करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व सशुल्क प्रवेशिका (पेड पास) सुरू करण्याच्या देवस्थान समितीच्या निर्णयाला येथील न्यायालयाने २६ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्थगिती आदेश दिला आहे. यामुळे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तरी देवस्थान समितीचा हा उपक्रम कृतीत उतरणार नाही असे स्पष्ट झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने राज्यातील काही महत्वाच्या मंदिरांच्या धर्तीवर यावर्षी नवरात्रीमध्ये भाविकांच्या सोयीसाठी पेड पासची सोय करण्याचा निर्णय घेतला होता. या विरोधात काही भाविकांनी विरोधी दर्शवला होता. तर श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी येथील दिवाणी न्यायालयात या विरोधात दावा दाखल केला होता.
राज्य शासनाने सन २०१० साली कोणत्याही देवस्थान समितीने पैसे घेऊन अगर नियमित रांगेत अन्य कोणतीही रांग करून दर्शन घेऊ नये असा आदेश काढला होता. त्याच्या विरोधात जाऊन देवस्थान समितीने व्हीआयपी दर्शन व पेड पासची सुविधा केली असल्याने हा निर्णय रद्द केला जावा, असे त्यांनी याचिकेमध्ये म्हटले होते. यावर आज झालेल्या सुनावणी वेळी देवस्थान समिती व जिल्हाधिकारी यांनी मुदत वाढवून मागितली. त्यास हरकत घेण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी व देवस्थान समिती यांनी उपरोक्त कालावधी पर्यंत पेड पास अगर व्हीआयपी दर्शन देणार नाही अशी तोंडी हमी दिल्याने त्यास अनुसरून न्यायालयाने स्थगिती दर्शवली आहे. या कामी मुनीश्वर यांच्यावतीने एडवोकेट नरेंद्र गांधी व ओमकार गांधी यांनी काम पाहिले.