प्रत्येक गावाप्रमाणेच अकोला शहराचेही धार्मिक व ऐतिहासिक वैशिष्टय़ आहे. अकोल्याचा धार्मिक इतिहास चाळताना प्रामुख्याने राजराजेश्वर आणि बाराभाई गणपती ही नावे समोर येतात. सध्या श्रीगणेशोत्सवानिमित्त अकोला शहरातील मानाचा मानल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीचा उत्सव सुमारे १२३ वषार्ंपासून सुरू ठेवला आहे नाथ इंगळे यांच्या तिसऱ्या पिढीतील धर्मनाथ इंगळे यांनी. बाराभाईचा गणपती विदर्भात प्रसिद्ध आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत हा गणपती मानाचा म्हणून व ऐतिहासिक म्हणूनही प्रथम क्रमांकावर असतो. या गणपतीची पूजाअर्चा केल्यानंतरच विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. हा वऱ्हाडातील सर्वात जुना गणपती आहे.
या गणपतीबाबत बरेच काही बोलले जाते. पण, ज्यांनी ही परंपरा जोपासली ते नाथ इंगळे सांगतात की, श्री बाराभाई गणपतीची स्थापना नेमकी केव्हा झाली याबाबत अजून कोणतीही नोंद सापडलेली नाही. हा गणपती पेशवेकालीन असावा. पेशवे काळातील बाराभाईच्या कारस्थानाशी याचा काही तरी संबंध असावा म्हणूनच याला हे नाव पडले असावे अन्यथा, दुसरे कोणते कारण कळत नाही. बाराभाई गणपती मंडळाचे सध्याचे अध्यक्ष धर्मनाथ इंगळे आहेत. हे कुटुंबच या गणपतीचे सर्वेसर्वा आहेत. श्री बाराभाईचा गणपती परंपरेने स्थापन केला जात असे. परकीय राजवटीच्या काळात राजकीय निरुत्साह पसरल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नये, असे ठरविण्यात आले असताना आता या पारंपरिक बाराभाईच्या गणपतीचे काय होईल, असा विचार करून तत्कालीन संस्थापक अध्यक्ष दिवं. भगवाननाथ इंगळे यांनी स्वत:च्या घरी बाराभाईचा गणपती उत्सव साजरा करण्यासाठी हा गणपती स्थापन केला. पण, गणेशोत्सवात कधीही खंड पडू दिला नाही. आज या उत्सवाला सुमारे १२३ पेक्षा अधिक वष्रे झाली आहेत. लोकमान्य टिळकांनी जेव्हा महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हा अकोला शहर हे फारच लहान होते. नदीपलीकडे गाव नव्हते. चार वेशीतच गावाची मर्यादा होती. किल्ल्याभोवतीच्या तेव्हाच्या अकोला गावात फक्त पाच गणेश मंडळे होती. त्यानंतर गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ लागला. ब्रिटीश राजवटीत विसर्जन मिरवणूक काढणे फार कठीण होते. पण, बाराभाई गणपती मंडळाचे संस्थापक दिवं. भगवाननाथ इंगळे यांनी ही जोखीम पत्करून मिरवणूक काढून दाखविली म्हणून बाराभाईच्या गणपतीला कायमच प्रथम गणपती म्हणून अग्रपूजेचा मान दिला जातो. अकोल्यात ही प्रथा १८९० पासून सुरू झाली.
सध्या बाराभाई गणपतीची जी मूर्ती आहे ती गेल्या १०० वर्षांंपासून एकच व कायम आहे. त्या आधी कित्येक वष्रे जुन्या पिढीतील मूर्तिकार ओंकाररावजी मोरे ठाकूर हे नवी गणेश मूर्ती तयार करीत असत. पण, त्यांच्या निधनानंतर बाराभाईच्या गणेशाला जशी मूर्ती हवी तशी क ोणीच घडवू शकले नाही. नवी मूर्ती घडविण्यासाठी परंपरागत चालक एकनाथजी व रघुनाथजी यांनी अनेकदा प्रयत्न केले. पण, तशी मूर्ती काही घडली नाही व म्हणून हीच मूर्ती कायम ठेवण्यात आली. या मूर्तीचे विसर्जन होत नाही. या गणपतीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, नाथ इंगळे कु टुंबातील तिसऱ्या पिढीकडे या उत्सवाचे सारे अधिकार आहेत. त्याचप्रमाणे या गणपतीची पालखी वाहणाऱ्या भोयांचीही तिसरी पिढी गणेशाच्या सेवेत आहे. ते सारे आनंदाने श्रींची पालखी वाहून नेतात. सध्या पुंजाजी गायकवाड व त्यांचा समाज ही सेवा दरवर्षी न चुकता देतात. विशेष म्हणजे, पालखीचे ध्वजवाहकही परंपरेने तिसऱ्या पिढीचेच आहेत. हा गणपती मनोकामना पूर्ण करतो, नवसाला पावतो, अशी ठाम श्रद्धा आहे. ढोलाचे भजन व दिंडय़ा हाच या गणपतीचा साज आहे. आजही या गणपतीसमोर इतर वाद्य्ो वाजत नाहीत. दिवं. भगवाननाथ इंगळे यांच्यानंतर १९२० मध्ये ही धुरा त्यांचे पुत्र दिवं. पंढरीनाथजी इंगळे व दिवं. एकनाथनाथजी इंगळे यांच्याकडे आली व त्यानंतर आता धर्मनाथजी इंगळे ही परंपरा कायम राखत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2013 रोजी प्रकाशित
मानाचा १२३ वर्षांचा ऐतिहासिक श्री बाराभाई गणपती
प्रत्येक गावाप्रमाणेच अकोला शहराचेही धार्मिक व ऐतिहासिक वैशिष्टय़ आहे.

First published on: 17-09-2013 at 09:02 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shree barabhai ganpati