पीएच.डी. करतानाचा कालावधी किंवा संशोधनाचा कालावधी हा शिक्षकपदांसाठी अनुभव म्हणून ग्राह्य़ धरण्यात येणार असून त्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यापूर्वीच ‘अनुभवी’ असा शिक्का मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभाग प्रमुख किंवा प्राचार्यपदासाठी पात्रताधारक उमेदवार न मिळण्याचा प्रश्नही कमी होण्याची शक्यता आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिलासा काय?

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार पीएच.डी. हा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. त्यामुळे शिक्षकांनी नोकरी करत असताना पीएच.डी. करायचे असल्यास रजा घेणे अपेक्षित आहे. मात्र महाविद्यालयांकडून शिक्षकांना या रजा नाकारण्यात येतात किंवा पीएच.डी. करत असलेला कालावधी अनुभव म्हणून गृहित धरण्यात येत नाही. पीएच.डी. करत असलेला कालावधी हा अध्यापन अनुभव म्हणून पदोन्नती, वेतनवाढ यासाठी ग्राह्य़ धरण्यात येणार आहे. त्यामुळे पीएच.डी. करण्यासाठी सुट्टी घेतलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.  संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख या पदांसाठी अनुभव आणि पीएच.डी. असे दोन्ही लागते. मात्र पात्रताधारक उमेदवारच मिळत नाहीत अशी ओरड करून अनेक संस्थाचालकांकडून त्याच प्राचार्याना मुदतवाढ देण्यात येते. मात्र नव्या नियमामुळे या पदांसाठी अनुभव आणि पीएच.डी. असे दोन्ही निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पीएच.डी.चा कालावधी हा अनुभव म्हणून गृहीत धरण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now phd duration counted as experience