कोल्हापूर : रसिकांनी डोक्यावर उचलून घेतले नसते तर आज मी नाटकाचा पडदा ओढत बसलो असतो. पद्मश्री, महाराष्ट्र भूषणसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार देऊन माझा सन्मान झाला, त्यात लोकांचेच योगदान आहे. माझ्या जडणघडणीत कोल्हापूरचे स्थान विशेष आहे. एका वर्षात १४ चित्रपट करण्याचे भाग्य मला लाभले, असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी येथे व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेच्या वतीने संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार अशोक सराफ यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कोल्हापूरच्या चित्र नाट्य परंपरेचा इतिहास गौरवशाली आहे. येथील कलाकारांना घडविण्यात केशव भोसले नाट्यगृहाचे योगदान मोठे असल्याने ते लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावे, अशी अपेक्षा सराफ यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात मंत्री सामंत यांनी अशोक सराफ यांच्या कलासक्त व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. राज्यात सांस्कृतिक क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ही कामे करण्यासाठी अशोक सराफ यांनी मला हक्काने सांगावे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांची भाषणे झाली. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, निवेदिता सराफ जोशी आदी उपस्थित होते.

पत्नीचा विरोध, पतीची संमती

यानंतर विघ्नेश जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत रसिकांच्या प्रेमावरून पती-पत्नीची भिन्न मते समोर आली. अशोक सराफ यांची वयाच्या ७८ व्या वर्षी सुद्धा लोकप्रियता कायम असल्याने त्यांच्या समवेत छायाचित्र काढण्यासाठी झुंबड उडते. त्यातून ते कधी अडखळतील, पडतील अशी भीती असते. तेव्हा लोकांनी हे समजून घेऊन सहकार्य करावे, वागावे अशी अपेक्षा निवेदिता सराफ जोशी यांनी व्यक्त केली. त्यावर अशोक सराफ यांनी ती काय म्हणतेय, ते लक्षात घेऊ नका. तुम्ही माझ्याकडे बिनधास्त या, असा दिलखुलास प्रतिसाद देत रसिकांच्या भावनेला साद घातली.

कोल्हापूरकरांनी मामा केला

अभिनेते अशोक सराफ यांनी कोल्हापूरच्या चित्रपट विषयक अनेक अनुभव, किस्से सांगितले. १९७८ साली पूर्णपणे कोल्हापुरात होतो. येथेच मला उद्देशून ‘मामा’ असे म्हटले गेले आणि पुढे ते सर्वमुखी झाले.