लहान मुलांनी पावसात खेळण्यासाठी केलेल्या हट्टाकडे दुर्लक्ष करणे पालकांना अशक्य होते. शाळेत जाताना रेनकोट चढवला तरी गणवेश थोडा दमट होतोच! याच दिवसांत पिण्याचे पाणीही गढूळ येऊ लागते, घरातील भिंती ओलसर, दमट होतात. अशा वातावरणात मुले आजारी पडू नयेत म्हणून काय करावे, रोजच्या खाण्यापिण्यात काय काळजी घ्यावी याची माहिती देत आहेत
डॉ. संजीवनी राजवाडे.
लहान मुले- अगदी तान्ह्य़ा बाळापासून ते शाळेत जाणारी मुले प्रकृतीने नाजुक असतात. वाढीच्या वयात त्यांची प्रतिकारशक्ती हळूहळू वाढत जाते. या मुलांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची ठरते. पावसापाण्यात भिजून आल्यावर लहान मुलांना हात- पाय गरम पाण्याने धुवायला लावणे, त्यांची नखे नियमित कापलेली असणे, जेवण्यापूर्वी हात धुणे, कपडे भिजल्यास ते लवकर बदलणे या लहान- लहान गोष्टींमधून त्यांची काळजी घेता येते.
आजारापासून स्वत:चे संरक्षण करण्याची शरीराकडून होणारी प्रक्रिया वाढावी यासाठी आहारातही काही आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा लहान मुलांवर कॅल्शियम आणि प्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थाचा मारा केला जातो. पण ही तत्त्वे त्यांना पूर्णपणे पचली पाहिजेत. या पोषणतत्त्वांचे शरीरात शोषण होण्यासाठी इतर काही पूरक तत्त्वांची, जीवनसत्त्वांचीही आवश्यकता असते. त्यामुळे तीदेखील पुरेशा प्रमाणात पोटात जाणे आवश्यक ठरते. लहान मुलांनाही हल्ली अॅसिडिटी, गॅसेस, अपचनासारखे त्रास होताना दिसतात. हे आजार म्हणजे ‘फास्ट फूड’ची अपत्येच असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे.
पावसाळ्यात होणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात काय हवे, काय नको?
१) मुलामुलींना ‘जस्त’ म्हणजे ‘झिंक’युक्त आहार मिळणे आवश्यक आहे. हे पोषणतत्त्व शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर काम करते. लाल भोपळा, शेंगदाणे, भोपळ्याच्या व कलिंगडाच्या बिया, तीळ, पालक अशा नेहमीच्या पदार्थामधून हे तत्त्व मिळते. या गोष्टींचा रोजच्या जेवणात कसा वापर करावा हे प्रत्येक गृहिणीने ठरवावे. थोडय़ा मोठय़ा बाळांना लाल भोपळ्याचे सूप करून देता येऊ शकेल. जेवणात पालकाची पळीवाढी भाजी करता येईल. तोंडी लावणे म्हणून तिळाची चटणीही करून ठेवता येईल. तसेच मुलांना आवडणाऱ्या खाऱ्या दाण्यांसारख्या पदार्थामधून हे पोषणतत्त्व मिळेल.
२) सर्दी- खोकल्यासारखे आजार टाळण्यासाठी लहान मुलांना पुरेसे ‘क’ जीवनसत्त्व (व्हिटॅमिन सी) मिळते की नाही याकडे लक्ष ठेवावे. लिंबूवर्गीय सर्व फळे आणि भाज्यांमध्ये हे जीवनसत्त्व असते. आवळ्याचा कोणताही प्रकार मुले आवडीने खातात. क जीवनसत्त्वामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढून ती आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल.
३) पावसाळ्यात लहान मुलांना कृमी किंवा जंत होण्याचा धोका मोठा असतो. हे टाळण्यासाठी मुलांना वावडिंगाचे पाणी प्यायला द्यावे. दोन लिटर पाण्यात वावडिंगाचे २०-२५ दाणे ठेचून घालावेत आणि हे पाणी ८- १० मिनिटे उकळावे. दिवसभर पिण्यासाठी हेच पाणी घ्यावे.
४) सर्दी- खोकल्याला अटकाव करण्यासाठी थंड पदार्थ आणि दह्य़ासारखे आंबट पदार्थ टाळावेत. दही खायचेच असेल तर त्यात चिमूटभर सुंठ पूड घालून खावे. केळेही शक्यतो खाऊ नये. खायचे असल्यात केळे कुस्करून त्यात काळ्यामिऱ्यांची पूड घालून मग खावे. या दिवसांत शक्यतो गरम पाणीच प्यावे. भाज्यांचे सूप, डाळीचे पाणी अशा गरम पेयांचा समावेशही आहारात नियमित असावा.
५) ब्रेडसारखे मैदा आंबवून तयार केलेले पदार्थ पचायला जड असतात. या दिवसांत पचनशक्ती कमी झालेली असल्यामुळे असे पदार्थ टाळावेत. बाहेरचे उघडय़ावरील पदार्थही खाऊ नयेत.
६) पोटाच्या छोटय़ा तक्रारींवर घरगुती उपाय म्हणून एक चमचा सुंठ पूड, ६-७ चमचे पिठीसाखर आणि अर्धा चमचा जायफळाची पूड एकत्र करून ठेवावी. अपचन, पोटदुखी, मळमळ, गॅसेस, जुलाब अशा तक्रारींवर प्राथमिक उपाय म्हणून सुंठपुडीचे हे मिश्रण लहान मुलांना दर दोन तासांनी ३-४ चिमूट देता येईल. मोठय़ा मुलांना वयाप्रमाणे या मिश्रणाची थोडी अधिक मात्रा लागू शकते.
७) पचनाच्या तक्रारींवर ओव्याची बारीक पूड करून ती मधातून मुलांना देता येते.
८) दालचिनी, मिरे आणि हळद यांचा काढा करून मध किंवा गूळ घालून दिल्यास सर्दी, ताप आणि अपचनासारख्या तक्रारींवर उपयोगी पडतो.
अर्थात हे सर्व उपाय प्राथमिक स्वरूपाचे आहेत. आजार वाढत असल्यास डॉक्टरांकडे जाणेच इष्ट.
मुले लहान असल्यामुळे त्यांना होणारा त्रास टाळणे ही आई-वडिलांचीच जबाबदारी असते. पावसात भिजण्याची मौज अनुभवण्याच्या जोडीला आरोग्याची पुरेशी काळजी घेतली तर पावसाळ्याची मजा फक्त मजा राहील, तिची सजा होणार नाही!