करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या सेवेमध्ये नवा रथ लवकरच दाखल होत आहे. देवीच्या नगर प्रदक्षिणेसाठी रथ वापरात येणार आहे. चैत्र पौर्णिमेला देवीची नगर प्रदक्षिणा होत असताना भक्तांना या रथातून देवीचे दर्शन घेता येणार आहे.
महालक्ष्मीसाठी नवा रथ तयार केला जात आहे. याकरिता देवस्थान सेवा योजनेअंतर्गत मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यास भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला. चेन्नई येथील बस्तीमल पटवा यांनी १२ लाख रुपयांचे सागवान प्रकारचे लाकूड रथ तसेच मंदिराचे प्रवेशद्वार बनवण्यासाठी दिले होते. या मदतीतून रथ बनवण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते.
हेही वाचा – पुणे : कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी
कोकणातील कारागिरांची कारागिरी
याकरिता कुडाळ जवळील नेरूळ येथील भैरू शामसुंदर यांच्यासह सहा कारागीर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या टेंबलाई येथील सभागृहामध्ये रथाला आकार देण्याचे काम करीत आहेत. त्यांनी सुबक नक्षीकाम केले असल्याने रथ उठावशीर दिसू लागला आहे. त्यावर पॉलिश आणि चांदीचा मुलामा दिल्यानंतर नव्याने आकाराला आलेल्या रथाचे काम पूर्ण होईल.
हेही वाचा – राज्यातील १८९ कैद्यांची शिक्षा माफ, प्रजासत्ताक दिनी कारागृहातून मुक्तता
सुरक्षेचा विचार
चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा जोतिबा देवाची यात्रा असते. यानंतर भाविक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. तेव्हा नगरप्रदक्षिणेसाठी आकर्षक रुपातील नवा रथ देवीच्या प्रदक्षिणेसाठी प्रथमतः वापरात येणार आहे, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितले. हा रथ सुमारे पंधरा फूट उंचीचा आहे. नगरप्रदक्षिणेवेळी भाविकांची होणारी गर्दी व सुरक्षा याचा विचार करून रथाची उंची आकारमान निश्चित केले आहे.