एखाद्या स्त्रीने स्वत:ची ओळख करून देताना ‘मी गृहिणी आहे,’ असे सांगितल्यावर तुमच्या मनात काय विचार येतो? ‘ ‘ती’ फार काही महत्त्वाची नसणार,’ असेच अनेकांचे तिच्याविषयीचे ‘फर्स्ट इंप्रेशन’ असते. अनेकदा ती स्वत:देखील स्वत:विषयी असाच विचार करत असते. ‘मला फार काही किंमत नाही,’ या तिच्या विचारातून सुरुवात होते ‘हाऊसवाईफ डिप्रेसिव्ह सिंड्रोम’ची.
‘हाऊसवाईफ सिंड्रोम’ला कारणीभूत-
तुलना-
शहरातील स्त्रियांच्या बहुसंख्य मैत्रिणी किंवा आजूबाजूच्या इतर स्त्रिया नोकरी करणाऱ्या असतात. ‘माझेही शिक्षण यांच्याइतकेच असून देखील मी गृहिणी आहे,’ ही भावना या स्त्रियांच्या मनाला सतत डाचत राहते. इतरांशी स्वत:ची तुलना करण्याची सवय लागणे आणि त्यातून स्वत:बद्दल नकारात्मक विचार करत राहणे हे ओघाने आलेच! ही तुलना जशा या गृहिणी स्वत: करत असतात तशीच ती घरातील इतर लोकही नकळत करत असतात.
कुणाला महत्त्वच वाटत नाही
गृहिणीचे काम सोपे नक्कीच नसते. घरातील सर्व मंडळींची विशेषत: लहान मुलांची काळजी घेणे, प्रत्येकाच्या खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळणे, घराची स्वच्छता करणे, मुलांना शाळेत सोडणे अशी असंख्य कामे गृहिणी करत असतात. त्या ही सर्व कामे अत्यंत जबाबदारीने, घडय़ाळाच्या काटय़ावर पार पाडत असतात. हे काम ऑफिसमधील कामासारखेच, काकणभर अधिकच आहे. फरक इतकाच की ‘गृहिणी’ या पदावर काम करण्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला तर मिळत नाहीच पण एखादी गोष्ट छान झाली तर त्याची प्रशंसा करणारा एक शब्दही कुणी उच्चारत नाही. ‘थँकलेस जॉब’ कुणालाही फार लवकर एकसुरी वाटू लागणे साहजिक आहे. ‘मी कितीही केले तरी कुणालाच त्याचे महत्त्व वाटत नाही,’ या विचाराने स्वत:विषयी न्यूनगंड तयार होतो.
स्वत:च्या अस्तित्वाचा पडलेला विसर काही गृहिणी ‘घरेलू’ कामांना इतक्या वाहून घेतात की आपले स्वत:चेही वेगळे अस्तित्व आहे, याचा त्यांना विसर पडतो. गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या स्त्रिया यांच्या झालेल्या एका अभ्यासात नोकरदार स्त्रिया स्वत:च्या दिसण्याविषयी विशेष चोखंदळ असल्याचे दिसून आले होते. स्वत:च्या लेखी स्वत:ची असलेली प्रतिमा हा आत्मविश्वासाशी निगडित असलेला महत्त्वाचा मुद्दा आहे. ‘मी छान राहते, छान दिसते,’ ही भावना आत्मविश्वासात भर टाकते.टीव्ही गृहिणी आणि ‘डेली सोप’ हे रूढ समीकरणही नैराश्याला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींपैकी एक ठरते. टीव्ही हे काही प्रमाणात मनोरंजनाचे माध्यम असले तरी अतिप्रमाणात टीव्ही पाहणे पुन्हा एकसुरीपणाच्या मार्गावर नेते.
लक्षणे
* चिडचिड वाढणे
* संवाद कमी होणे
* विनाकारण रडू येणे
* पूर्वी ज्या गोष्टी आनंद द्यायच्या, त्यादेखील कराव्याशा न वाटणे
* घरातून बाहेर पडावेसे न वाटणे
* स्वत:वरचे लक्ष उडणे
* वजन खूप वाढणे किंवा खूप कमी होणे
* शांत झोप न लागणे
* भूक न लागणे
– डॉ. स्वप्नील देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ,
(शब्दांकन- संपदा सोवनी)
गृहिणींसाठी
* रोज एका तासापेक्षा अधिक टीव्ही पाहणे नकोच.
* आपल्या आवडीचे वाचन करणे, छंद जोपासणे उत्तम.
* लोकांमध्ये मिसळणे महत्त्वाचे. मित्र-मैत्रिणींना भेटणे, समवयस्क स्त्रियांचा गट करून भिशीसारख्या उपक्रमांच्या निमित्ताने भेटणे फायदेशीर ठरू शकेल.
* ‘शॉपिंग थेरपी’देखील आनंदात भर घालणारी ठरते. दर आठवडय़ाला ठरवून थोडीशी खरेदी करा. घरातल्या आवश्यक वस्तूंचीच खरेदी टप्प्याटप्प्याने केली तरी खरेदीचा आनंद मिळेल.
* गृहिणीलाही सुट्टी हवीच! आठवडय़ाचा एक दिवस ठरवून गृहिणींनीही घरकामांना पूर्णपणे सुट्टी द्यावी. तो दिवस फक्त स्वत:च्या आनंदासाठी ठेवावा.
* जीवन खूपच एकसुरी वाटत असेल तर एखादी अर्धवेळ नोकरी धरावी. केवळ अर्थार्जन हा या नोकरीचा उद्देश नसला तरी त्यामुळे लोकांना भेटणे वाढते, आत्मविश्वासातही भर पडते.
घरच्या मंडळींसाठी
* गृहिणीला दहा हात नसतात! घरातले सारे काही तिनेच करावे अशी अपेक्षा बाळगणे अगदीच चूक. तिला समजून घेऊन तिच्यावरील कामाचे ओझे कमी करण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे.
* चांगल्या कामाचे कौतुक करण्यास हरकत का असावी? उदा. घरातील गृहिणीने खपून केलेला एखादा पदार्थ चवदार झाला असेल तर तसे म्हणण्यात कंजुषपणा करू नये!
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
गृहिणी असल्याचा न्यूनगंड!
एखाद्या स्त्रीने स्वत:ची ओळख करून देताना ‘मी गृहिणी आहे,’ असे सांगितल्यावर तुमच्या मनात काय विचार येतो? ‘
First published on: 01-04-2014 at 06:41 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inferioity complex to be a housewife