गणरायाच्या आगमनाची तयारी करताना सजावटीसाठी ग्राहक थर्माकोलच्या मखरांनाच पसंती देत आहेत. वस्तू सेवा करामुळे थर्माकोल महाग झाला असूनही आणि तो पर्यावरणास हानीकारक असूनही गणेशाच्या आराशीतून थर्माकोलला दूर ठेवणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. नवी मुंबईत वाशीसह अन्य भागांतील बाजारांत, मॉलमध्ये विविध साहित्यापासून तयार केलेली आकर्षक मखरे आणि सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे.

थर्माकोल, प्लास्टिक, कापड, कागद यापासून तयार केलेली आकर्षक मखरे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. थर्माकोल आणि प्लास्टिक पर्यावरणासाठी हानिकारक असूनही बाजारात थर्माकोलपासून तयार केलेल्या मखरांचे प्रमाण जास्त आहे. त्यापाठोपाठ प्लास्टिक किंवा कापडाच्या फुलांची मखरेही काही प्रमाणात उपलब्ध आहेत.

वाशी सेक्टर १८ येथील मुख्य चौकांमध्ये असलेल्या विविध दुकानांमधील सजावटीच्या साहित्याने सर्वाचे लक्ष वेधले आहे. १५ ऑगस्टपासून मखर खरेदीला येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सायंकाळी तीननंतर येथे वर्दळ वाढू लागते. थर्माकोलची तयार मखरे आणि फुलांच्या मखरांना गणेशभक्त अधिक पसंती देत आहेत.

वाशीतील र्मचट सेंटर येथील मौर्या मखर आर्ट या दुकानात सव्वा फूट ते सहा फुटांपर्यंतची मखरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यांच्या किमती ५०० ते ५ हजारांपर्यंत असल्याचे दुकानदार नवीन नागडा यांनी सांगितले. पूर्वी थर्माकोलच्या न रंगवलेल्या मखरांचीही मोठय़ा प्रमाणात विक्री होत असे, मात्र आता जास्त कोरीवकाम, नक्षीकाम केलेल्या, रंगीत मखरांनाच ग्राहकांची पसंती लाभत आहे. कोरीवकाम केलेली आणि थ्री डी मखरे ग्राहकांना अधिक आकर्षित करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

फुलांच्या मखरांची भुरळ

नैसर्गिक फुलांच्या आराशीचा डौल काही औरच! पण गणेशोत्सवात वाढणारे फुलांचे दर आणि त्यांचे अल्पजीवी सौंदर्य यामुळे हा पर्याय फारसा व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे या कृत्रिम फुलांच्या सजावटीचा पर्याय पुढे आला आहे. प्लास्टिकच्या सहा फुटांच्या मखरांची किंमत ९५० रुपयांपासून २२५० रुपयांपर्यंत आहे. वाशीतील र्मचट सेंटरमध्येच तळमजल्यावर ए मार्ट दुकान असून  कृत्रिम फुलांच्या मखरांत बरेच वैविध्य उपलब्ध येथे आहे.

मखरांचा प्रवास

थर्माकोल तसेच कृत्रिम फुलांच्या मखरांची निर्मिती मुंबईतील लालबाग येथे होते. तिथे तयार झालेली मखरे पनवेलमधील महेश गुप्ता या मोठय़ा विक्रेत्याकडून ते नवी मुंबई व पनवेलच्या बाजारांमध्ये विक्रीसाठी येतात.

जीएसटीमुळे रंगात किलोमागे ६० ते ७० रुपयांची वाढ झाली आहे. कपडय़ाच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. थर्माकोलचे दर वाढले आहेत. त्यामुळे मखरांच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर नक्कीच झाला आहे.

प्रदीप जोशी, मखर विक्रेते.

गणेशोत्सव साजरा करताना जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर केला पाहिजे. थर्माकोल व प्लास्टिकच्या फुलांची सजावट उत्सव झाल्यानंतर काय कामाची? त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. उत्सवाला आधुनिकतेच्या नावाखाली चुकीचे वळण दिले जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविधरंगी फुले उपलब्ध असतात. सजावटीसाठी त्यांचा वापर केल्यास उत्तम. नैसर्गिकरित्या विघटन होणाऱ्या साहित्याचा वापर सजावटीत करावा. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही.

–  प्रा. विद्यधर वालावलकर, महासचिव, पर्यावरण दक्षता मंच