फुटबॉल वर्ल्डकपच्या बादफेरीच्या महत्वाच्या सामन्यात कुठलाही संघ गोलमध्ये पिछाडीवर पडला असेल तर त्या संघावर प्रचंड दबाव असतो. अशावेळी पिछाडी भरुन काढून बरोबरी साधणे आव्हानात्मक असते. फार कमी संघ अशा आव्हानात्मक परिस्थितीतून विजय खेचून आणण्यात यशस्वी ठरतात. सोमवारी जपान विरुद्धच्या बाद फेरीच्या महत्वाच्या सामन्यात बेल्जियमच्या संघाने अशीच करामत करुन दाखवली.

पहिले सत्र गोल शून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्रात जपानने अवघ्या तीन मिनिटात दोन गोल करत २-० अशी आघाडी घेतली. जपानच्या या आक्रमक खेळपुढे बेल्जियमचा संघ काहीसा दबावाखाली आला होता. पण बेल्जियमच्या फुटबॉलटूंनी मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत विजय खेचून आणला. फिफा वर्ल्डकपच्या बाद फेरीत २-० अशा पिछाडीनंतर विजय मिळवणारा बेल्जियम हा गेल्या ४८ वर्षातील पहिला संघ ठरला आहे.

याआधी १९७० साली जर्मनीने इंग्लंडविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवला होता. उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात इंग्लंडचा संघ २-० ने आघाडीवर होता. पण जर्मन फुटबॉलपटूंनी हार न मानता जिद्दीने खेळ केला आणि अतिरिक्त वेळेत गोल करुन ३-२ ने विजय मिळवला.

दुसऱ्याबाजूला जपान तिसऱ्यांदा उपांत्यपूर्वफेरीत दाखल होण्यात अपयशी ठरला. जपानचा संघ तिसऱ्यांदा टॉप १६ मध्ये पोहोचला होता. दुसऱ्या सत्रात जपानने जी आघाडी घेतली होती त्यामुळे ते सहज विजय मिळवतील असे वाटले होते पण बेल्जियमने डाव उलटवला. याआधी २००२ सालच्या वर्ल्डकपमध्ये टर्कीने त्यानंतर २०१० मध्ये पॅराग्वेने जपानला बादफेरीत पराभूत केले होते.