एखादा अत्यवस्थ रुग्ण रुग्णालयात येतो तेव्हा त्याला बरं करण्यासाठी डॉक्टरांना भक्कम आधार असतो तो परिचारिकांचा. ते एक ‘टीमवर्क’च असतं. पण नंतर या टीममधली परिचारिका कुणाच्या लक्षात राहते का? रुग्णालयातून बाहेर पडताना परिचारिकेला आपुलकीनं ‘थँक्स’ म्हटल्याचं आठवतंय कधी? अशा ‘थँक्स’चे प्रसंग फार थोडे असतात.
इतर वेळी परिचारिका कुणाच्या खिजगणतीतही नाही!
रविवारी (१२ मे) जागतिक परिचारिका दिन आहे. त्यानिमित्त ‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन’च्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी उलगडलेलं मनोगत-    
सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. एका रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागात घटसर्प झालेलं एक बाळ आलं. त्याकाळी घटसर्प आणि धनुर्वात या रोगांची लहान बाळं जगणं फार अवघड असे. वॉर्डात शंभर रुग्णांमागे एकटी परिचारिका! त्या घटसर्पाच्या बाळाला संसर्गजन्य रोग म्हणून स्वतंत्र ठेवलं गेलं. उरलेल्या शंभर रुग्णांकडे लक्ष देता देता ती परिचारिका त्या बाळालाही वेळेवर औषधं देत होती. पण बाळाच्या घशातून येणारा स्राव काढून टाकण्यासाठी त्याला सारखी ‘सक्शन’ची गरज भासत होती. रात्रपाळीचे डॉक्टर येऊन बाळाला पाहून गेले. बाळाच्या घशातून येणाऱ्या स्रावाचं प्रमाण पाहता ‘एकंदरीत प्रकरण अवघड आहे, तरी किती जमेल तेवढं आपण करू’, असा विश्वास देऊन गेले.
सकाळपर्यंत मात्र बाळाच्या प्रकृतीत अक्षरश: चमत्कार व्हावा अशी सुधारणा झाली होती. सकाळी आपलं बाळ डोळे उघडून छान टुकूटुकू पाहतंय, हे पाहून त्याचे आईवडील डॉक्टरांच्या पायाच पडले. ‘तुमचं बाळ वाचलं, ते या सिस्टरमुळे!’ असं डॉक्टरांनी म्हणताच परिचारिकेला अगदी भरून आलं! पुढे बावीस- तेवीस वर्षांनीही ती परिचारिका त्याच सार्वजनिक रुग्णालयात काम करत होती. एक मध्यमवयीन माणूस तिला शोधत आला. दोघांनाही एकमेकांचं नाव अर्थातच माहीत नव्हतं. पण त्यानं चेहऱ्यावरून सिस्टरला ओळखलं! बावीस वर्षांपूर्वीची त्या घटसर्प झालेल्या बाळाची आठवण सांगितली अन् तिच्या हातात त्या मुलाच्या लग्नाची पत्रिका ठेवली! ‘सिस्टर, नक्की यायचं हं माझ्या मुलाच्या लग्नाला!’ परिचारिकेची अशी आठवण आज फार कमी ठिकाणी ठेवली जाते!
सुमारे दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूरला एका आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी एक बाई आली. प्रसूती व्हायला वेळ लागत असेल तर ती सुकर होण्यासाठी एक लहानशी ‘सर्जिकल प्रोसिजर’ केली जाते. ती ‘कट’ द्यायची शस्त्रक्रिया करायची वेळ आली असल्याचं परिचारिकेनं डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. खरं तर कोणतीही सर्जिकल प्रोसिजर करायची ती डॉक्टरनंच, पण डॉक्टरांनी परिचारिकेलाच ती शस्त्रक्रिया करायला सांगितलं. ती पडली नवखी! शेवटी तिच्या वरिष्ठ परिचारिकेला बोलवून तिच्याकडून ‘कट’ द्यायची शस्त्रक्रिया करून घेतली गेली. मात्र या भानगडीत ती नवीन परिचारिका आणि डॉक्टर यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर डॉक्टरनं परिचारिकेवर खटला दाखल केला. तो सध्या सुरू आहे.
पंढरपूरला एका परिचारिकेनं एका रुग्णाला एक लस दिल्यावर त्याचा मृत्यू झाला होता. परिचारिकेला बडतर्फ करण्यात आलं. पण त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लशी ठेवण्यासाठी फ्रिजच नव्हता! मुंबईहून रात्री आलेली लस ठेवायची कुठे अशा प्रश्न त्या परिचारिकेला पडला होता. तिनं लस एका भांडय़ात ठेवून ते भांडं पाण्याच्या माठाखाली गारव्यात ठेवून दिलं. लशी, इन्सुलिनसारखी काही द्रव्यं, काही विशिष्ट औषधं फ्रिजमध्येच ठेवावी लागतात. अजूनही ग्रामीण भागांतल्या कित्येक आरोग्य केंद्रांत फ्रिज नाही.
रुग्णालयात औषधांच्या ट्रॉल्या ओढणं, रुग्णांना ठरवून दिलेल्या ‘डाएट’नुसार खाद्यपदार्थ,औषधं आणून देणं, चहा करणं, रुग्णांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात हलवणं, ही कामं साधारणपणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वाटून दिलेली असतात. पण सार्वजनिक रुग्णालयांत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यानं आहेत त्या कर्मचाऱ्यांवर आधीच कामाचा ताण असतो. अशा वेळी ही अतिरिक्त कामंही परिचारिकांना करावी लागतात. औषधं आणि इतर सेवा वेळेवर किंवा चांगल्या दर्जाच्या मिळाल्या नाहीत की रुग्णाच्या नातेवाइकांचा रागही तिच्यावरच निघतो. रुग्णालयात औषधांची, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता नसणं, कामासाठी माणसांची कमतरता असणं, याबद्दल राज्यात अनेक ठिकाणी परिचारिकांना मारहाणही झाली आहे.
कामाच्या अनियमित वेळा, सततचं उभं राहून करायचं काम, आजूबाजूला वेगवेगळ्या रोगांनी, वेदनांनी ग्रासलेले रुग्ण हे परिचारिकांचं ‘रुटिन’ असतं. पुष्कळ परिचारिकांना त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स, सांधेदुखी, अ‍ॅसिडिटी, उच्च रक्तदाब, मधुमेहाचा सामना करावा लागतो. हे या व्यवसायाचेच आजार आहेत असंही म्हणता येईल!
कित्येक सार्वजनिक रुग्णालयांत युनिफॉर्मचे कपडे घालणं, आणि घरी जाताना ते बदलणं यासाठी पुरेशी जागा नसते. पांढरा फ्रॉक आणि डोक्यावर पिन अप केलेली पांढऱ्या रुमालाची कॅप हा युनिफॉर्म इथल्या परिचारिकांना सोयीचा वाटत नाही. डोक्यावरच्या या टोपीमुळे मानेच्या हालचालींवर बंधनं येतात. किमान दोन ड्रेस शिवून घेणं, त्याला लागणाऱ्या पिना- टाचण्या, ड्रेसबरोबर घालायचे बूट-मोजे या सगळ्याला खर्च होतो.
वर्षांला युनिफॉर्म शिवून घेण्यासाठी सहाशे रुपये, तर महिन्याला तीस रुपयांचा ‘वॉशिंग अलाऊन्स’ मिळतो! आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या परिचारिकांनी खाकी रंगाचा सलवार- कुडता आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा लहान बाह्य़ांचा कोट असा युनिफॉर्म घालायला सुरूवात केली आहे.
परदेशांत परिचारिकांना प्रतिष्ठा आहे. अनेक देशांत प्रशिक्षित परिचारिका स्वत:ची नर्सिग होम्स चालवतात. आपल्याकडे असं कधी होईल हा प्रश्नच आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी मथुराबाई जाईल आणि मथुराबाई गोगटे या आलवणी लुगडं नेसणाऱ्या परिचारिका पुण्यातल्या शनिवार पेठेत स्वत:ची नर्सिग होम चालवीत असत. प्रसूती सुरळीत होण्यासाठी त्यांची नर्सिंग होम्स प्रसिद्ध होती. असे यापुढे कधी होऊ शकेल का?