एखादे मूल शाळेत परीक्षेला घाबरत असले की, त्याचे खापर बहुधा आईवडिलांच्या डोक्यावर फोडले जाते. ‘आईवडीलच गुणांसाठी मुलाच्या मागे लागत असणार,’ हीच पहिली प्रतिक्रिया असते. पण परीक्षेची अतिरेकी भीती बाळगणाऱ्या प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे खरे नसते. गुणांबाबत आईवडील आग्रही नसूनसुद्धा अनेक मुले परीक्षांना घाबरत असल्याचे दिसून येते.   
मुलांचा एक मोठा गट कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनाला (‘स्क्रुटिनी’ला) घाबरतो. परीक्षा हे केवळ एक निमित्त असते. त्यांचा स्वभावच कशाचीही चटकन भीती वाटून घ्यायचा असतो. लहानपणापासूनच ही मुले स्वत:च्या हातून घडणाऱ्या छोटय़ा – छोटय़ा चुकांना अतिरेकी घाबरतात, बिचकून राहतात. कामात ती अति ‘परफेक्शनिस्ट’ असतात. दरवेळी हे कोणत्या तरी दबावामुळे घडते, असे मुळीच नाही. तसा स्वभाव घेऊनच ही मुले जन्माला आलेली असतात. त्यांना वेगळ्या प्रकारची मानसशास्त्रीय मदत लागते.
लहान मुलांना भीती शारीरिकदृष्टय़ा जाणवते. चिडचिड होणे, भूक लागेनाशी होणे, हात-पाय गार पडणे, थरथरणे, सारखे स्वच्छतागृहात जावे लागणे, रात्री झोप न येणे, कोरडय़ा उलटय़ा होणे, डोके दुखणे ही या मुलांच्या भीतीची शारीरिक लक्षणे असतात. त्यामुळे अशा मुलांना मैदानी खेळ खेळायला पाठवणे, त्यांची शारीरिक क्षमता वाढण्यासाठी योगासने वा प्राणायाम यांसारख्या गोष्टींचा आधार घेणे, वेगाने चालणाऱ्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवण्यास शिकवणे गरजेचे ठरते. मुले थोडी मोठी झाली की भीतीदायक विचारांना पळवून लावण्यासाठी त्यांना काही मानसशास्त्रीय क्लृप्त्या शिकवता येतात.  
सातव्या – आठव्या इयत्तेनंतर परीक्षेची भीती विशेषत्वाने उफाळून येते. यातल्या पुष्कळ मुलांना अगदी ९०, ९५ टक्क्यांच्या वर गुण मिळत असतात, पण त्यांच्या स्वत:कडून असणाऱ्या अपेक्षाच अतिरेकी असतात. परीक्षेच्या आदल्या दिवशी त्या-त्या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पुन्हा अभ्यासून झालाच पाहिजे, असे त्यांचे ठाम मत असते. किंबहुना त्याशिवाय त्यांना परीक्षेला जाणेच सुरक्षित वाटत नाही. अभ्यासक्रमच कमी असतो तोपर्यंत एका दिवसात तो दोनदा- तीनदाही वाचून होतो. जसजशी इयत्ता वाढत जाते तसा अभ्यासाचा बोजा वाढून परीक्षेच्या आदल्या दिवशी या मुलांचा धीर सुटू लागतो. ही भीती काढण्यासाठी पालकच मदत करू शकतील. एखादी चाचणी परीक्षा आदल्या दिवशी मुळीच अभ्यास न करता दिली तर काय होईल, असा प्रयोग करून सुटणारा धीर हळूहळू पुन्हा मिळवता येईल. परीक्षेचा पेपर लिहायला बसल्यावर प्रचंड भीती वाटून ‘ब्लँक’ होणाऱ्या मुलांनाही काही मानसशास्त्रीय क्लृप्यांनी फायदा होतो. मात्र या सर्व उपायांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. परीक्षा अगदी तोंडावर आल्यानंतर ते झटपट करता येत नाहीत.             
घाबरण्याचा स्वभाव असलेला गट सोडला तर परीक्षा हा प्रकार फारच गंभीरपणे घेतला जाणाऱ्या वातावरणात वाढलेली मुले परीक्षांचा धसका घेतात. घरात असे वातावरण निर्माण होऊ देण्यासाठी आईवडील काही अंशी नक्कीच जबाबदार ठरतात.
प्रत्येक शाळेत कुठल्या ना कुठल्या प्रकारे मुलांच्या परीक्षा घेतल्या जातातच. सिनियर केजी किंवा पहिलीच्या वर्गातील ८० टक्क्य़ांपेक्षा जास्त मुलांना ८० टक्क्य़ांहून अधिक गुण किंवा ग्रेडस् मिळतात. पुष्कळ आईवडिलांच्या मनात मुलांचे हेच गुण पक्के बसलेले असतात. ‘पहिलीच्या वर्गात माझ्या मुलाला जर ‘ए- प्लस’ मिळू शकते, तर पुढेही त्याला तीच किंवा त्याही वरची ग्रेड मिळावी,’ अशी या पालकांची भावना असते. प्रत्यक्ष परिस्थिती पाहता ८० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या मुलांची ही संख्या पुढे दर वर्षी झपाटय़ाने कमी होते. दिलेला अभ्यासक्रम शिकणे आणि त्याचे गुणांमध्ये रुपांतर करणे ही एक कला आहे. त्याचा परीक्षेव्यतिरिक्त आयुष्यात इतर कुठेही उपयोग होत नसतो. पण ज्या मुलांना ही कला जमते तेच गुण मिळवतात. ही गोष्ट पालक लक्षात घेत नाहीत. ते स्वत: मुलांच्या परीक्षेची भीती बाळगू लागतात आणि त्यांची ही भीती नंतर मुलांच्याही डोक्यावर बसते.
डॉ. भूषण शुक्ल, बालमानसोपचारतज्ज्ञ
ुँ२ँंल्ल.२ँ४‘’ं@ॠें्र’.ूे
शब्दांकन : संपदा सोवनी