पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी जानेवारी २०१८ साली पहिल्या महायुद्धाच्या शतकपूर्तीनिमित्त इस्रायलमधील हैफा शहराला ताब्यात घेत असताना शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना दिल्लीतील तीन मूर्ती चौक येथे आदरांजली वाहिली. दिल्लीच्या मध्यभागी असलेल्या या चौकाचे त्यानंतर नामविस्तार करत 'तीन मूर्ती हैफा चौका' असे नवे नाव देण्यात आले. ब्रिटिश सैन्यांच्या इम्पिरियल कॅव्हलरी ब्रिगेडमध्ये (घोडदळ) असलेल्या जोधपूर, म्हैसूर आणि हैदराबादमधील सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी या तीन सैनिक तुकड्यांतील तीन जवानांचे प्रतिकात्मक पुतळे या ठिकाणी आहेत, त्यामुळेच त्याला तीन मूर्ती चौक म्हटले जाते. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढत असताना भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजविल्याची आठवण या स्मारकाद्वारे होते. हैफा शहर सध्या इस्रायलमध्ये असून गाझापट्टीच्या नजीक आहे. भूमध्य समुद्राला लागून असलेल्या मध्य आशियाच्या या परिसराने मागच्या १०० वर्षांत अनेक स्थित्यंतरे पाहिली. अनेक लढाया या भूमीने पाहिल्या. गाझा पट्टीतील हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर भीषण हल्ला केल्यानंतर हा प्रदेश पुन्हा चर्चेत आला आहे. क्षेत्रफळाच्या आकारमानाच्या दृष्टीने मुंबईपेक्षाही लहान असलेल्या या प्रदेशाने इस्रायलसारख्या विकसित आणि बलाढ्य देशाची डोकेदुखी वाढविली आहे. गाझा पट्टीशी निगडित मागच्या १०० वर्षांत झालेल्या मोठ्या घडामोडींचा घेतलेला हा आढावा …. हैफाच्या आधी गाझावर विजय वर नमूद केल्याप्रमाणे पहिल्या महायुद्धात हैफाचे युद्ध होण्यापूर्वी भारतीय लान्सर (घोड्यावरून भालाफेक करणाऱ्या घोडस्वारांचे पथक) आणि गुरखा रायफलमेन यांनी आणखी एका युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हैफाच्या दक्षिणेला असलेल्या आणि भूमध्य सागरी किनाऱ्याला लागून असलेल्या प्रदेशात हे युद्ध झाले. 'गाझाची तिसरी लढाई' म्हणून ओळखले जाणारे हे युद्ध पॅलेस्टाईन मोहिमेतील मोठे यश ठरले होते. भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या एम्पायर फोर्सेसच्या साथीने ऑटोमन्स फौजेच्या विरोधात लढाई लढली. (पहिल्या महायुद्धापूर्वी हा परिसर जर्मन आणि अरब राजे यांच्या ऑटोमन साम्राज्याचा भाग होता) पहिले महायुद्ध ब्रिटिश आणि ऑटोमन साम्राज्याची सेना यिल्डिरिम आर्मी ग्रुप आणि जर्मनीच्या सेनेविरोधात लढले गेले. हे वाचा >> इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे वैर कधीपासून आहे? आतापर्यंत कितीवेळा झाला संघर्ष? भारतीय सैनिकांचा समावेश असलेल्या इम्पिरियल सर्विस कॅव्हलरी ब्रिगेडने गाझामध्ये प्रवेश करून गाझा पट्टीवर ताबा मिळवला. ब्रिटिश सेनेच्या प्रखर प्रतिकारानंतर ऑटोमन फौजांना माघार घ्यावी लागली होती. गाझा मुंबईपेक्षा लहान, २० लाख लोकसंख्या गाझा पट्टी ही इजिप्त आणि इस्रायल यांच्या दरम्यान असलेला छोटासा भूभाग असून गाझाच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. पॅलेस्टाईनचा भाग असलेल्या गाझा पट्टीचे क्षेत्रफळ ३६५ स्क्वेअर किलोमीटर असून येथील लोकसंख्या २० लाख एवढी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास गाझापट्टी मुंबईपेक्षाही (६०३ स्क्वे. किमी) खूप लहान आहे. गाझा पट्टीचे क्षेत्रफळ मुंबईपेक्षा कमी आहे. गाझा पट्टी आणि वेस्ट बँक हे दोन भूभाग एकत्रितपणे पॅलेस्टाईन राष्ट्र समजले जातात. भारत हा पहिला देश आहे, ज्याने १९८८ साली पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्यास अनुमती दिली होती. आठ वर्षांनंतर भारताने गाझामध्ये प्रतिनिधी कार्यालय स्थापित केले. २००३ साली हे कार्यालय वेस्ट बँकमध्ये असलेली पॅलेस्टाईनची राजधानी 'रामल्लाह' (Ramallah) शहरात हलविले. फेब्रुवारी २०१८ मध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचा नवी दिल्लीचा दौरा आटोपल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनचा दौरा केला होता. पॅलेस्टाईनचा दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी मोदींचे स्वागत केले, तसेच रामल्लाह शहरातील यासर अराफत (पॅलेस्टिनी नेते आणि पीएलओचे संस्थापक) यांच्या कबरीवर मोदींनी पुष्पहार अर्पण केला होता. आणखी वाचा >> विश्लेषण : हमास हल्ल्यानंतर इस्रायल-अरब संबंधांचे काय होणार? इस्रायल-इराण संबंध चिघळणार? गाझा इजिप्तची कठपुतळी ऑटोमनचा पहिल्या महायुद्धात पराभव केल्यानंतर १९१८ साली ब्रिटिशांनी गाझा पट्टीवर ताबा मिळविला होता. १९४८ च्या अरब-इस्रायल युद्धानंतर गाझापट्टीचा ताबा इजिप्तकडे गेला. या युद्धानंतर ब्रिटिशांचा या प्रदेशावरील दावा संपुष्टात आला. तेव्हापासून इजिप्शियन सरकारच्या इशाऱ्यावर गाझामध्ये ऑल पॅलेस्टाईन सरकार कार्यरत होते. मात्र, १९५९ साली गमाल अब्देल नासेर आणि कैरोच्या लष्कराने गाझापट्टीवर ताबा मिळवून हे सरकार विसर्जित केले. जनू १९६७ साली अरब राष्ट्रांकडून इस्रायलला धमकीवजा इशारा मिळाल्यानंतर इस्रायल लष्कराने शत्रुचा हल्ला होण्यापूर्वीच त्यांच्या सैन्यबळाची ताकद कमी करण्यासाठी इजिप्शियन हवाई तळ आणि लष्करी छावण्यांवर हवाई हल्ला केला. इस्रायली सैन्यानी चढाई करून गाझा पट्टी आणि सिनाई द्वीपकल्प इजिप्तकडून बळकावून घेतला. याशिवाय जॉर्डनच्या ताब्यात असलेला वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवला. तसेच सीरियाकडे असलेला सर्वात सुपीक प्रदेश गोलन हाईट्स प्रदेशही हस्तगत केला. सहा दिवस चाललेल्या अरब-इस्रायल युद्धात इस्रायलने निर्णायक असा विजय मिळवला. इस्रायल-इजिप्त शांतता करार ऑक्टोबर १९७३ साली 'योम किप्पूर' युद्ध छेडले गेले. ज्यू धर्मीयांच्या सणाच्या दिवशी इस्रायलवर हल्ला करण्याचा डाव इजिप्त आणि सीरियाने साधला. हमासने केलेला हल्लाही योम किप्पूर या सणाच्या दुसऱ्या दिवशी (७ ऑक्टोबर) झालेला आहे. १९७३ च्या युद्धाप्रसंगी इस्रायलला जाणीव झाली की, राष्ट्राला सदासर्वदा युद्धासाठी सज्ज राहण्यात अडचणी येऊ शकतात. हे वाचा >> Israel-Palestine War : इस्रायलमधील योम किप्पूर युद्धाची पुन्हा आठवण का काढली जात आहे? सोव्हिएत संघाचा ऱ्हास होत असताना इजिप्तने सोव्हिएतमधून बाहेर पडत इस्रायलशी शांतता करार करण्यासाठी वाटाघाटी सुरू केली. पुढे १९७८ रोजी अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या "कॅम्प डेव्हिड करारा"मुळे या भागातील राजकारणच बदलून गेले. इस्रायलने सिनाई द्वीपकल्पावरील आपला दावा सोडून तो भाग इजिप्तसाठी मोकळा केला. या करारानुसार पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी गाझा पट्टी आणि वेस्ट बँकमध्ये स्वायत्त प्रशासकीय मंडळाची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला. कॅम्प डेव्हिड करारानंतर इजिप्तचे तत्कालीन राष्ट्रपती अन्वर सादत आणि इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बेगिन यांना १९७८ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. इजिप्त-इस्रायलमधील शांतता करार अमलात आल्यानंतर पॅलेस्टाईनने मात्र त्याचा विरोध केला आणि त्यामुळे अरब लिगने इजिप्तला लिगमधून बाहेर काढले. १९८१ साली इजिप्शियन इस्लामिक जिहाद या गटाने सादत यांची हत्या केली. योम किप्पूर युद्धाप्रसंगी इजिप्तने सुएझ कालवा ओलांडला होता, त्या घटनेला आठ वर्ष झाल्यानिमित्त लष्करी परेड ठेवण्यात आली. ही परेड पाहत असताना सादत यांची हत्या झाली. गाझामध्ये प्रशासनाची सुरुवात इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू (ज्यांना बिबी म्हटले जाते) यांचे मोठे बंधू योनातन यांनीही एक युद्ध लढले होते. "सायरेत मटकल" (Sayeret Matkal) या इस्रायलच्या विशेष सुरक्षा दलाने सीरियाच्या विरोधात गोलन हाईट्स येथे लढाई लढली होती. यामध्ये योनातन यांचा मृत्यू झाला. युद्धात एकमेव मृत्यू झाला होता, तोही योनातन यांचा. पॅलेस्टाईन आणि जर्मनीच्या अतिरेक्यांनी एअर फ्रान्सच्या विमानाचे अपहरण केले होते, ज्यामध्ये ज्यू प्रवासी असल्याचे सांगितले जाते. युगांडा येथे यशस्वी चढाई करून सायरेत मटकलने प्रवाशांची सुटका केली होती. हे वाचा >> अग्रलेख:‘बिबीं’चा ‘पुलवामा’ १९९३ आणि १९९५ साली ओस्ले कराराच्या माध्यमातून पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटीच्या अंतर्गत वेस्ट बँक आणि गाझामध्ये फताहच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची नियुक्ती झाली. गाझापट्टीत २००६ पर्यंत फताहचे शासन होते. १९८७ मध्ये हमास या पॅलेस्टाईन दहशतवादी गटाची स्थापना झाली. इस्रायलचा विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या या संघटनेने २००६ साली गाझापट्टीमधील निवडणुका जिंकल्या. पुढच्याच वर्षी हमासने फताहची हकालपट्टी करत गाझापट्टीवर पूर्ण अंमल मिळविला. यासर अराफत यांनी फताहची स्थापना केली होती. गाझातून इस्रायलची माघार गाझावर हमासने ताबा मिळवण्याच्या दोन वर्ष आधी इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान एरियल शिरॉन यांच्या सरकारने गाझापट्टीतील २१ आणि वेस्ट बँक येथील चार इस्रायली वसाहती स्वतःहूनच उद्ध्वस्त करून टाकल्या. इस्रायलच्या सरकारने केलेल्या या कृतीवर इस्रायलमध्ये आणि जगभरात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ऑगस्ट २००५ मध्ये शिरॉन यांचे लिकूड पक्षातील प्रतिस्पर्धी नेत्यानाहू यांनी सरकारमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला. वसाहती उद्ध्वस्त करण्याचा निर्णय एकतर्फी असून या निर्णयाला आमचा विरोध आहे. तसेच यातून इस्रायलला काहीच फायदा झाला नाही, असा आरोप नेत्यानाहू यांनी केला. सरकारच्या या कृतीमुळे गाझापट्टीवर आपली पकड घट्ट करण्यासाठी हमास आणि इस्लामिक जिहादला प्रोत्साहन मिळेल आणि याचा इस्रायलला भविष्यात त्रास होऊ शकतो, अशी भूमिका नेत्यानाहू यांनी पत्रकार परिषदेतून मांडली. शिरॉन सरकारने आपल्या वसाहती उद्ध्वस्त केल्याच, त्याशिवाय गाझापट्टीत राहत असलेल्या नऊ हजार नागरिकांंना आणि सैन्याला पुन्हा देशात बोलावून घेतले. तसेच पॅलेस्टिनींना सांगण्यात आले की, ओस्लो कराराअंतर्गत इस्रायल गाझा आणि प्रादेशिक जलसाठ्यावर हवाई दलामार्फत देखरेख ठेवेल. गाझापट्टीतून सामान आणि लोकांची हालचाल करण्यासाठी सात ठिकाणी सीमा ओलांडण्याची सोय आहे. २००७ साली गाझावर संपूर्ण नाकेबंदी लादल्यानंतर सात पैकी फक्त दोन मार्ग खुले ठेवले. इजिप्तच्या टोकाकडे असलेली रफाह क्रॉसिंग आणि इस्रायलच्या दिशेला असलेली एरेझ क्रॉसिंग लोकांना वापरण्यासाठी खुली ठेवण्यात आली. गाझाचे भवितव्य अनिश्चित हमासने केलेल्या ताज्या हल्ल्यामुळे नेत्यानाहू आणि त्यांचे सरकार पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. हमासच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देत असताना इस्रायलच्या विमानांनी गाझामध्ये बॉम्बहल्ले केले. इस्रायल संरक्षण दल ही कारवाई पुढे कसे घेऊन जाते, हे पाहावे लागेल. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तपात होण्याची शक्यता आहे, तसेच हे युद्ध लवकर शमणार नाही, अशीही चिन्हे दिसतात.