चंद्रयान’सह भविष्यातील मोहिमांमधून हाती येणाऱ्या माहितीचा उपयोग होऊ शकेल.

  • amol.paranjpe@expressindia.com