कोल्हापूर : शैक्षणिक प्रणालीत आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय संशोधन अनिवार्य करणारे, समाजाच्या आणि मानवतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योग्य वेळेस आले आहे. यामुळे शिक्षण व्यवस्था सक्षम होण्यासोबत तिला ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असे मत राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘६ जी’ आणि वायरलेस नेटवर्क टेक्नॉलॉजीविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. सहस्रबुद्धे बोलत होते. केंद्र सरकार व देशातील नामांकित शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू असलेल्या ‘स्वयम्’ या शैक्षणिक कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करून त्यांनी ‘६ जी’ व नवीन तंत्रज्ञान याचा शिक्षणात कसा उपयोग करता येईल यावर त्यांनी मत मांडले.
‘जिस्फी’चे अध्यक्ष, अरहास युनिव्हर्सिटी डेन्मार्कमधील प्रा. रामजी प्रसाद यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत काम करण्याविषयी संबोधित केले. त्यांनी उपस्थित नवसंशोधक व विद्यार्थ्यांना ‘६ जी’ तंत्रज्ञान व वायरलेस कम्युनिकेशनवरील संशोधनासाठी प्रेरित केले.
या वेळी रोबोटिक विषयाचे मुख्य शास्त्रज्ञ बालमुरलीधर प्रसाद, अर्पण पाल उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय परिषदेंतर्गत ४२ नवसंशोधकांचे शोधनिबंध सादर होणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त भरत पाटील, प्रतापसिंह रावराणे, कार्यकारी संचालक डॉ. विलास कर्जीनी या वेळी उपस्थित होते.