कळंबा कारागृहात बंद असलेल्या डॉ. पोळकडे रिव्हॉल्वर, मोबाइल | Loksatta

कळंबा कारागृहात बंद असलेल्या डॉ. पोळकडे रिव्हॉल्वर, मोबाइल

तो तुरुंगामध्ये रिव्हॉल्वर सदृश्य वस्तू घेऊन फिरत असल्याची चित्रफित व्हायरल झाली आहे. त्याने स्वतः ही चित्रफित मोबाइलमध्ये बनवली आहे.

कळंबा कारागृहात बंद असलेल्या डॉ. पोळकडे रिव्हॉल्वर, मोबाइल
संतोष पोळ (संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात एक कुख्यात बंदी कारागृहात रिव्हॉल्वर सदृश्य वस्तू घेऊन फिरत असल्याची चित्रफित व्हायरल झाली आहे. एका चित्रफितीमध्ये वाई हत्या कांडातील संशयित आरोपी डॉ. संतोष गुलाब पोळ हा न्यायालयीन बंदी दिसत असून तो मुलाखत देताना दिसत आहे. त्यामुळे कळंबा मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. यापूर्वी कारागृहात ओली पार्टी, मोबाइल सापडणे असे प्रकार उघड झाले आहेत.

ऑगस्ट २०१६ मध्ये सातारा जिल्ह्यातील वाई येथे मंगल जोधे यांची हत्या करणाऱ्या डॉ. पोळ (वय ५० रा. धोंड, ता, वाई, जि. सातारा) याने ज्योती पांडुरंग मांढरे (वय २५, रा.वाई) या मैत्रिणीच्या मदतीने ६ हत्या २००३ ते २०१६ या कालावधीत केल्या होत्या. या प्रकरणी डॉ. पोळ ऑगस्ट २०१६ पासून कळंबा कारागृहात न्यायालयीन कैदी म्हणून आहेत.

दरम्यान तो तुरुंगामध्ये रिव्हॉल्वर सदृश्य वस्तू घेऊन फिरत असल्याची चित्रफित व्हायरल झाली आहे. त्याने स्वतः ही चित्रफित मोबाइलमध्ये बनवली आहे. या चित्रफितीमध्ये तो रिव्हॉल्वर सदृश्य वस्तू हाताळत असल्याचे दिसून येत आहे. त्याने मोबाइल फोनवर दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, सातारा कारागृहात असलेली त्याची साथीदार ज्योती मांढरे हिने ही रिव्हॉल्वर सातारा कारागृहातील सुभेदार राजाराम कोळी यांच्याकडे दिली होती. त्यासाठी आर्थिक घेवाण-देवाण केली आहे. चित्रफित बनवण्यसाठी माझ्या जवळ असलेला मोबाइल हा वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रकांत आवळे यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीत सात वेळा दिला आहे.

म्हणे साबणाची रिव्हॉल्वर

कळंबा कारागृहातील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तुरुंग प्रशासनाने हा प्रकार बनावट असल्याचे म्हटले आहे. पोळकडे आढळलेले रिव्हॉल्वर बनावट आहे. गणेशोत्सव काळात बंदीजनांनी संगीत कार्यक्रम घेतला होता. तेव्हा साबणापासून ही रिव्हॉल्वर सदृश्य वस्तू बनवली असल्याचा दावा कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी केला आहे. हे रिव्हॉल्वर आणि मोबाइल कारागृहात कसे आले, यासंदर्भात चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. डॉ. पोळ जेलमध्ये विकृतपणे वागत आहे. प्रकाशझोतात येण्यासाठी तसेच प्रशासनाची बदनामी करण्यासाठीच पोळने हे कृत्य केल्याचे कारागृह प्रशासनाने म्हटले आहे. कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यादेखील चौकशीसाठी पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2018 at 23:35 IST
Next Story
पवार-शेट्टी नवे राजकीय समीकरण जुळणार?