रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशातील महिलांना आठ किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनविरोधात चालू असलेल्या युद्धात रशियाच्या लाखो सैनिकांचा झालेला मृत्यू आणि गेल्या काही दशकांपासून रशियाचा घसरत चाललेला जन्मदर या पार्श्वभूमीवर पुतिन यांचे विधान समोर आले आहे. या युद्धात रशियाची किती जीवितहानी झाली, याबद्दल मॉस्कोने (रशियाची राजधानी) काही अधिकृत माहिती दिली नसली. तरी किव्हच्या (युक्रेनची राजधानी) दाव्यानुसार या युद्धात जवळपास ३,००,००० रशियन सैनिकांचा खात्मा झाला आहे. व्लादिमीर पुतिन नेमके काय म्हणाले? घसरता जन्मदर रोखण्यासाठी रशियाने काय प्रयत्न केले? याबद्दल घेतलेला हा सविस्तर आढावा ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुतिन यांनी मोठ्या कुटुंबाची गरज का व्यक्त केली?

पुतिन म्हणाले की, रशियाला मोठ्या कुटुंबाची रचना अपेक्षित आहे. मंगळवारी (२८ नोव्हेंबर) मॉस्को येथे वर्ल्ड रशियन पिपल्स परिषदेत व्हर्च्युअली संवाद साधताना पुतिन म्हणाले, “पुढील काही दशकात रशियाची लोकसंख्या वाढविणे हे आपले ध्येय असेल”, अशी माहिती द इंडिपेंडटच्या बातमीत देण्यात आली आहे. “रशियात अनेक लोकांनी मोठ्या कुटुंबाची परंपरा जपलेली आहे. त्या घरात चार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक मुले असतात. तुम्हाला आठवत असेल तर रशियन कुटुंबातील आपल्या आजी आणि पणजींना सात किंवा आठ मुले असायची. आपल्या मोठ्या कुटुंबाची परंपरा जोपासायची असून ती पुढे न्यायची आहे. मोठे कुटुंब आणि अनेक मुले असणे हा आदर्श बनायला हवा आणि तो रशियन जीवनशैलीचा भाग बनावा”, असे आवाहन पुतिन यांनी केले.

हे वाचा >> “१० मुलं जन्माला घाला आणि…”, रशियाच्या सरकारची महिलांना अजब ‘ऑफर’; करोना आणि युद्धामुळे लोकसंख्या घटली!

युद्धाचा रशियावर किती परिणाम झाला?

पुतिन यांनी लोकसंख्या वाढीबाबत केलेले भाष्य हे युक्रेन युद्धातील सैनिकांच्या जीवितहानीशी थेट निगडित नसले तरी त्यांच्या विधानाचा संदर्भ लोकसंख्या कमी होत असल्याच्या चिंतेकडे लक्ष वळवित आहे. यूकेच्या संरक्षण मंत्रालयाने नोव्हेंबरमध्ये दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झालेल्या युद्धामध्ये आतापर्यंत तीन लाखाहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनेक उच्चपदस्थ रशियन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. न्यूजवीक या वृत्त संकेतस्थळाच्या बातमीनुसार युक्रेन युद्धात रशियाने किमान सात जनरल गमावले आहेत.

युद्ध सुरू झाल्यापासून अनेक रशियन नागरिकांनी देश सोडला आहे. इंडिपेंडटने दिलेल्या बातमीनुसार, जवळपास आठ ते नऊ लाख लोकांनी युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यापासून देश सोडून दिला आहे.

रशियातील लोकसंख्येचे संकट

१९९० च्या दशकापासून रशियामध्ये जन्मदरात घसरण होत गेली. १९९२ मध्ये रशियाची लोकसंख्या १४९ दशलक्ष (१४.९ कोटी) वर पोहोचली होती आणि आता रशियाची लोकसंख्या केवळ १४४.४ दशलक्ष (१४.४ कोटी) एवढीच आहे, अशी माहिती अल जझीरा वृत्त संकेतस्थळाने दिली. रशियातील प्रत्येक महिलेचा १.५ मुलांना जन्म देते, रशियाची लोकसंख्या वाढीचा दर राखण्यासाठी प्रति महिला २.१ मुलांचा जन्म आवश्यक आहे. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशियामधील घटत्या जन्मदरामागे गर्भपाताचे कठोर नियम आणि खालावलेली अर्थव्यवस्था अशी प्रमुख कारणे आहेत.

हे वाचा >> विश्लेषण : रशियातील सैनिकपत्नी सरकारवर नाराज का? युक्रेन युद्धावर असंतोषाचा कितपत परिणाम?

पुतिन यांनी सत्ता प्राप्त केल्यापासून कमी प्रजनन क्षमतेच्या समस्येवर विशेष लक्ष दिले. पुतिन यांच्या सरकारने लोकसंख्या वाढीसाठी एकापेक्षा अधिक अपत्य असलेल्या कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासह काही उपाययोजना राबविल्या आहेत. पुतिन यांचे कार्यालय क्रेमलिनने १० किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या महिलांसाठी सोव्हिएत काळातील मदर हिरोईन हा पुरस्कार पुन्हा देण्यास सुरुवात केली. अशा महिलांना १६,५०० डॉलर (१४ लाखांहून अधिक) एकरकमी रोख बक्षीसाच्या स्वरुपात दिले जातात.

तरीही, लोकसंख्येचा घसरता आलेख रोखण्यात या उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत. पुतिन हे स्वतःच्या कार्यकाळातील रशियाला पारंपरिक कौटुंबिक मूल्ये जपणारा देश म्हणून सांगतात. त्यांनी अलीकडच्या काळात पुनरुत्पादक अधिकारांवर कडक कारवाई केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर गर्भपात विरोधी पावले उचलली आहेत.

मॉस्को टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, रशियाच्या मध्य निझनी नोव्हगोरोड प्रदेशातील खासदारांनी अलीकडेच सांगितले की, खासगी रुग्णालयामध्ये गर्भपातावर बंदी घालण्यासाठी रशियन संसदेत सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती सुचविणार आहेत. संपूर्ण रशिया आणि शेजारी असलेल्या क्रिमियामधील यंत्रणांनी खासगी रुग्णालयांनी स्वेच्छेने गर्भपाताची सुविधा थांबविण्यास सहमती दर्शविल्याचा दावा केल्यानंतर खासदारांनी कायद्यातील दुरुस्ती सुचिवणार असल्याचे सांगितले.

ऑक्टोबर महिन्यात रशियाने गर्भपाताच्या औषधांना देशात आयात करण्यापासून प्रतिबंधित करणारे कायदे मंजूर केले होते. अल जझीराने दिलेल्या बातमीनुसार, मॉर्डोव्हिया आणि टव्हर या दोन रशियान प्रदेशात महिलांवर गर्भपाताची जबरदस्ती करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासंदर्भातले कायदे ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये मंजूर केले.

“गर्भपातावर बंदी घालण्याचे प्रयत्न मागच्या पाच वर्षांपासून होत आहेत. परंतु कोणीही त्यावर विशेष लक्ष दिलेले नाही, अशी माहिती कार्यकर्त्या आणि रशियन स्त्रीवादी लेखिका झालिना मार्शेनकुलोवा यांनी अल जझीराला दिली. “पुरुषप्रधान राज्यात महिलांच्या आवाजाला फारसे महत्त्व दिले जात नाही. महिलांच्या समस्यांना महत्त्वाचे मानले जात नाही”, असेही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा >> रशियावर पकड मजबूत करण्यासाठी पुतिन यांच्याकडून ‘होमोफोबिया’चा वापर

रशिया आणि युक्रेन देशाला युद्धाचा फटका

निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनविरोधातील युद्धामुळे रशियाच्या लोकसंख्याशास्त्रीय समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे. परंतु फक्त रशियालाच घटत्या लोकसंख्येची चिंता सतावत नाही. युक्रेनमधील जन्मदरही युद्ध सुरू झाल्यापासून २८ टक्क्यांनी घसरला आहे. द गार्डियनच्या डेटा विश्लेषण कंपनी ओपनडेटाबोटच्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये बाळ जन्माला येण्याच्या संख्येमध्ये २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये २०२१ च्या तुलनेत ३८,३२४ एवढी घट झाली आहे. युक्रेन १९९१ साली स्वतंत्र झाल्यापासून ही सर्वात मोठी घसरण आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why vladimir putin wants russian women to have eight or more children kvg