कमी झालेले पाऊस आणि पाणीटंचाईची झळ याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने येत्या पावसाळयातील १ जुलै या एकाच दिवशी जिल्ह्य़ात १० ते १२ लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले आहे. असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलताना दिली.
येत्या १ जुलै रोजी राज्यात एकच दिवशी किमान दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी नियोजनाची माहिती दिली. बैठकीस अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख, उपविभागीय महसूल अधिकारी कुणाल खेमणार, मोनिका सिंह, अश्विनी जिरंगे, कीर्ती नलवडे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक टी. पी. पाटील, सहायक संचालक सुहास साळुंखे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात १ ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्त १ जुलै रोजी सर्व प्रशासकीय यंत्रणा, विद्यार्थी तसेच स्वयंसेवी, सेवाभावी, सहकारी संस्था तसेच लोकसहभागातून मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा प्रशासनाचा निर्धार केला आहे. जिल्ह्यात सर्व यंत्रणा आणि लोकसहभागातून १० ते १२ लाख रोपांची लागवड करण्याचा संकल्प असून त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी वृक्ष लागवडीचा कृती आराखडा तत्काळ तयार करावा. याकामी संबंधित विभागाच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी या संबंधीचे सविस्तर नियोजन करावे. वृक्ष लागवडीच्या या उपक्रमासाठी लावण्यात येणाऱ्या रोपांसाठी खड्डे, रोपे यांचे नियोजन आतापासूनच करावे, अशी सूचना करून सैनी म्हणाले, वृक्षारोपणासाठी रोपांची उपलब्धता, वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आणि क्षेत्र निश्चित करून त्या क्षेत्राचे अक्षांश-रेखांश तसेच शक्य असेल तेथे जीपीएस लोकेशन संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्याचे शासनाचे निर्देश असून त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी.
या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत शाळांमध्ये एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबविण्याचा मानस असून यासाठी शिक्षण विभाग, सामाजिक वनीकरण विभाग तसेच ग्रामसमितीने आवश्यक त्या उपाययोजना आणि पाठपुरावा करावा. याकामी ४ थी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सहभाग घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात १२ लाख वृक्षलागवडीचा संकल्प
१ जुलैला एकाच दिवशी होणार अंमलबजावणी
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-04-2016 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 lakh trees will be planted in kolhapur