शिक्षण हक्क कायद्याच्या पायमल्लीविरोधात ‘अनुदानित शिक्षा बचाव समितीच्या वतीने ‘२४ फेब्रुवारी रोजी मुंबईत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
एका बाजूला महानगरपालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष व दुसरीकडे ६ ते १४ वयातील मुलांच्या शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदी धाब्यावर बसविण्याचे अक्षम्य धोरण महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका राबवत आहे. त्याच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे हे आंदोलन केले जाणार आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या दोन वर्षांत २५ टक्के मोफत शिक्षण प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांवर केवळ ७० टक्केच प्रवेश होऊ शकले, असेही समितीचे म्हणणे आहे. अशा विविध मुद्दय़ांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा समितीने निर्णय घेतला असून दुपारी ३.३० वाजता हे आंदोलन होणार आहे. या वेळी २५ टक्के आरक्षणासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला सांगावे अशी मागणी प्रामुख्याने केली जाणार आहे.