कोल्हापूर : दिवंगत आपदा मित्र राजशेखर प्रकाश मोरे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचा धनादेश मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते उषा राजशेखर मोरे राजशेखर मोरे यांना शुक्रवारी धनादेश प्रदान करण्यात आला.
परीविक्षाधीन जिल्हाधिकारी सुहास गाडे, निवासी उप जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, करवीर तहसीलदार शीतल मुळे -भामरे, तहसीलदार (सर्वसाधारण शाखा) अर्चना कापसे आदी उपस्थित होते. माजलगांव (बीड) येथील एक डॉक्टर धरणात बुडाल्यामुळे शोध घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे १० स्वयंसेवकांचे पथक घटनास्थळी पाठविले होते. १९ सप्टेंबर रोजी आपदामित्र राजशेखर मोरे या स्क्युबा डायव्हर्स (गोताखोर) नी स्क्युबा किट घालून पाण्यात उतरुन बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरु केला. तेव्हा मोरे यांचा मासे पकडण्याच्या जाळीत अडकून बुडून मृत्यू झाला होता. मोरे यांच्या कुटुंबियांना शासन स्तरावरुन आर्थिक मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योजकांनीही दिवंगत मोरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली होती.