सकाळची न्याहरी काय करायची, हा यशप्रश्न तमाम गृहिणींना पडलेला असतो. न्याहरीच्या विचाराने अनेक जणी चिंतेतही असतात. खरं तर न्याहरीत कडधान्ये, तृणधान्ये, भाज्या, दूध, फळे, सुकी फळे असे सर्वच असायला हवे. मधासारखी शर्करा किंवा तेल, तूप कमी मात्रेत असावे. मात्र सकाळची घाईची वेळ लक्षात घेता हे सर्व पदार्थ एकत्र आणून पदार्थ करणे कठीण आहे. त्यामुळे यातील एक किंवा दोन पदार्थ न्याहरीत घेण्याचा प्रयत्न करावा. आज आपण तृणधान्ये व कडधान्ये यांचा न्याहरीतला वापर पाहू या.
* तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, रागी, मका आणि त्यापासून बनलेले पीठ, लापशी, पोहे, कुरमुरे हे तृणधान्यांत येते. ब्रेड, बिस्कीट, पास्ता हेदेखील याच गटात असले तरी त्यांचा वापर कमी ठेवावा. मूग, मटकी, तूर, मसूर, चणे, वाटाणे, कुळीथ, उडीद, राजमा आणि सोयाबीनही कडधान्यांत येतात. या दोन्ही पदार्थामुळे उच्च दर्जाची प्रथिने मिळतात, तसेच वैविध्यही येते. मात्र त्यांना रंग, रूप आणि चव देणे हे खरे आव्हान असते. हे सर्व पदार्थ ताज्या स्वरूपात देणे सर्वात चांगले असते. मात्र आपला वेळ पाहता काही वेळा फ्रिजची मदत घेता येईल.
* डाळी भिजवून आंबोळीचे (डोसा) पीठ करता येते किंवा बाजारातही तयार मिळते. आंबोळी तव्यावर घालण्यापूर्वी पिठात रवा टाकता येईल. नाचणी किंवा तृणधान्यांचे मिश्र पीठ किंवा थालीपीठाची भाजणीही घालून अप्रतिम आमलेट तयार करता येते. त्यात भाज्याही किसून टाकता येतात. पुदिन्याची किंवा टोमॅटोची चटणीही सोबत बनवू शकता.
* रात्रीची घट्ट डाळ उरली असेल तर त्यात तृणधान्याचे पीठ आणि भाज्या घालून फ्रिजमध्ये ठेवावे. सकाळी त्याचे पातळ काप करून त्यावर तीळ, जिरे, राई, खसखस, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी द्यावी. दही किंवा हिरव्या चटणीसोबत हा पदार्थ छान लागतो.
* डाळ कटलेट्स राहिले असतील, तर त्यात सकाळी तव्यावर थोडय़ा तेलात परतलेल्या भाज्या घालून चपातीतून फ्रॅन्की बनवता येते. गाजर  किंवा काकडीची बारीक कोशिंबीरही त्यावर शिवरता येईल.
* पोहे किंवा उपमा खाताना त्यात उडीद दाळ, चणादाळ किंवा मटार घालावेत. गव्हाच्या पिठात (नऊ भाग) सोयाबीनचे पीठ (एक भाग) घातले तर त्याच्या पोषणमूल्यात भरीव वाढ होते.
* न्याहरी केल्याशिवाय घराबाहेर पडू नये. मात्र तशी वेळ आलीच तर बाहेरचे वडापाव किंवा बिस्कीट खाण्यापेक्षा कुरमुरे, पोह्य़ाचा चिवडा, चिक्की, लाडू खावेत. चिवडय़ात शेंगदाणे, चणाडाळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, सुके खोबरे घातलेले असते. बेसन किंवा मूगडाळीचे लाडू, राजगिरा, कुरमुरे किंवा चणाडाळीची चिक्की आरोग्याला हितवर्धक असते.