महावितरणकडून होणाऱ्या २७ टक्के वीज दरवाढीच्या प्रस्तावाची सोमवारी ( ४ जुल) कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक होळी करणार आहेत. यात सर्व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक सहभागी होणार आहेत. महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्योजकीय संघटनांतर्फे आयोजित बठकीत हा निर्णय घेतला गेला.
महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीबाबत चर्चा करण्यासह त्याबाबतच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्योजकीय संघटनांतर्फे इंजिनिअिरग असोसिएशनच्या कार्यालयात बठक झाली. वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष होगाडे म्हणाले,की महावितरणने ५.५ टक्क्यांच्या दरवाढीचा प्रस्ताव असल्याचे सांगितले असले तरी, प्रत्यक्षात एकूण २७ टक्के वाढ होणार आहे.
हा प्रस्ताव मान्य झाल्यास घरगुती, व्यापारी-उद्योजक, शेतकरी या वीजग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. ते लक्षात घेता सर्वानी सामुदायिकपणे या प्रस्तावाला विरोध करणे आवश्यक आहे. महावितरणची प्रस्तावित वीजदरवाढ ही राज्य शासनाच्या गेल्या २० महिन्यांतील सर्व आश्वासनांना हरताळ फासणारी आहे. या अन्यायकारक दरवाढीमुळे घरगुती, व्यापारी-उद्योजक, शेतकरी वीजग्राहकांवर बोजा पडणार असल्याचे होगाडे यांनी सांगितले.
इंजिनीअिरग असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर म्हणाले,की दरवाढीचा हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी सोमवारी महावितरणच्या कार्यालयासमोर वीज दरवाढ प्रस्तावाच्या होळीद्वारे केली जाणार आहे. आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल.
‘गोशिमा’चे अध्यक्ष देवेंद्र दिवाण, संचालक राजीव परीख, ‘स्मॅक’चे उपाध्यक्ष राजू पाटील, ‘केईए’चे कमलाकांत कुलकर्णी, ‘मॅक’चे संचालक सचिन कुलकर्णी, सत्यजित पाटील, शंतनू गायकवाड, ‘आयआयएफ’चे अध्यक्ष संजय पाटील, इचलकरंजी इंजिनिअिरग असोसिएशनचे उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे, कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स कुपवाडचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे, सचिव चंद्रकांत पाटील, चंदगड चेंबर ऑफ कॉर्मसचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी, शीतल केटकाळे, श्यामसुंदर मर्दा उपस्थित होते. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले.