महाविद्यालयांमध्ये खुल्या निवडणुका सुरू करून लोकशाही रुजविण्याचे प्रयत्न एका बाजूला होत असताना राजकारणापासून व प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याबाबतचे मुस्कटदाबी करणारे प्रतिज्ञापत्र उल्हासनगरातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्य म्हणजे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे कोणत्याही विद्यार्थ्यांला पूर्वसूचना न देता काढून टाकण्याचे अर्निबध अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्याना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
सीएचएम महाविद्यालयात वर्ग सुरू होऊन तीन महिने उलटल्यानंतर आपल्या पदवी अभ्यासक्रमाच्या ११ हजार विद्यार्थ्यांना एक प्रतिज्ञापत्र दिले. यात एकूण २४ मुद्दे समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करून ते परत करावे, असे सांगण्यात आले आहे. राजकारणात सहभाग घेणे, प्रसारमाध्यमांशी न बोलणे आदी अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित हक्कांवरच गदा आणण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.
महाविद्यालयाने आपल्या आवारात भ्रमणध्वनी वापरण्यास बंदी घातली आहे. महाविद्यालयाच्या परिसरात फिरताना ओळखपत्र (आयकार्ड) कायम बाळगणे नव्या नियमावलीनुसार बंधनकारक आहे. पण महाविद्यालयाने अद्याप ओळखपत्रेच दिलेली नाहीत.
या संबंधात महाविद्यालयाच्या प्राचार्या भावना मोटवानींशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यापीठाच्या नियमांत आम्ही काही नियमांची भर घातली, असे स्पष्ट केले. तसेच हे नियम आमच्या उपप्राचार्यानी तयार केले असून मी व्यक्तिश: पाहिलेले नाहीत, असा खुलासा केला.