कोल्हापूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आग लावण्याचे काम करणाऱ्या लोकांमध्ये संजय राऊतही होते. हेच राऊत आता छत्रपतींच्या घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत राणे म्हणाले, हा काल ठाकरेंच्या घरात आग लावत होता. आज छत्रपतींच्या घरापर्यंत पोहोचण्याची मजल गेली आहे. अशा लोकांना अंगरक्षकांची गरज नाही. थोडा मराठा समाजाने त्याचा ताबा घेतला पाहिजे. हा आग लावण्याचा इतिहास आहे. ही हिंमत केल्याबद्दल राऊतना कधीतरी किंमत मोजायला लागणार, हे नक्की सांगतो. राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय निश्चितपणे होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तोल सुटला
राऊत यांच्यावर टीका करताना नीतेश राणे यांचा तोल सुटला. राणे यांनी खासदार असणाऱ्या संजय राउतांची तुलना शाहू महाराजांच्या श्वानाशी केली. शाहू महाराजांचं मी खरंच कौतुक करीन, की त्यांनी अतिशय योग्य जागी त्यांनी संजय राउतांना बसवले आहे. एक त्याचा पालतू होता. दुसरा कोणाच्या बिस्किटावर नाचतो हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे राणे म्हणाले.