जुलाब झाल्यावर काय त्रास होतो, हे या विकाराचा सामना करणाऱ्या प्रत्येकालाच माहीत आहे. अक्षरश: शरीर गळून पडते, काहीही खावेसे वाटत नाही.. त्यामुळे जुलाब नको रे बाबा! असेच रुग्ण म्हणतो. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरगावी फिरायला जाणाऱ्या बहुतेकांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते आणि जुलाबाला आयतेच निमंत्रण मिळते.
जुलाब म्हणजे नेमके काय?
मलप्रवृत्ती वारंवार होणे किंवा मळ पातळ असतो, तेव्हा जुलाब झाले असे म्हटले जाते. मनुष्य निरोगी असेल, तर मळाचा घट्टपणा ठरावीक असतो. मलविसर्जन दिवसातून बहुधा
एकदा किंवा दोनदा होते. मात्र जुलाब झाल्यावर मळाचा पातळपणा वाढतो. दिवसातून अनेकदा मलविसर्जनासाठी जावे लागते.
कारणे
जुलाब हा जंतुसंसर्गामुळे होणारा विकार आहे. हा विकार तीन प्रकारांमुळे होतो.
१. बॅक्टेरिया
२. विषाणू
३. अमिबासारखे जंतू
न उकळलेले पाणी किंवा न शिजवलेले पदार्थ यांच्यातून हे जीवजंतू आपल्या शरीरात जातात. उकळलेल्या किंवा शिजवलेल्या अन्नात कधीही विषाणू राहत नाही. त्यामुळे न उकळलेले पाणी आणि न शिजवलेले पदार्थ बहुधा टाळावेच.
पचण्यास जड, तेलकट, मसालेदार या पदार्थाच्या अतिसेवनानेही जुलाब होतात. तिखट पदार्थाच्या अतिसेवनानेही हा विकार होतो. एकमेकांना प्रतिकूल असणारे पदार्थ खाल्ल्यानेही जुलाब होतात.
आपल्या शरीरातही जंतू असतात. त्यांना संधिसाधू जंतू म्हणता येईल. अनेकदा घशात किंवा पोटामध्ये आतडय़ात हे जंतू असतात. संधी मिळाल्यावर हे जंतू डोके वर काढतात. अतिश्रम, उन्हात अधिक वेळ फिरणे, अस्वच्छ अन्नपदार्थ खाणे, खाण्याच्या वेळा न पाळणे आदी अनेक कारणांचा हे संधिसाधू जंतू फायदा घेतात आणि जुलाबाला आयतेच निमंत्रण मिळते.
अस्वच्छता या कारणामुळेही हा विकार होऊ शकतो. न झाकलेले अन्नपदार्थ खाल्ल्यास किंवा अन्नपदार्थ बनविताना स्वयंपाकघरात अस्वच्छता असल्यास किंवा ज्या भांडय़ांमधून आपण जेवणार आहोत, ती अस्वच्छ असल्यास जुलाब होण्यास कारण मिळते.
लक्षणे :
पोटात दुखणे
वारंवार शौचास होणे
ताप येणे
शौचातून आव जाणे
कधीकधी शौचातून रक्तही जाते
प्रतिकारशक्ती कमी होणे
शौचात पातळ होणे
भूक मंदावणे
बैचेन वाटणे
उपाय
* जुलाब झाल्यावर बऱ्याचदा घरगुती उपाय केले जातात आणि डॉक्टरकडे जाणे टाळले जाते. जर या विकारातून पूर्णपणे बरे व्हायचे असेल, तर डॉक्टरकडे जाणे अत्यंत गरजेचे आहे.
* जुलाब झाल्यानंतर संधिसाधू जंतूंना आयती संधी मिळते आणि हा आजार बळावतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच उपाययोजना कराव्यात. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
* वारंवार पाणी पिणे आवश्यक. जुलाब झाल्यावर शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते.
* प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. अतिश्रम टाळाच.
* घरात, स्वयंपाकघरात पुरेशी स्वच्छता असावी. रुग्णानेही स्वच्छता बाळगणे आवश्यक.
काय खावे, काय नको
* जुलाब झाल्यानंतर हलका आहार घ्यावा. उदा. ताकभात, मुगाची खिचडी.
* तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
* शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. उघडय़ावरील पदार्थ तर बिलकूल खाऊ नये.
* या दिवसांत येणारा आंबा खाणे टाळावे.
– डॉ. सुहास साठे
(शब्दांकन : संदीप नलावडे)
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2014 रोजी प्रकाशित
पोटात गडबड
जुलाब झाल्यावर काय त्रास होतो, हे या विकाराचा सामना करणाऱ्या प्रत्येकालाच माहीत आहे.

First published on: 27-05-2014 at 06:41 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stomach problem