इस्रायलने गाझापट्टीवर जमिनीवरून आक्रमण करण्याचा इशारा दिला असला तरी त्यांच्यासमोर खरे आव्हान आहे ते भूसुरुंगाचे. गाझापट्टीत जमिनीखालील बोगद्यांचा चक्रव्यूह असून, हमासचे त्याच्यावर नियंत्रण आहे. त्यामुळे गाझापट्टीवर आक्रमण केल्यानंतर भूसुरुंग हे महत्त्वाचे युद्धक्षेत्र ठरेल. गाझापट्टीत सुमारे १,३०० भूसुरुंग आहेत, ज्यांची लांबी जवळपास ५०० किमी आहे. ७० मीटरपर्यंत सर्वांत खोल भूसुरुंग असून, अनेक बोगद्यांची उंची व रुंदी दोन मीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे, अशी माहिती डीडब्ल्यू या संकेतस्थळाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूएस मिलिटरी अकॅडमी वेस्ट पॉइंटचे जॉन स्पेन्सर यांच्या मते, गाझापट्टीच्या जमिनीखाली असलेले बोगदे ही एक मोठी जटील समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आतापर्यंत कोणतेही परिपूर्ण असे पर्याय समोर आलेले नाहीत. या बोगद्यांवर नियंत्रण मिळण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. गाझापट्टीतील बोगदे कधी आणि का अस्तित्वात आले? ते कशासाठी वापरले जातात आणि इस्रायल संरक्षण दलासमोर (IDF) या बोगद्यांचे मोठे आव्हान का उभे राहिले आहे? या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा …

हे वाचा >> गाझापट्टीला जगातील सर्वात मोठे ‘खुले कारागृह’ का म्हणतात?

नाकेबंदी करून कोंडलेल्या लोकांसाठी जीवनरेखा

१९८० च्या दशकात गाझापट्टीच्या जमिनीखाली सर्वप्रथम बोगदे खणण्यात आले, असे सांगितले जाते; मात्र बोगद्यांची संख्या आणि ते निर्माण करण्यामधील सातत्य २००७ सालानंतर वाढले. हमासने गाझापट्टीतील प्रशासनावर पकड मिळविल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीच्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. नाकेबंदी केल्यामुळे गाझामधील लोकांचा एक प्रकारे कोंडमारा झाला. जमिनीखालील बोगद्यांमुळेच त्यांना जीवनावश्यक असलेल्या वस्तू, अन्नपदार्थ, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व स्वच्छतेसाठी वापरली जाणारी उत्पादने बाहेरच्या जगातून आणणे शक्य झाले. त्यामुळेच या बोगद्यांना गाझावासीयांची जीवनरेखा म्हटले जायचे. गाझापट्टीची दक्षिण सीमा इजिप्तला लागून आहे. या सीमेलगत असलेल्या राफा व सिनाई द्वीपकल्प या शहरांमधून गाझापट्टीत अत्यावश्यक वस्तूंची तस्करी केली जाते.

२०१३ पूर्वी जेव्हा इजिप्तने सीमेपलीकडून होणारी तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा १२ किमीच्या इजिप्त-गाझा सीमेवर जवळपास २,५०० हजार बोगदे असल्याचे समोर आले. या बोगद्यामधून रोज ५०० टन लोखंड आणि ३,००० टन सिमेंटची तस्करी केली जात होती. गाझापट्टीची अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आणि गाझामधील लोकांच्या अस्तित्वासाठी या भूसुरुंगाने मोठी जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच भूसुरुंग बांधण्यासाठी आणि त्यांची देखभाल ठेवण्यासाठी हमासने लाखो डॉलर्स खर्च केले आहेत.

गाझापट्टीतील बोगद्यांची हमासच्या योद्ध्यांना खडानखडा माहिती आहे. (Photo – Reuters)

बोगद्यांमुळे तुल्यबळ लढत

जमिनीखालील बोगद्यांमधून केवळ अत्यावश्यक वस्तूंचीच तस्करी होत होती, असे नाही. हमाससाठी लागणारी हत्यारे आणि इतर लष्करी साहित्यदेखील याच बोगद्यांमधून गाझापट्टीत आणले जात होते. दक्षिण सीमेवरून वस्तूंची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोगद्यांखेरीज हमासने लष्करी वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वेगळे बोगदे खणले होते.

हे वाचा >> मुंबईपेक्षाही लहान असलेली ‘गाझा’पट्टी गेल्या १०० वर्षांत युद्धभूमी कशी ठरली?

गाझाच्या जमिनीखाली अनेक संरक्षणात्मक बोगदेही खणण्यात आले आहेत. या ठिकाणी लष्कराचे तळ आणि शस्त्रास्त्रांचा साठा करण्यात येतो. वेस्टर्न मिलिट्री तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोगद्यांच्या माध्यमातून हमासने इस्रायलवर हल्ला केला होता, तसेच या भूसुरुंगांत इस्रायलमधून अपहरण करून आणलेल्या लोकांना ओलिस ठेवले असल्याचेही सांगण्यात येते.

इस्रायल-गाझापट्टीला लागून असलेल्या आक्षेपार्ह बोगद्यांचा वापर सीमेपलीकडे हल्ले करणे किंवा इतर कारवाया करण्यासाठी होत होता. त्यामुळेच इस्रायलने २०१४ साली ‘कॅसस बेली’चे कारण देऊन गाझापट्टीवर हल्ले केले होते. (कॅसस बेली म्हणजे युद्धाचे समर्थन करण्यासाठी दिलेले कारण)

यूएस मिलिटरी अकॅडमीचे जॉन स्पेन्सर हे शहरी युद्धाचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी सांगितले की, या भूमिगत बोगद्यांमुळे हमासच्या योद्ध्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सुरक्षित आणि मुक्तपणे संचार करणे शक्य झाले. थोडक्यात सांगायचे तर इस्रायलची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, रणनीती, तंत्रज्ञान व मजबूत लष्कर असूनही या बोगद्यांमुळे हमासकडून तुल्यबळ लढत देण्यात येते आणि इस्रायलच्या लष्कराच्या आधुनिकतेचा तितकासा लाभ इस्रायलला मिळत नाही.

खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते स्टिल, सिमेंटपर्यंत सर्व वस्तू बोगद्यातून तस्करी केल्या जातात. (Photo – Reuters)

बोगद्यांचा सामना कसा करणार?

वरील विवेचनावरून भूसुरुंग किंवा जमिनीखालील बोगदे हमाससाठी किती महत्त्वाचे आहेत, हे कळते. त्यामुळे इस्रायली लष्कर जेव्हा गाझापट्टीवर जमिनीवरून हल्ला करील, तेव्हा त्यांच्यासमोर भूसुरुंग उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सर्वप्रथम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे बोगदे आहेत कुठे? हे शोधावे लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते, हे भूसुरुंग शोधणे म्हणजे गवताच्या गंजीमध्ये सुई शोधण्यासारखे आहे.

इस्रायलने शत्रू राष्ट्रांवर पाळत ठेवण्यासाठी अत्याधुनिक रडार, थर्मल इमेजिंग आणि मॅग्नेटिक सिग्नेचर्स असे तंत्रज्ञान विकसित केले असले तरी जमिनीखालील बोगद्यांना शोधण्यासाठी मानवी गुप्तहेरांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे गाझापट्टीच्या खाली किती बोगदे आहेत, त्यांची लांबी किती? याचा सहज अंदाज लावणे कठीण आहे.

आणखी वाचा >> गाझापट्टीतील लोकांना दक्षिण दिशेला जाण्याचे इस्रायलचे फर्मान; मरण पत्करूनही अनेक लोकांचा यासाठी नकार का?

दुसरे असे की, जमिनीखालील बोगद्याचे निश्चित स्थान जरी कळले तरी बोगदे नष्ट करणे सोपे काम नाही. बोगद्यात सैनिकांना उतरविणे हे मोठ्या जोखमीचे होऊ शकते. कदाचित सैनिकांना बोगद्यात अडकवून त्यांना नुकसान पोहोचवले जाऊ शकते. बोगद्यामध्ये लढाई करणे हमाससाठी खूप सोपे आहे. बोगद्यातील वळणांची आणि इतर सर्व इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे.

स्पेन्सर यांच्यामते, जमिनीखालील बोगद्यात युद्ध करण्यासाठी इस्रायलचे सैनिक जगातील इतर सैनिकांपेक्षाही अधिक प्रशिक्षित आहेत. पण गाझाचे भूसुरुंग हे खूप मोठे आणि खोलवर पसरलेले आहेत. त्यामुळे त्यातून हमासला हुसकावने हे कठीण काम आहे, तसेच यासाठी विचार करता येणार नाही इतकी मानवी किंमत मोजावी लागेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the israel will struggle to neutralise gazas tunnels network kvg