सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने १९७४ साली राजस्थानमधील पोखरण येथे पहिला अणुस्फोट केल्यानंतर क्षेपणास्त्रे विकसित करणे हा त्यापुढील नैसर्गिक टप्पा होता. त्यानुसार १९८३ साली एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) हाती घेण्यात आला. त्याअंतर्गत पृथ्वी, अग्नि, नाग, त्रिशूळ आणि आकाश ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली. त्यातील पृथ्वी हे पहिले यशस्वी क्षेपणास्त्र होते. तत्पूर्वी १९७० च्या दशकात भारताने प्रोजेक्ट डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलियंट नावाच्या प्रकल्पांतून क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश लाभले नव्हते.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पृथ्वीची निर्मिती झाली. पृथ्वी हे लघु पल्ल्याचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे गायडेड क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी क्षेपणास्त्र ५०० ते १००० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. त्याच्या पृथ्वी-१, पृथ्वी-२ आणि पृथ्वी-३ अशा आवृत्ती आहेत. त्यांचा पल्ला अनुक्रमे १५०, २५० आणि ३५० किमी इतका आहे. या आवृत्ती भूदल, हवाईदल आणि नौदलासाठी विकसित केल्या आहेत. पृथ्वीची सुरुवातीची आवृत्ती १९८८ साली तयार झाली आणि तिच्या विविध चाचण्या पार पडल्यानंतर हे क्षेपणास्त्र १९९४ साली सेनादलांत दाखल झाले. भारतीय सेनादलांच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडकडून क्षेपणास्त्रांचे संचालन केले जाते.

पृथ्वी-१ आणि २ ही एकाच टप्प्याची (सिंगल स्टेज) आणि द्रवरूप इंधनावर आधारित क्षेपणास्त्रे असून त्यात स्ट्रॅप-ऑन इनर्शिअल गायडन्स सिस्टम वापरण्यात आली आहे, तर पृथ्वी-३ ही नौदलासाठीची आवृत्ती धनुष नावाने ओळखली जाते. हे दोन टप्प्यांचे क्षेपणास्त्र आहे. त्यातील पहिला टप्पा घनरूप, तर दुसरा द्रवरूप इंधनाचा आहे. त्याच्या आयएनएस सुभद्रा आणि राजपूत या नौकांवरून चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

पृथ्वी क्षेपणास्त्राने भारतीय सेनादलांना नवी मारकशक्ती प्रदान करून दिली असली तरी हे काही फार अत्याधुनिक क्षेपणास्त्र मानले जात नाही. त्याने भारताला क्षेपणास्त्राचे मूलभूत तंत्रज्ञान उपलब्ध झाले. पृथ्वी क्षेपणास्त्राची नेम चुकण्याची शक्यता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) १० ते ५० मीटर इतकी आहे. पृथ्वी क्षेपणास्त्रांमुळे भारतीय उपखंडात नव्याने शस्त्रस्पर्धा सुरू झाल्याचा आरोप केला जातो. त्यानंतर पाकिस्तानने चीन आणि उत्तर कोरियाच्या मदतीने क्षेपणास्त्रे मिळवली. पाकिस्तानची हत्फ मालिकेतील क्षेपणास्त्रे चीनच्या डाँग-फेंग (डीएफ) किंवा एम-११ या क्षेपणास्त्रांवर आधारित आहेत. हत्फ-१ क्षेपणास्त्रांचा पल्ला ७० ते १०० किमी आहे.

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithvi missile information