विश्वचषक स्पर्धेत याआधी नायजेरियाला चार वेळा पराभूत केल्यामुळे पूर्वेतिहास अर्जेंटिनाबरोबर आहे. मात्र सध्याचे वास्तव वेगळे आहे. नायजेरियावर मोठय़ा फरकाने विजय मिळवला तरच गटात तळाशी असलेल्या अर्जेंटिनाला ही अखेरची संधी साधून बाद फेरी गाठता येणार आहे. अन्यथा नायजेरियाचा मार्ग आपसूकच खुला होणार आहे.
एका सामन्यात बरोबरी आणि एका सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने अर्जेंटिनाचा संघ स्पर्धेतून बाद होण्याच्या अगदी शेवटच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे एकीकडे इभ्रत वाचवण्यासाठी विजय आणि तोदेखील चार गोलच्या फरकासह असे दडपण घेऊनच अर्जेंटिनाचा संघ मैदानात पोहोचणार आहे. क्रोएशियाकडून ३ गोलच्या फरकाने झालेला पराभव अर्जेंटिनाला सर्वाधिक महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रविवारी चाहत्यांनी साजरा केलेला मेसीचा वाढदिवसदेखील नेहमीइतका उत्साहात नव्हता. संपूर्ण संघाने अत्यंत सकारात्मक खेळ केला तरच चमत्कार होऊ शकेल. मात्र आधीच्या दोन सामन्यात पूर्ण निराशा केलेल्या अर्जेंटिनाच्या संघाकडून इतका मोठा चमत्कार होण्याची अपेक्षादेखील आता फारच कमी चाहत्यांना आहे. बार्सिलोना क्लबकडून खेळताना मेसीने जसे अनेक चमत्कार दाखवले आहेत, तसे चमत्कार तो अर्जेंटिनाकडून खेळताना का करू शकत नाही, असा एकच सवाल अर्जेंटिनाच्या फुटबॉलप्रेमींच्या मनात आहे.
अर्जेंटिनाच्या सुमार कामगिरीमुळे त्यांचे प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पोली यांना ऐन स्पर्धेदरम्यानच वगळले जाण्याबाबत होत असलेल्या चर्चेवर अर्जेंटिनाच्या संघटनेने पडदा टाकला आहे. निदान विश्वचषकातील सर्व सामने होइपर्यंत तरी प्रशिक्षक पदाबाबत कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. दुसरीकडे सॅम्पोली मात्र या निर्णायक सामन्यात काही मोठे बदल करण्याच्या मानसिकतेत दिसून येत आहेत. अर्थात अर्जेंटिनाला केवळ त्यांचाच मोठा विजय अपेक्षित नसून त्याचबरोबर क्रोएशियानेदेखील आइसलँडवर मात करणे आवश्यक आहे.
दरम्यान, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनी एक बैठक बोलवून विजयासाठी जीव तोडून प्रयास करण्याचे आवाहन केले. तसेच अशा प्रकारे क्रोएशियासारख्या सामान्य संघाकडून मानहानीकारक पराभव कोणताच फुटबॉलप्रेमी खपवून घेणार नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे नायजेरियाने आइसलॅँडवर मिळवलेला विजय त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा ठरला आहे. त्यामुळे अजून एक विजय मिळवत चौथ्यांदा बाद फेरीत जाण्यासाठी नायजेरिया उत्सुक आहे. दोन गोल करणारा अहमद मुसा पुन्हा एकदा जोरदार आक्रमण करून अर्जेंटिनालादेखील चकित करण्यास सज्ज आहे. त्यासाठी अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात काही बदल करण्याचा प्रशिक्षक गेरनॉट रोहर यांचा मानस आहे.
मैत्रीपूर्ण लढतीत नायजेरियाचा दणका
अवघ्या महिनाभरापूर्वी अर्जेंटिना आणि नायजेरियात एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्या लढतीत मेसी मैदानावर उतरला नव्हता. त्या परिस्थितीत नायजेरियाने अर्जेंटिना संघावर ४-२ अशी मात केली होती. त्यावरूनच अर्जेंटिनाचा संपूर्ण संघ मेसीच्या कामगिरीवर किती अवलंबून आहे, ते दिसून येते. त्यामुळे विश्वचषकातील या निर्णायक सामन्यात मेसीने पुन्हा चमत्कार दाखवावा अशीच अर्जेंटिनाप्रेमींना इच्छा आहे.
तुम्हाला हे माहीत आहे?
अर्जेंटिनाचा नायजेरियाशी हा पाचवा सामना असून यापूर्वीच्या चारही सामन्यांत अर्जेंटिनाने मिळवलेला विजय हा केवळ एका गोलच्या फरकानेच आहे. त्यातदेखील नायजेरियाने १९९४च्या विश्वचषकातील सामना वगळता अन्य कोणत्याही सामन्यात कधीही प्रथम गोल करून आघाडी घेतलेली नाही.